Saudi Arabia sand import सौदी अरेबिया म्हटलं की, तेलाची चर्चा कायम होते. तेलाच्या उत्पादनामुळे सौदी गर्भश्रीमंत आहे. परंतु, सध्या हा देश एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे सौदी अरेबियावर वाळू आयात करण्याची वेळ आली आहे. सर्वांना हे ठाऊक आहे की, सौदी अरेबियाचा बहुतांश भाग वाळूने व्यापला आहे. मात्र, तरीही सौदीला विदेशातून वाळू आयात करावी लागत आहे. सौदी अरेबियाकडून ऑस्ट्रेलिया, चीन व बेल्जियममधून वाळूची आयात केली जाते. त्यामागील कारण काय? हजारो किलोमीटर वाळवंट असूनदेखील सौदी अरेबियावर वाळू आयात करण्याची वेळ का आली? त्याविषयी जाणून घेऊयात.
वाळू आयात करण्याचे कारण काय?
- सौदी अरेबिया हा देश वाळवंटाने व्यापलेला आहे. मात्र, तरीदेखील हा देश बाहेरच्या देशातून वाळू आयात करतो, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकते. परंतु, त्यामागे बांधकामाच्या दृष्टीने एक वैज्ञानिक कारण आहे.
- बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचे विशिष्ट निकष, हे यामागील मुख्य कारण आहे. सौदी अरेबिया आपल्या व्हिजन २०३० (Vision 2030) अंतर्गत अब्जावधी डॉलर्सचे प्रकल्प पूर्ण करीत असल्याचे चित्र आहे.
- या प्रकल्पांसाठी देशाला विशिष्ट प्रकारच्या वाळूची गरज आहे आणि ही वाळू त्यांना वाळवंटात मिळत नाही.
- त्यामुळे सौदी अरेबियाला विदेशातून वाळू आयात करावी लागते.
- ही समस्या केवळ सौदी अरेबियापुरती मर्यादित नाही. आता बांधकाम दर्जाच्या वाळूची वाढती टंचाई ही जागतिक समस्या ठरू शकते.

वाळवंटातील वाळू बांधकामासाठी उपयुक्त का नाही?
सौदी अरेबियासारख्या वाळवंटी प्रदेशात भरपूर वाळू आहे; मात्र असे असले तरीही बांधकामासाठी ती योग्य नसते. वाळवंटातील वाळूचे कण हजारो वर्षांपासून वाऱ्यामुळे झिजल्याने ते गोल आणि गुळगुळीत झालेले असतात. सिमेंट आणि पाण्याच्या मिश्रणातून मजबूत काँक्रीट तयार करण्यासाठी लागणारे धारदार आणि खडबडीत कण त्यात नसतात. गगनचुंबी इमारती, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासासाठी आवश्यक असलेली वाळू ही सामान्यतः नद्या, तलाव आणि समुद्राच्या तळाशी आढळते.
या भागांमध्ये वाळूचे कण अधिक धारदार असतात आणि त्यामुळे काँक्रीट अधिक मजबूत होते. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम (यूएनईपी)नुसार, जगभरात दरवर्षी सुमारे ५० अब्ज टन वाळूचा वापर होतो. त्यामुळे वाळू ही जागतिक स्तरावर सर्वाधिक काढली जाणारी सामग्री ठरते. परंतु, काढण्यात येणार्या वाळूपैकी काही टक्के वाळूच बांधकामासाठी योग्य असते.
ऑस्ट्रेलियाकडूनच वाळू आयात का केली जाते?
उच्च गुणवत्तेची सिलिका आणि बांधकाम वाळू निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. ‘ओईसी वर्ल्ड’नुसार २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने २७३ दशलक्ष डॉलर्स किमतीची वाळू निर्यात केली. त्यामुळे हा देश जगातील वाळू निर्यात करणाऱ्या देशांमध्ये (१८३ पैकी) दुसऱ्या क्रमांकावर होता. २०२३ मध्ये सौदी अरेबियाने ऑस्ट्रेलियाकडून सुमारे १,४०,००० डॉलर्स किमतीची नैसर्गिक बांधकाम श्रेणीची वाळू आयात केली. सौदी अरेबियाच्या शहरी विकास योजनेत निओम (NEOM), द रेड सी प्रोजेक्ट (The Red Sea Project) व किदिया (Qiddiya) यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांना केवळ मोठ्या प्रमाणात काँक्रीट तयार करण्यासाठी उच्च दर्जाच्या वाळूची आवश्यकता आहे. ही वाळू वाळवंटात मिळत नाही.
कोणकोणत्या देशांकडून वाळूची आयात?
वाळू आयात करणारा सौदी अरेबिया एकटा देश नाही. संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि कतारसारखे इतर आखाती देशही याच कारणांमुळे वाळू आयात करतात. विशेषतः दुबई आणि अबू धाबी गगनचुंबी इमारतींच्या विस्तारासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून बांधकामाच्या योग्यतेची वाळू आयत करतात. ‘यूएनईपी’च्या २०२४ च्या धोरणानुसार, मध्य पूर्वेतील वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे बांधकामाच्या वाळूची मागणी जागतिक स्तरावर वाढताना दिसत आहे. नजीकच्या भविष्यातही हे देश पूर्णपणे आयातीवर अवलंबून असणार आहेत.
जागतिक वाळू संकट
आयात केलेल्या वाळूवरील अवलंबित्व केवळ सौदी अरेबियाचाच मुद्दा नसून, हे एक वाढते जागतिक आव्हान आहे. ‘यूएनईपी’ने वाळू संकटाबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. अनियंत्रित वाळू काढण्यामुळे जगाच्या अनेक भागांमध्ये पर्यावरणीय ऱ्हास होत आहे, नदीच्या पात्रांची धूप होत आहे, अधिवासांचा नाश आणि जैवविविधतेचा ऱ्हास होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याच संकटाला प्रतिसाद म्हणून काही देश तयार ‘M-sand’सारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. त्यात खडक फोडून बांधकामासाठी उपयुक्त अशी वाळू तयार केली जाते. याव्यतिरिक्त नैसर्गिक वाळू संसाधनांवरील दबाव कमी करण्यासाठी बांधकाम कचऱ्याचा पुन्हा कसा वापर केला जाईल, याकडेदेखील लक्ष दिले जात आहे. सौदी अरेबियादेखील या पर्यायांचा शोध घेत आहे.
सौदी अरेबियाचे ‘व्हिजन २०३०’ काय आहे?
सौदी अरेबियाचे व्हिजन २०३० हे देशाच्या अर्थव्यवस्थेत विविधता आणण्यासाठीची एक योजना आहे. सध्या तेलाच्या व्यापारावर सौदी अरेबियाची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे सौदी अरेबियाला ५०० अब्ज डॉलर्स किमतीचे NEOM शहर, द लाईन ही शहरी संकल्पना आणि इतर मेगा प्रकल्पांसाठी आंतरराष्ट्रीय मानकांना पूर्ण करणाऱ्या विशेष बांधकाम सामग्रीची आवश्यकता आहे. त्यामुळे औद्योगिक श्रेणीची वाळू आयात करणे ही त्यांची गरज आहे.
वाळूच्या टंचाईसाठीचे उपाय काय?
आता हळूहळू टिकाऊपणा आणि संसाधन व्यवस्थापनाकडे लक्ष दिले जात आहे. सौदी अरेबियाच्या व्हिजन २०३० अंतर्गत पर्यावरणीय धोरणे, जसे की, अक्षय ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन यांकडे लक्ष दिले जात आहे. कालांतराने सौदी अरेबिया वाळूच्या वापरावरदेखील तोडगा काढू शकेल. राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये एम सँड आणि पर्यायी एकूण घटकांवर संशोधन सुरू आहे. परंतु, सध्याच्या प्रकल्पांची प्रचंड व्याप्ती आणि तत्काळ गरजा पाहता, या बाबी स्वीकारण्यास वेळ लागेल.
वाळवंटातील देश वाळू आयात करतो ही बाब आश्चर्यकारक वाटत असली तरी ती आधुनिक बांधकाम, संसाधन व्यवस्थापन आणि जागतिक व्यापाराच्या वास्तविकतेचे एक प्रतिबिंब दर्शवते. सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, चीन, बेल्जियम यांसारख्या इतर राष्ट्रांकडून वाळूची आयात करीत असल्याने पायाभूत सुविधांमध्ये या सामग्रीचे महत्त्व अधोरेखित होते. सौदी अरेबिया आपल्या व्हिजन २०३० च्या उद्दिष्टांकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे त्यांना संसाधनांची मागणी आणि पर्यावरणीय टिकाऊपणा यांचा समतोल साधणे महत्त्वाचे असेल. सध्या तरी विविध राष्ट्रांकडून येणारे वाळूचे शिपमेंट्स सौदी अरेबियाचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.