तमिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होईल. द्रमुकला सत्तेतून हटवायचे असेल तर तितकीच तगडी आघाडी विरोधात असणे गरजेचे आहे. अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) तितकी एकसंध दिसत नाही. त्याची कारणेही अनेक आहेत. काँग्रेसचे भक्तवत्सलम हे १९६७ मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर या पक्षाला राज्यात मुख्यमंत्री आणता आला नाही. पुढे जवळपास सहा दशके द्रमुक-अण्णा द्रमुक यांचीच सत्ता तमिळनाडूत राहिली. काँग्रेसला राज्याच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांच्या मदतीने दुय्यम भागीदाराचे स्थान पत्करावे लागले. आताही द्रमुक आघाडीत काँग्रेस सत्तेत आहे.
द्रविडियन पक्षच केंद्रस्थानी
राज्यात भाजपला व्यापक जनाधार नाही. हिंदी, हिंदू, हिंदुत्व हे मुद्दे भाजपसाठी अडचणीचे ठरतात असे गणित मांडले जाते. या प्रतिमेतून बाहेर येण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्याला गतवर्षीच्या (२०२४) लोकसभा निवडणुकीत थोडेफार यश आले. त्यात भाजपने दहा टक्क्यांवर मते मिळवत दखलपात्र कामगिरी केली. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. जागा किंवा सत्तेसाठी पंचवीस टक्क्यांवर मते गरजेची असतात. भाजपला राज्यात मतांच्या बेरजेसाठी प्रबळ स्थानिक पक्ष गरजेचा आहे. आता भाजपने अण्णा द्रमुकशी आघाडी केली असली तरी, मनोमीलन झालेले नाही. गेल्या विधानसभेला (२०२१) भाजप-अण्णा द्रमुक एकत्र होते. त्यामुळेच भाजपला विधानसभेच्या चार जागा मिळाल्या. मात्र लोकसभेला (२०२४)पुन्हा वेगळे झाले. त्यांना ३९ पैकी एकही जागा मतफुटीने मिळाली नाही. आता पुन्हा युती असली तरी, अण्णा द्रमुकमध्ये अस्वस्थता दिसते.
भाजपचा अण्णा द्रमुकमध्ये हस्तक्षेप?
अण्णा द्रमुकमध्ये जयललितांच्या पश्चात नेतृत्वावरून घमासान सुरू आहे. सरचिटणीस इडापड्डी के. पलानीस्वामी (ईपीएस) यांचे पक्षावर पूर्ण वर्चस्व आहे. अण्णा द्रमुकचे माजी सरचिटणीस ओ पन्नीरसेल्वम (ओपीएस) यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. नुकताच त्यांनी दिल्ली दौरा केला. नवा पक्ष स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. त्यात त्यांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. यावरून पलानीस्वामी समर्थक अस्वस्थ आहेत. भाजप अण्णा द्रमुकमध्ये थेट हस्तक्षेप करत असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे राज्यात रालोआला तडा जाण्याची चिन्हे आहेत. त्यातच अण्णा द्रमुकचे माजी नेते व अण्णा मक्कल मुनेत्र कळघमचे (एएमएमके) प्रमुख टीटीव्ही दिनकरन यांनी २०२६ च्या निवडणुकीत ईपीएस यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून घोषित केले नाही तर पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परतू अशी घोषणा केली. याखेरीज अण्णा द्रमुकचे माजी नेते के. ए. सेनगोटेयन यांनीही पक्षाबाहेरील नेत्यांना पुन्हा घ्यावे अशी मागणी केली. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दिल्लीचा दौरा करत त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या घडामोडींमुळे अण्णा द्रमुकमध्ये नाराजी वाढली. आता पलानीस्वामी यांची पक्षावर पूर्ण पकड आहे. भाजपशी आघाडी करून फायदा काय असा सवाल त्यांच्या पक्षाचे काही नेते व्यक्त करतात.
स्वतंत्र लढणे कितपत शक्य?
यातून अण्णा द्रमुक विधानसभेला स्वतंत्र लढण्याचे धाडस करणार का, हा मुद्दा आहे. लोकसभेला द्रमुकच्या नेतृत्वाखाली आघाडीने राज्यात ४६ टक्के मतांसह सर्व ३९ जागा जिंकल्या. अण्णा द्रमुक व मित्रपक्षांना २३ टक्के व भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १८ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. यातून अण्णा द्रमुकला जर सत्तेत यायचे असेल तर बेरजेच्या राजकारणावर भर द्यावे लागेल हे दिसते. विधानसभेला अभिनेते विजयन यांचा पक्षही रिंगणात असेल. दक्षिणेकडे राजकारणात चित्रपटसृष्टीतील व्यक्तींचा बोलबाला असतो. विजयन यांनी सरकारविरोधी मतांमध्ये फूट पाडली तर, अण्णा द्रमुकची वाटचाल आणखी कठीण होईल. तसेच पलानीस्वामी हे जयललिता यांच्याप्रमाणे लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होतील असे नेतेही नाहीत. त्यामुळेच अण्णा द्रमुक सावध आहे. त्यामुळेच भाजपला दूर करण्याचा निर्णय तडकाफडकी घेणे त्यांना सोपे नाही.
‘पीएमके’मध्ये कौटुंबिक संघर्ष
भाजपला राज्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना एकीकडे अण्णा द्रमुकच्या संबंधाबाबत तणाव असताना दुसरा मित्र पट्टली मक्कल काची (पीएमके) या पक्षात कौटुंबिक संघर्ष सुरू आहे. तमिळनाडूच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत वण्णियार समाजात हा पक्ष लोकप्रिय आहे. पक्षाचे संस्थापक एस रामदोस यांनी पुत्र अंबुमणी यांना कार्यकारी अध्यक्ष तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले. गेले वर्षभर हा संघर्ष सुरू आहे. रामदोस यांच्या कन्या गांधीमती यांचे पुत्र पी. मुकुंदन यांची पक्षाच्या युवा आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्याने वाद झाला. अंबुमणी यांनी आक्षेप घेताच अध्यक्षपदावरून कार्यकारी अध्यक्ष अशी त्यांची पदावनती करण्यात आली. वडिलांच्या इच्छेविरोधात त्यांनी एक यात्राही काढली. या साऱ्यात मतभेद तीव्र झाले. आता या पक्षात पुढे काय होईल त्यावर राज्यातील भाजप आघाडी किती मजबूत राहणार, हे अवलंबून असेल. राज्यात इतर मागासवर्गीय समाजात (ओबीसी) वण्णियार हा सर्वात प्रभावी आहे. अशा वेळी संघर्षाचा फटका भाजला बसेल हे निश्चित.
वादाचा द्रमुकला लाभ
तमिळनाडूत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अण्णा द्रमुक हा भाजपचा थोरला भाऊ. याखेरीज रालोआत जी. के. वासन यांचा तमिळ मनिला काँग्रेस, इंदिया जनयज्ञ काची तसेच न्यू जस्टीस पक्ष हेच तीन पक्ष आहेत. त्यांना व्यापक जनाधार नाही. तर पुतिया तमिळगम हा भाजपचा जुना मित्र आता अभिनेते विजय यांच्या राजकीय आघाडीत गेला आहे. या साऱ्या घडामोडींचा राज्यातील सत्तारूढ द्रमुकला लाभ होईल अशी चिन्हे आहेत. त्यांचा सामाजिक आधार भक्कम आहे. त्यांच्या आघाडीत काँग्रेस तसेच डावे पक्ष व राज्यातील छोटे स्थानिक पक्ष आहेत. भाजपने दक्षिणेत तमिळनाडूवर लक्ष केंद्रित केले असले तरी, राज्यातील राजकीय स्थिती पाहता त्यांना २०२६ ची निवडणूक आव्हानात्मक होत आहे.