America Pakistan Relations : भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानशी जवळीक साधताना दिसून आले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनीही गेल्या दोन महिन्यांत दोन वेळा अमेरिकेचा दौरा केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा एकदा जुन्याच वाटेवर जात आहेत. पाकिस्तानबरोबर व्यापाराची भागीदारी करून एक नवा अध्याय सुरू करण्याचा अमेरिकेचा विचार आहे; तर अमेरिकेचा अत्यंत महत्वाचा भागीदार म्हणून स्वत:ची छाप पाडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. अनेक दशकांपासून अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा एकच पॅटर्न राहिला आहे. सुरुवातीला सुरक्षेच्या गरजांमुळे दोन्ही देशांमध्ये मैत्री होते; पण त्यानंतर निराशा, तसेच अविश्वासामुळे त्यांच्या संबंधात दुरावा निर्माण होतो. या वेळीही असंच काहीसं घडण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, अमेरिका व पाकिस्तानमधील आतापर्यंतचे संबंध कसे राहिले? दोन्ही देशांमध्ये वेळोवेळी दुरावा का निर्माण झाला? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…
अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्यामागे पाकिस्तानच्या लष्कराची मोठी भूमिका राहिली आहे. अमेरिकेच्या एकापाठोपाठ येणाऱ्या सरकारांना पाकिस्तानी लष्करानं नेहमीच आपल्या धोरणात्मक मूल्याची खात्री पटवून दिली आहे. अस्थिर परिस्थिती व त्यावर प्रभाव पाडण्याची हमी या आश्वासनांच्या बदल्यात पाकिस्ताननं अनेकदा अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सची मदत, आधुनिक शस्त्रे मिळवली आहेत. मात्र, पाकिस्ताननं दिलेली आश्वासन अनेकदा पूर्ण होत नाहीत, हे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या अनेक राष्ट्राध्यक्षांना कळून चुकलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांचा हा जुना पॅटर्न पुन्हा एकदा दिसून येत आहे.
असीम मुनीर यांचा दोन वेळा अमेरिका दौरा
डोनाल्ड ट्रंप यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी दोन वेळा अमेरिकेचा दौरा केला. यावेळी ट्रम्प प्रशासनानं त्यांचं खास स्वागत करून, त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जेवणासाठी निमंत्रित केलं होतं. गेल्या आठवड्यातही मुनीर यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. त्यामुळे पाकिस्तान व अमेरिका यांच्यातील संबंध सुधारणार, असे अंदाज अनेक जण वर्तवीत आहेत. मात्र, काहींच्या मते त्यांची ही वाढती जवळीक फार काळ टिकणार नाही. कारण- दोन्ही देशांमधील संबंधांचा इतिहास हा वारंवार सहकार्य आणि दुरावा अशा चक्रातून गेला आहे.
आणखी वाचा : निवडणूक अधिकाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण असते? निवडणूक आयोगाचे की राज्यांचे?
पाकिस्तान-अमेरिका संबंधाला कशी सुरुवात झाली?
अमेरिका-पाकिस्तान संबंधांची पहिली सुरुवात १९५० च्या दशकात झाली. त्यावेळी पाकिस्ताननं सोविएत युनियनच्या विरोधात अमेरिकेला साथ दिली होती. त्या बदल्यात अमेरिकेनं पाकिस्तानला मोठी आर्थिक मदत व शस्त्रांचा पुरवठा केला होता. पण, त्यांनी त्यातील बहुतांश शस्त्रं भारताशी असलेल्या शत्रुत्वासाठीच वापरली. सोविएत युनियननं अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर १९८० च्या दशकात पाकिस्तान व अमेरिकेतील मैत्री पुन्हा बहरली. त्यावेळी पाकिस्तान हा अमेरिकेसाठी ‘फ्रंटलाइन स्टेट’ म्हणून पुन्हा केंद्रस्थानी आला. अमेरिका आणि सौदी अरेबियाची मदत घेऊन पाकिस्ताननं जिहादी गटांना मदत केली, ज्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराचा प्रभाव वाढला. सोविएत युनियननं केलेल्या त्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान अस्थिर झाले आणि दहशतवाद सीमा ओलांडून इतर देशांमध्ये पसरला.
पाकिस्तानकडून अमेरिकेला अनेक आश्वासनं
९/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तान व अमेरिका यांच्यातील संबंधांना पुन्हा नवं वळण मिळालं. पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी अमेरिकेला ‘दहशतवादविरोधी लढाईत’ सहकार्याचे आश्वासन दिलं आणि त्या बदल्यात अब्जावधी डॉलर्सची मदत मिळवली; पण हा हल्ला घडवून आणणारा ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानच्या लष्करी अकादमीजवळच लपून बसलेला होता, हे नंतर अमेरिकेच्या लक्षात आले. त्याच वेळी तालिबानचे अनेक गट पाकिस्तानी भूमीत सुरक्षित आसरा घेत असल्याचेही उघड झाले. अमेरिकेकडून पाकिस्तानला नेहमीच मदत केली जाते; पण त्या मदतीचा उपयोग पाकिस्तान स्वत:च्या भूराजकीय हितसंबंधांसाठी करतो. त्यामुळेच या वेळीही हाच पॅटर्न पुन्हा एकदा दिसू शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

२०२१ मध्ये बिघडले होते संबंध
२०२१ मध्ये अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघारी घेतल्यानंतर अमेरिका-पाकिस्तान संबंध पुन्हा बिघडले. तालिबानचा नवा गट तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) पुन्हा सक्रिय झाल्याने पाकिस्तानची डोकेदुखी वाढली. अमेरिकेनं आर्थिक मदत थांबवल्यानंतर त्यांच्या देशाची आर्थिक परिस्थिती आणखीनच बिकट झाली. अर्थव्यवस्था कोलमडल्याने पाकिस्तानमधील राजकारण अधिकाधिक लष्करी प्रभावाखाली आले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा मलीन झाली.
लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे प्रयत्न काय?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा अमेरिकेसमोर स्वत:ला पाकिस्तानला एक महत्त्वाचा मध्यस्थ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना तालिबान गटांवर नियंत्रण ठेवण्याचं व प्रादेशिक स्थिरता राखण्याचं आश्वासन दिलं आहे. परंतु, अमेरिकेचा पाकिस्तानवरील अविश्वास आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक मतभेद आजही कायम आहेत.पाकिस्तानचं सैन्य नेहमीच मदत मिळविण्यासाठी आश्वासनं देते; पण मदत घेतल्यानंतर त्यापैकी काही निवडक आश्वासनंच पूर्ण करते. जेव्हा दोन्ही देशांचे स्वार्थ पूर्ण होतात, तेव्हा त्यांच्यातील संबंधांमध्येही दुरावा निर्माण होतो. त्यामुळे पाकिस्तानला तात्पुरता फायदा मिळत असला तरी त्यांच्या स्थिरतेला दीर्घकाळ धक्का बसतो. दरम्यान, अमेरिकेनं आर्थिक सहकार्य करूनही पाकिस्तानची अर्थव्यवस्था ढासळली आहे. लोकशाहीवर मर्यादा आल्यानं तेथील लोकांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.
हेही वाचा : निवडणूक अधिकाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण असते? निवडणूक आयोगाचे की राज्यांचे?
अमेरिकेला पाकिस्तानकडून काय हवंय?
पाकिस्तानमध्ये लिथियम, तांबे व दुर्मीळ खनिजे यांसारख्या मौल्यवान खनिजांचा मोठा साठा आहे; पण त्याचा पुरेसा वापर झालेला नाही. त्याशिवाय बलुचिस्तानमधील रेको डिक ही तांबे व सोन्याची जगातील सर्वांत मोठी खाण आहे. ही दुर्मीळ खनिजे काढण्यासाठी पाकिस्तान व अमेरिकेत चर्चा सुरू आहे. सध्या दुर्मीळ खनिजांचा जागतिक पुरवठा चीनच्या हातात असून, अमेरिका त्याला पर्याय शोधत आहे. दुर्मीळ खनिजांमध्ये स्कँडियम, यट्रियम व लँथनाइड्सचा समावेश आहे. ही खनिजं पृथ्वीच्या कवचात सापडतात; पण त्यांची उत्खनन प्रक्रिया महागडी असून, ती काढणं पर्यावरणासाठीही हानिकारक आहे. वाहन ते संरक्षण क्षेत्रापर्यंतच्या सर्व उद्योगांसाठी या दुर्मीळ खनिजांपासून तयार झालेलं चुंबक खूप महत्त्वाचं मानलं जातं. अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या या खनिजांसाठी सध्या चीनवर अवलंबून आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील दुर्मीळ खनिजे मिळवण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत.