यंदाच्या खरीप हंगामात बासमती तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पादन का कमी होणार आहे ? त्याचा निर्यातीवर, ग्राहकांवर आणि शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे ? त्या विषयी…

यंदा बासमतीचे उत्पादन घटणार ?

यंदाच्या खरीप हंगामात बासमती तांदळाचे उत्पादन तब्बल दहा लाख टनांनी घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्पादनातील ही घट अपुऱ्या पावसाअभावी होणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या अखेरीस मोसमी पाऊस देशाच्या बहुतेक भागात सक्रिय झाला. जुलैच्या अखेरीच्या दहा दिवसांत पाऊस झाल्यानंतर पुन्हा जवळपास संपूर्ण ऑगस्ट महिना पावसात खंड पडला होता. सप्टेंबरची सुरुवातही अडखळत झाली. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे मोसमी पावसाने अपवाद वगळता देशभरातील बहुतेक राज्यात पावसाची सरासरी गाठली. पण, पाऊस वेळेत झाला नाही. त्यामुळे भात लागण वेळेत झाली नाही. भाताची वाढ चांगली झाली नाही. यंदा देशात माघारी मोसमी पाऊसही अपेक्षित झाला नाही. त्याचा परिणाम म्हणून यंदा देशात खरीप हंगामात बासमती तांदळाच्या उत्पादनात सुमारे दहा लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. देशात सरासरी १०० लाख टन बासमती तांदळाचे उत्पादन होते, यंदा ८० ते ९० लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – विश्लेषण : धारावीतील टीडीआर सक्ती का धोक्याची?

बासमती तांदळाच्या दरात वाढ होणार ?

कमी उत्पादनाच्या भीतीने बासमती तांदळाच्या सर्व प्रकारच्या वाणाच्या दरात सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटलने दरवाढ झाली आहे. मागील वर्षी १५०९ वाणाच्या बासमती तांदळाला आठ ते आठ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर होता. आता तो आठ हजार ५०० ते नऊ हजार रुपये क्विंटलवर गेला आहे. पुसा बासमतीला आठ हजार ५०० ते नऊ हजार दर होता. आता तो नऊ हजार ५०० ते १० हजार रुपयांवर गेला आहे. ११२१ वाणाच्या बासमतीला नऊ हजार ५०० ते १० हजार रुपये दर होता, तो आता १० हजार ५०० ते ११ हजार रुपये प्रति क्विंटलवर गेला आहे. दरातील तेजी यंदा वर्षभर कायम राहण्याचा अंदाज आहे.

बासमतीच्या निर्यातीवर परिणाम होणार ?

मागील आर्थिक वर्षात, २०२२-२३ मध्ये १.८० कोटी टन बिगर बासमती आणि ४६ लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. बिगर बासमती तांदूळ १.८० कोटी टन निर्यात झाल्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये बासमती शिवाय इतर तांदळाचे दर वाढले होते. त्यामुळे केंद्र सरकारने जून महिन्यात देशातून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात कर लागू केला होता. फक्त शेला बिगर बासमती तांदळाची निर्यात सुरू होती. त्यानंतर शेला बिगर बासमतीवरही सप्टेंबरमध्ये निर्यात कर लागू करण्यात आला होता. त्यापूर्वी तुकडा तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घालण्यात आली होती. जगभरात गेलेल्या भारतीयांकडून आणि आखाती देशातून बासमतीला मागणी वाढल्यामुळे देशाअंतर्गत बाजारात बासमतीच्या दरात तेजी आली होती. तुकडा तांदूळ निर्यात बंदी, बिगर बासमतीच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात कर आणि बासमतीच्या निर्यातीवर किमान निर्यात मूल्य लागू केल्याचा परिणाम म्हणून देशातून निर्यात होणाऱ्या बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात विस्कळीत झाली होती. यंदा कमी उत्पादनामुळे बासमती तांदळाची देशाअंतर्गत बाजारात दरवाढ होण्याची शक्यता आहे. निर्यातीवरही नियंत्रणे कायम राहण्याचा अंदाज आहे.

किमान निर्यात मूल्याचा परिणाम होणार ?

केंद्र सरकारने देशात बासमती तांदळाची उपलब्धता चांगली राहावी आणि दर नियंत्रणात रहावेत, यासाठी ऑगस्ट महिन्यात बासमती तांदळावर १२०० डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य (एमईपी) लागू केले होते. त्यामुळे बासमतीची निर्यात विस्कळीत झाली होती. शेतकऱ्यांनाही कमी दर मिळत होता. यंदाच्या नवीन हंगामातील बासमती तांदूळ बाजारात येऊ लागल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात केंद्राने किमान निर्यात मूल्य १२०० वरून ९५० डॉलर प्रति टनावर आणले आहे. त्यामुळे बासमतीची निर्यात सुरळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समित्या आणि थेट शेतकऱ्यांकडून बासमती तांदळाची खरेदी सुरू केली आहे. निर्यात वेगाने होऊ लागल्यास बासमतीचे किमान निर्यात मूल्य पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – विश्लेषण : इस्रायल-हमासदरम्यान तात्पुरत्या विरामाचा करार काय आहे?

कोणत्या राज्यांत बासमतीचे उत्पादन होते ?

देशातील पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर हे देशातील प्रमुख बासमती तांदळाचे उत्पादक राज्ये आहेत. जुलै २०११ ते जून २०१२ या पीक वर्षांत देशात ५० लाख टन बासमतीचे उत्पादन झाले होते. २०२० नंतर सरासरी १०० लाख टन बासमतीचे उत्पादन होत आहे. यंदा ते ८० ते ९० लाख टनांच्या घरात राहण्याचा अंदाज आहे. देशातून प्रामुख्याने सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका आणि युरोपीयन देशांतही बासमती तांदळाची निर्यात होते. भारताशिवाय पाकिस्तान, इंडोनेशिया, नेपाळ आणि श्रीलंकेत कमी-जास्त प्रमाणात बासमतीचे उत्पादन होते. जगातील एकूण बासमती उत्पादनापैकी ८५ टक्क्यांहून अधिक बासमतीचे उत्पादन देशात होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

dattatray.jadhav@expressindia.com