अन्वय सावंत

इंग्लंडमधील बलाढ्य फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडची २५ टक्के मालकी ब्रिटनमधील व्यावसायिक सर जिम रॅटक्लिफ यांनी मिळवली आहे. युनायटेडचे मुख्य मालक असलेल्या ग्लेझर कुटुंबाकडून मालकीतील २५ टक्के भाग मिळवण्यासाठी रॅटक्लिफ यांनी तब्बल १५४ कोटी डॉलर इतकी रक्कम मोजली आहे. त्यांनी मिळवलेल्या मालकीचा मँचेस्टर युनायटेड क्लबवर काय परिणाम होणार आणि क्लबचे व्यवस्थापकीय निर्णय कोणाकडून घेतले जाणार, याचा आढावा.

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Premier League Football Manchester City emphatic win sport news
प्रीमियर लीग फुटबॉल: मँचेस्टर सिटीचा दमदार विजय
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत

रॅटक्लिफ कोण आहेत?

आघाडीची पेट्रोकेमिकल कंपनी ‘इनिऑस’चे मालक रॅटक्लिफ हे ब्रिटनमधील सर्वांत धनाढ्य व्यक्तींपैकी एक आहेत. गेल्या वर्षी रोमन अब्रामोव्हिच यांनी चेल्सी फुटबॉल क्लबची विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रॅटक्लिफ यांनी खरेदीसाठी उत्सुकता दर्शवली होती. मात्र, अखेरीस त्यांना चेल्सीची मालकी मिळवता आली नाही. त्यानंतर मँचेस्टर युनायटेडचे मालक असलेल्या ग्लेझर कुटुंबाने आपल्या ६९ टक्क्यांतील काही हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला. युनायटेड संघाची जगभरातील लोकप्रियता लक्षात घेता या क्लबमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत फायदेशीर असल्याचे रॅटक्लिफ यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी मोठी रक्कम देऊ करत युनायटेडची २५ टक्के मालकी मिळवली.

हेही वाचा >>>दुर्मिळ खनिजांबाबत वाढता चिनी वर्चस्ववाद कसा?

रॅटक्लिफ यांना महत्त्वाचे निर्णय घेता येणार का?

रॅटक्लिफ यांनी २५ टक्के मालकी मिळवली असून यापुढे क्लबचे सर्व व्यवस्थापकीय निर्णय हे त्यांच्याकडून घेतले जाणार असल्याचे मँचेस्टर युनायटेडकडून सांगण्यात आले. म्हणजेच ‘ट्रान्सफर विन्डो’मध्ये कोणत्या खेळाडूंना खरेदी करायचे आणि विकायचे, प्रशिक्षक एरिक टेन हाग यांचे भविष्य, तसेच संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड करायची आदी निर्णय रॅटक्लिफ यांच्याकडून घेतले जाणार आहेत. त्याचप्रमाणे रॅटक्लिफ यांनी युनायटेडचे घरचे मैदान असलेल्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमची क्षमता वाढवण्यासाठी आणि अन्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी ३० कोटी अमेरिकन डॉलर खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे.

ग्लेझर कुटुंबाने आपल्या मालकीतील काही हिस्सा विकण्याचा निर्णय का घेतला?

मँचेस्टर युनायटेड हा इंग्लंडमधील सर्वांत यशस्वी फुटबॉल क्लब आहे. युनायटेडने विक्रमी २० वेळा प्रीमियर लीग/इंग्लिश फर्स्ट डिव्हिजन, १२ वेळा एफए चषक, सहा वेळा लीग चषक आणि विक्रमी २१ वेळा एफए कम्युनिटी ढाल या स्पर्धांचे जेतेपद मिळवले आहे. तसेच क्लब फुटबॉलमधील सर्वांत मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स लीगचे युनायटेडने तीन वेळा जेतेपद पटकावले आहे. यापैकी बहुतांश यश हे सर ॲलेक्स फर्ग्युसन यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले आहे. मात्र, २०१३मध्ये फर्ग्युनस यांनी निवृत्ती घेतल्यानंतर युनायटेडची कामगिरी खालावली. फर्ग्युसन प्रशिक्षक असताना युनायटेडने ३८ जेतेपदे मिळवली, तर त्यांच्या निवृत्तीनंतर दहा वर्षांत युनायटेडला केवळ एकदा एफए चषक आणि दोन वेळा लीग चषक जिंकता आला आहे. त्यातच ग्लेझर यांनी केलेली प्रशिक्षकांची निवड आणि खेळाडूंची खरेदी-विक्री ही अनेकदा वादग्रस्त ठरली. दुसरीकडे युनायटेडचे कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल आणि चेल्सी या संघांनी यशस्वी कामगिरी केली आहे. त्यामुळे युनायटेडच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. या चाहत्यांनी अनेकदा ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमबाहेर ग्लेझर कुटुंबाला निषेध दर्शवला. त्यांची नाराजी लक्षात घेता ग्लेझर कुटुंबाने युनायटेडची संपूर्ण विक्री करण्याची तयारी दर्शवली किंवा काही भाग विकण्याचीही आपली तयारी असल्याचे नोव्हेंबर २०२२मध्ये जाहीर केले.

हेही वाचा >>>ओडिशातील काळ्या वाघांचे रहस्य काय? पट्टेरी वाघांपेक्षा हे वेगळे असतात?

ही संपूर्ण प्रक्रिया कशी राबवली गेली?

ग्लेझर कुटुंबाने युनायटेडची विक्री करण्याची तयारी दर्शविल्यानंतर रॅटक्लिफ आणि कतारमधील सत्ताधीश जसिम बिन हमाद अल थानी यांनी खरेदीसाठी पुढाकार घेतला. शेख जसिम यांनी तर युनायटेडची १०० टक्के मालकी मिळवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, क्लबच्या विक्रीसाठी ग्लेझर यांची ७६२ कोटी डॉलरची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. शेख जसिम, रॅटक्लिफ आणि अमेरिकेतील एलियट मॅनेजमेंट समूहाने खरेदीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश मिळवला. यानंतरही अपेक्षित रक्कम देण्याची कोणीही तयारी न दर्शवल्याने प्रक्रियेला विलंब झाला. शेख जसिम यांनी मे महिन्यात ६३५ कोटी डॉलरची बोली लावली. पुढील महिन्यात त्यांनी आपली बोली आणखी वाढवली. मात्र, ग्लेझर यांनी ही बोली स्वीकारण्यास फार वेळ लावल्याने अखेर शेख जसिम यांनी ऑक्टोबरमध्ये आपली बोली मागे घेतली. त्यानंतर रॅटक्लिफ यांनी पूर्ण मालकीऐवजी २५ टक्के मालकी मिळवण्यासाठी १५४ कोटी डॉलर देण्याची तयारी दर्शवली. अखेर ग्लेझर कुटुंबाने त्यांची ही ‘ऑफर’ स्वीकारली. आता रॅटक्लिफ यांच्याकडून घेण्यात येणारे निर्णय युनायटेडसाठी फायदेशीर ठरतील आणि दशकभरापासूनचा प्रीमियर लीग जेतेपदाचा दुष्काळ युनायटेड लवकरच संपवेल अशी चाहत्यांना आशा असेल.