World Food Safety Day: आहार आपल्या शरीराचं इंधन असतं. तुम्ही रोज घेत असलेला आहार किती पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे याची माहिती खरंच तुम्ही घेता का? किंवा आपण रोज जे अन्न ग्रहण करत आहोत ते किती सुरक्षित आहे, याबाबत आपल्यापैकी किती जणांना खात्री आहे. याचं उत्तर खरं तर आपल्याला देता येणार नाहीच. अन्नातून झालेल्या विषबाधा होण्याच्या घटना तर आहेतच, मात्र अलीकडेच घडलेल्या काही घटना म्हणजे झेप्टो प्रकरण, आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडणं… तसंच ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्यामुळे मुलीचा मृत्यू. या सर्व घटना ऑनलाइन पद्धतीने मागवलेल्या खाद्यपदार्थांच्याबाबत घडलेल्या आहेत. मग प्रश्न असा आहे की, ऑनलाइन मागवलेल्या खाद्यपदार्थांच्या बाबतीतच असं का होतं? तर नाही. विषबाधा किंवा अन्नपदार्थांमुळे शरीरात होणारा बिघाड हा आपण अन्न कोणते खातो, कोणत्या प्रकारे खातो, ते भेसळयुक्त आहे की ताजे या सर्व गोष्टींवर अवलंबून असते.
आपण रोज जेवणात वापरत असलेले मसाले, तूप, दूध यामध्ये भेसळ असल्याचे अनेकदा उघड झालेले आहे. FSSAI ने सांगितलेल्या अटी नेमक्या किती कंपन्या पाळतात, याबाबतही प्रश्नचिन्ह आहेच.

७ जनू हा दिवस दरवर्षी World Food Safety Day अर्थात जागतिक खाद्य सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी या दिवसाची थीम आहे, ‘Food Safety: Science in action’. याचाच अर्थ विज्ञानाचा वापर करून आपण अन्नाला विषारी होण्यापासून कसं वाचवू शकतो. अन्नसुरक्षेत केवळ स्वच्छतेचा मुद्दाच नाही, तर विज्ञानही सामील आहे. अनेक वैज्ञानिक पद्धतींमुळे आपल्याला अन्न कधी आणि कसं सुरक्षित आहे हे समजतं आणि अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायला हवं हेही कळतं.

WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन)ने अन्नसुरक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, दूषित किंवा खराब अन्न दरवर्षी चार लाख २० हजार लोकांच्या मृत्यूला कारण ठरत आहे. यामध्ये सर्वाधिक लहान मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. पण, हे आजार नेमके येतात कुठून, त्यामागे नेमके कोणते घटक आहेत?

१. बॅक्टेरिया : साल्मोनेला, लिस्टेरिया आणि ई.कोलाई यांसारखे बॅक्टेरिया कच्चं मांस, दूषित पाणी किंवा खराब भांड्यांमुळे तुमच्या अन्नात प्रवेश करतात, त्यामुळे मांसाहार करताना ते ताजं आहे याची खात्री करून घ्या. तसंच ते योग्यप्रकारे पूर्ण शिजवून त्याचे सेवन करा. भांडी स्वच्छ करण्याची पद्धत आणि ती कोरडी करून ठेवण्याची एकंदर पद्धत पडताळून घ्या आणि त्याबाबत अधिक काळजी घ्या.

२. व्हायरस : नोरोव्हायरस हा प्रकार सॅलेड, फळं किंवा सी-फूडमधून तुमच्या शरीरात प्रवेश करतात. अशावेळी फळं आणि सॅलेड हे दोन्ही स्वच्छ धुवून खावीत. तसंच मासे ताजेच खावेत. फ्रिजमधून स्टोर करून ठेवलेले खावू नयेत.

३. केमिकल : कीटकनाशाकांचा अतिवापर किंवा चुकीच्या पद्धतीने साठवणूक केल्याने अन्नपदार्थांमध्ये विषारी घटक जाऊ शकतात, त्यामुळे शक्यतो ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेली फळं-भाज्या खावेत.

४. पॅरासाइट्स : टेपवर्मसारखे परजीवी अर्धवट शिजलेल्या मांसातून किंवा दूषित पाण्यामुळे तुमच्या शरीरात शिरकाव करू शकतात, त्यामुळे मांसाहारी पदार्थ जर तुम्ही बाहेर खात असाल तर सावधानता बाळगा. कारण अनेकदा हॉटेल्समध्ये लवकरात लवकर एखादा पदार्थ सर्व्ह करण्यासाठी तो आधीच अर्धा शिजवू ठेवला जातो, त्यामुळे त्याच्यावर बॅक्टेरिया किंवा टेपवर्मसारखे परजीवी वाढू शकतात.

अनेकदा खाद्यपदार्थांमध्ये अडल्ट्रेशन म्हणजेच भेसळ केली जाते. साधारणपणे दूध, तूप, तेल, बटर किंवा मसाले यांमध्ये भेसळ केली जाते. अशावेळी ही भेसळ कशी ओळखावी, याबाबतही जाणून घेऊ…

दुधातली भेसळ

दुधात पाण्याची केलेली भेसळ ओळखणं सोपं आहे. ही भेसळ ओळखण्यासाठी कोणत्याही भांड्याच्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका. दूध कोणत्या प्रकारची रेषा तयार करते आणि खाली पडते ते पाहा. जर दूध पांढऱ्या रंगाच्या रेषेतच पडले तर ते खरे आहे आणि जर ते रेषा तयार करत नसेल आणि सलग खाली पडेल तर त्या दुधात पाण्याची भेसळ केलेली आहे.

बटरमधील भेसळ

विकत मिळत असलेल्या बटरमध्ये स्टार्च मिसळलेले असते. यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात बटरचा एक तुकडा टाका. त्या वाटीत आयोडीन सोल्यूशनचे २ ते ३ थेंब टाका. शुद्ध बटर असेल तर त्याचा रंग बदलणार नाही आणि भेसळयुक्त असेल तर त्याचा निळसर रंग आलेला दिसेल.

तुपातील भेसळ

तुपामध्ये मॅश केलेले बटाटे किंवा रताळे यांसारखे स्टार्च मिसळलेले असते. हे तपासण्यासाठी एका पारदर्शक भांड्यात अर्धा चमचा तूप घाला, त्यात आयोडीनचे २ ते ३ थेंब घाला. भेसळयुक्त तुपाचा रंग निळा दिसू लागेल. जर तूप शुद्ध असेल तर रंग तोच राहील.

पीठ किंवा मसाल्यातील भेसळ

पिठात अनेकदा विशिष्ट सफेद रंगाचा भुसा किंवा न निवडलेले धान्यांतील किडे असा समावेश असतो. यासाठी पीठ एका काचेच्या वाटीत काढून ठेवा. थोडावेळ ते न हलवता ठेवा आणि काही वेळाने तुम्हाला त्यावर किडे किंवा त्यांचे अवशेष दिसतील. अर्थात, हे साधारणपणे डोळ्यांना दिसणार नाही.

अन्नपदार्थांमधील भेसळ ही एक गंभीर समस्या झाली आहे. भेसळ जरी सर्रासपणे केली जात असली तरी यामुळे आरोग्याचं न भरून निघणारं नुकसान होऊ शकतं. केवळ कॅन्सरसारखे गंभीर आजारच नाही तर पोटाचे त्रास, किडनीसंबंधित आजार, लिव्हरचे आजार आणि न्यूरोलॉजिकल समस्यादेखील उद्भवू शकतात. भेसळयुक्त अन्नपदार्थांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया, व्हायरस असू शकतात, जे फूड पॉइजनिंग म्हणजेच विषबाधेला कारणीभूत ठरतात. काही भेसळयुक्त पदार्थांमध्ये कॅन्सरला कारणीभूत असलेली रसायनं किंवा इतर घातक पदार्थ असू शकतात, त्यामुळे शक्यतो ताजे शिजवलेले अन्न किंवा मांसाहारी पदार्थ खावेत. पॅकेज्ड फूडच्या संदर्भात खात्रीशीर कंपनीची उत्पादनं वापरावीत.

खाद्यपदार्थांबाबत एफडीएचे सुरक्षा, गुणवत्ता आणि लेबलिंग सुनिश्चित करण्यासाठी वेगळे नियम आहेत. यामध्ये अन्न उत्पादनांच्या निर्मिती, प्रक्रिया आणि पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांचे नियमन तसंच लेबलिंगवर आवश्यक माहिती देणे याचा समावेश आहे.
सध्या पॅकेज्ड फूड वापरण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. मात्र, ते वापरतानाही काही विशिष्ट काळजी घेणे महत्त्वाचे आहे. किंबहुना ते वापरणे टाळावे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि लेबलिंग याबाबतही एफडीएची नियमावली आहे.

एकंदर एफडीए (अन्न व औषध प्रशासन) किंवा एफएसएसएआय (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) काम करत असतील तरीही प्रत्येक ग्राहकाने आपण सेवन करत असलेला पदार्थ आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त किंवा किती हानीकारक आहेत याची खात्री करून घेणं गरजेचं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.