भक्ती बिसुरे संयुक्त राष्ट्र संघटनेकडून मागील दहा वर्षांपासून प्रकाशित करण्यात येणारा जागतिक आनंद अहवाल (वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट) नुकताच प्रकाशित करण्यात आला असून यंदाही सलग दुसऱ्यांदा फिनलंड या चिमुकल्या देशाने जगातील सर्वात आनंदी देश होण्याचा मान पटकावला आहे. केवळ ११ वर्षांच्या कालावधीत फिनलंड सहाव्यांदा जगातला सगळ्यात आनंदी देश ठरला आहे. २० मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी त्याच दरम्यान संयुक्त राष्ट्र संघटना जागतिक आनंद अहवाल प्रसिद्ध करते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारताने या अहवालात १० स्थानांची प्रगती केली आहे, हे खरे असले तरी भारताचा क्रमांक या यादीच्या तळाशीच लागत असल्याचे चित्र आहे. जागतिक आनंद अहवाल म्हणजे काय? कोणत्याही देशाच्या प्रगतीचा निकष ठरवण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाची (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट - जीडीपी) मोजदाद केली जाते. मात्र, देशाची प्रगती केवळ सकल राष्ट्रीय उत्पादनावर नव्हे तर त्या देशातील जनतेच्या आनंदाच्या निकषावरही मोजण्यात यावी याकडे आशिया खंडातल्या भूतान या चिमुकल्या देशाने जगाचे लक्ष वेधले आणि ग्रॉस डोमेस्टिक हॅपिनेस मोजण्यास सुरुवात झाली. कोणताही देश किंवा समाजाला विकासाच्या मार्गावर नेण्याचा मार्ग म्हणजे नागरिक आनंदात असणे हे जगाच्या मनावर ठसवले. त्यानंतर २० मार्च हा दिवस ‘जागतिक आनंद दिवस’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. गेल्या सुमारे ११ वर्षांपासून दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेकडून जगातील देशांच्या आनंदाचे मूल्यमापन करणारा जागतिक आनंद अहवाल प्रकाशित केला जातो. आता सरकार आणि प्रशासनाकडूनही हा अहवाल गांभीर्याने घेतला जात असल्याचे दिसून येते. आनंद मोजण्याचे निकष कोणते? जागतिक आनंद अहवाल तयार करताना त्यामध्ये विविध निकषांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने देशाचे दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक सलोखा, निरोगी आणि निकोप आयुष्याची शाश्वती, भ्रष्टाचाराचे कमीत कमी अस्तित्व, उदारपणा किंवा दातृत्व, स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे तसेच जगण्याचे स्वातंत्र्य अशा अनेक निकषांवर नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. चिंता, राग आणि दु:ख या निकषांवर नागरिकांनी आपले असमाधान व्यक्त केले आहे. देणगी देणे किंवा गरजूंना मदत करणे, स्वयंसेवक म्हणून सामाजिक कामात सहभाग या बाबी नागरिकांच्या आनंद आणि समाधानाचा एक महत्त्वाचा स्रोत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जागतिक आनंद यादीतील भारताचे स्थान! (फोटो ग्राफिक्स - लोकसत्ता ग्राफिक्स टीम) सर्वात आनंदी देश कोणते आणि का? जागतिक आनंद अहवालात यंदा सलग सहाव्यांदा फिनलंड या देशाने पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. डेन्मार्कने मागील वर्षीप्रमाणेच यंदाही या क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. मागील वर्षी चौथ्या क्रमांकावर असलेल्या आइसलँडने यंदा तिसरे स्थान मिळवले आहे. चौथ्या क्रमांकावर इस्रायलने, तर पाचव्या क्रमांकावर नेदरलँड्सने स्थान मिळवले आहे. अत्यल्प प्रमाणात असलेली गुन्हेगारी, अपरिमित निसर्ग सौंदर्य आणि त्याचे संवर्धन, उत्कृष्ट आरोग्य सुविधा, सहकार्य आणि एकोप्याने जीवन जगण्यास प्राधान्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरिबीचे प्रमाण अत्यंत कमी या कारणांमुळे फिनलंड हा देश सलग सहाव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. जागतिक क्रमवारीत आपण पाकिस्तानच्याही खाली! WHI ची यादी जाहीर भारताचे स्थान कुठे? मागील वर्षी जागतिक आनंद अहवालात १३६व्या स्थानावर असलेल्या भारताने यंदा प्रगती केली आहे. यंदाच्या अहवालात भारताने १२६वे स्थान पटकावले आहे. तालिबानच्या अन्यायाच्या झळा सोसणारा अफगाणिस्तान मागील वर्षी १४६व्या क्रमांकावर होता तो यंदा १३७व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही भारताचे इतर शेजारी देश या अहवालात भारतापेक्षा वरचे स्थान राखून आहेत. नेपाळने ७८वे स्थान, बांग्लादेशने ११८वे स्थान, पाकिस्तानने १०८वे तर श्रीलंकेने महागाईच्या झळा सोसल्यानंतरही ११२वे स्थान प्राप्त केले आहे. गेले वर्षभर युद्धाचा सामना करणारे युक्रेन आणि रशिया हे देशही अनुक्रमे ९२व्या आणि ७०व्या स्थानावर आहेत, ही या अहवालातील सगळ्यात धक्कादायक माहिती आहे. दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या रोजगार आणि उपजीविकेच्या संधी, भ्रष्टाचाराचा उद्रेक, प्राथमिक शिक्षणाच्या सुविधांमधील असमानता अशा कारणांमुळे भारतीय आनंदापासून दूर असल्याचे या अहवालातील निरीक्षणांवरून स्पष्ट होत आहे. मादागास्कर, झांबिया, टांझानिया, मालावी, बोट्सवाना, काँगो, झिम्बाब्वे, लेबनन हे देश या यादीत भारतानंतर आहेत. विश्लेषण : हुंडा दिला म्हणून मुलीचा वडीलांच्या संपत्तीवर अधिकार उरत नाही? उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल भारताचे स्थान इतके तळाला का? संपत्ती आणि आनंद यांचा परस्पर संबंध आहे, असे मानले तर भारतात मूठभर लोकांकडे एकवटलेली श्रीमंती आणि बहुसंख्य लोकसंख्येतील गरिबी हे आनंद अहवालात स्थान घसरण्याचे प्रमुख कारण आहे. गरिबी, भ्रष्टाचार, पायाभूत सुविधांचा अभाव, सार्वजनिक आरोग्य सुविधांचा दर्जा, मानसिक आरोग्यासाठी पोषक आणि पूरक वातावरण नसणे अशा अनेक बाबी या भारतीयांना आनंदी राहण्यापासून दूर ठेवणाऱ्या ठरत असल्याचे या अहवालाच्या निमित्ताने सांगण्यात येते. bhakti.bisure@expressindia.com