या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

World Heritage Day 2023 : दर वर्षी १८ एप्रिल रोजी ‘जागतिक वारसा दिन’ म्हणजेच ‘वर्ल्ड हेरिटेज डे’ साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक- सांस्कृतिक वास्तू व स्थळ दिवस म्हणूनही प्रसिद्ध आहे. या दिवशी मुख्यत्वे सांस्कृतिक वारशाच्या उदात्तीकरणासाठी तसेच ऐतिहासिक वास्तू व स्थळे यांच्या जतनाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. जगभरात वेगवेगळ्या व विशेष संस्कृतींच्या जतन व संरक्षणासाठी या दिवसाचे औचित्य साधून लोकांना प्रोत्साहित केले जाते. हा सांस्कृतिक वारसा आपल्या पुढील पिढीसाठी अबाधित ठेवण्याकरिता हा दिवस आवर्जून साजरा केला जातो. आयकोमॉस (ICOMOS-International Council on Monuments and Sites) या कौन्सिलने सर्वात प्रथम १९८२ साली अशा प्रकारचा दिवस साजरा करण्यात यावा, ही संकल्पना मांडली. त्यांनी मांडलेली ही संकल्पना युनेस्कोने मान्य केली. त्याच्याच पुढील वर्षात म्हणजे १९८३ साली जगातील पहिला ‘हेरिटेज डे’ साजरा करण्यात आला. त्यानंतर हा दिवस जनजागृती निर्माण करण्यासाठी जगभरात साजरा करण्यात येऊ लागला. दर वर्षी एका थीमच्या (विषयाच्या) माध्यमातून हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये या दिवसाची थीम ‘हेरिटेजमधील बदल’ अशी आहे. ‘वातावरणातील बदल व त्यांचा होणारा संस्कृतीवरील परिणाम’ असा मुख्य विषय या वर्षी ‘हेरिटेज डे’च्या निमित्ताने हाताळला जाणार आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : Camille Claudel : एका फ्रेंच (श)सकुंतलेची कहाणी नेमकी आहे तरी काय?

हवामानबदल व संस्कृती यांचा नेमका संबंध काय ?

सर्वसाधारण वातावरणातील बदल म्हटल्यावर आपल्या समोर एक विशिष्ट चित्र उभे राहते. यात अवकाळी पाऊस, वाढते तापमान, दीर्घकाळचा दुष्काळ, समुद्राची वाढती पातळी, जलमय होणारी शहरे, वितळणाऱ्या हिमनद्या इत्यादींचा समावेश असतो. परंतु निसर्गात, वातावरणात होणारा बदल हा एवढ्यापुरताच मर्यादित नाही. किंबहुना या बदलांनी होणारे नुकसान हे दूरगामी आहेत. ज्या वेळेस आपण वातावरणातील बदलांची चर्चा करतो त्या वेळेस केवळ वातावरणीय बदलांच्या बायोफिजिकल प्रभावांनाच प्राधान्य देतो. परंतु येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे हे बदल एखादे शहर, समाज किंवा एखाद्या संस्कृतीच्या मुळावर घाव घालत असतात. त्यांचा परिणाम हा प्रथमदर्शनी दृश्यमान नसला तरी त्याची परिणती ही त्या संस्कृतीच्या शेवटाकडे घेऊन जाणारी असते. मुळातच संस्कृती असे म्हटले की, आपल्या समोर विशिष्ट प्रथा, परंपरा येतात. या प्रथा, परंपरा निश्चितच एखाद्या संस्कृतीचा भाग असतात. परंतु एखादा समाज मोठ्या काळासाठी ज्या ठिकाणी राहतो, वावरतो; त्या ठिकाणच्या वातावरणाचा, निसर्गाचा परिणाम हा त्याच्या राहणीमानावर होत असतो. आणि त्यातूनच त्याची संस्कृती बहरास येते. कोळी समाज हा मुंबईचा मूळ रहिवासी मानला जातो. मुंबई ही समुद्रकिनारपट्टीवर वसलेली आहे. त्यामुळे साहजिकच इथल्या निसर्गाचा व वातावरणाचा परिणाम हा त्यांच्या खाद्यसंस्कृतीपासून ते सण-उत्सव, बोलीभाषा या सर्वांवर जाणवतो. शहरीकरणाच्या प्रक्रियेत या संस्कृतीने आपली पाळेमुळे स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर जगाच्या नकाशात गेल्या काही दशकांतील वेगाने होणाऱ्या समुद्रपातळीतील वाढीमुळे किनारी भागातील समाजांना स्थलांतर करणे अपरिहार्य झाले आहे. एकदा ठिकाण बदलले की, तिथली संस्कृतीदेखील बदलते हे येथे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच हजारो वर्षांचा इतिहास व परंपरा बदलण्यास काही काळाचा अवधी पुरेसा असतो. म्हणूनच या वर्षीच्या ‘हेरिटेज डे’च्या निमित्ताने पर्यावरणबदल व संस्कृती यांच्यातील नाते समजून घेण्यासाठी युनेस्कोने ही थीम स्वीकारली आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : NCRT textbook revision : इतिहास का शिकायचा? पुनर्लेखनाचे परिणाम काय?

स्थलांतर, हवामानबदल आणि संस्कृती

ज्या समुदायांना आपल्या जन्मभूमीतून स्थलांतर करावे लागते त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. अशा समाजांना हवामान-प्रेरित स्थलांतरामुळे त्यांचे काही भाग किंवा सर्व सांस्कृतिक विश्वास- श्रद्धा आणि मूल्ये गमावून बसावी लागतात. सांस्कृतिक समजुती आणि मूल्यांबद्दल समुदायाची दृढ आसक्ती त्यांच्या जगण्यासाठीच्या स्थलांतरात अडथळा आणू शकते हेदेखील तितकेच सत्य आहे. म्हणजेच हे समाज केवळ त्यांची सांस्कृतिक मूल्ये गमावत नाहीत, तर त्याच वेळी त्यांच्या जगण्याचा आधार असलेला विश्वासही गमावत असतात हे येथे अधोरेखित करणे गरजेचे आहे. धये या हिमालयीन गावाची व्यथा अशीच आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे १२ हजार फूट उंचीवर वसलेले आहे. तापमानवाढीचा परिणाम या गावालादेखील बसला आहे. तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या वितळण्याला प्रचंड वेग आला आहे. हे गाव उपजीविकेसाठी नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून होते. निसर्गातील बदलामुळे गावाच्या उपजीविकेच्या साधनांवर बंधने आली आहेत. इथली जमीन कोरडी आणि नापीक झाली आहे. त्यामुळे २६ कुटुंबांपैकी १७ कुटुंबांनी हे गाव सोडण्याचा निर्णय घेतला. तर उरलेल्या नऊ कुटुंबांनी आपला भाग व संस्कृती सोडून जाण्यास नकार दिला. बाकी गावकर्‍यांनी जवळपास एक मैल उतारावर मुबलक पाणी असलेल्या ठिकाणी स्थलांतर केले. या स्थलांतरित संस्कृतीच्या समाजात याक या प्राण्याला अनन्यसाधारण महत्त्व होते व आहे. त्यांच्या अनेक पिढ्या याकचे संगोपन करत आल्या आहेत. याक हा प्राणी त्यांच्यासाठी सांस्कृतिक ओळख मानला जातो. परंतु त्यांच्या नवीन वसाहतीमध्ये याकचे संगोपन करणे जवळपास अशक्य आहे, कारण त्यांना तसे करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे याकचे संगोपन न करता येणे हे या स्थलांतरित लोकांसाठी ‘संस्कृती, सांप्रदायिक ओळख आणि स्थानाची भावना’ नष्ट होत असल्याचे दर्शवते. व अशाच प्रकारे एखादा सांस्कृतिक वारसा आपल्या शेवटाकडे जातो. आज धेय गावातील स्थलांतरित लोकांना आपला निर्णय चुकल्याची भावना सतावत आहे.

प्रभावी संस्कृती आणि वातावरणातील बदल जीवघेणा ठरू शकतो का?

अनेक शतकांच्या संस्कृतीचा त्याग न करणे हेदेखील काही वेळेस जीवघेणे ठरू शकते. याचे उत्तम उदाहरण अलास्का येथे पाहायला मिळते. समुद्राची पातळी वाढल्यामुळे अलास्का येथील शिश्मारेफमध्ये किनारपट्टीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. शिश्मारेफ या किनारपट्टीवरील अलास्कातील एक लहान स्थानिक समुदाय आहे जिथे लोक त्यांच्या उपजीविकेसाठी समुद्रावर अवलंबून आहेत. शिश्मारेफच्या लोकांसाठी महासागर हा त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा भाग आहे. समुद्राची वाढती पातळी, बर्फ वितळणे, पूर आणि धूप यामुळे त्यांची जमीन निकृष्ट झाली आहे. शिश्मारेफच्या लोकांना जगण्यासाठी नवीन ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागणार आहे, परंतु, त्यांची गावाची जीवनशैली आणि संस्कृती गमावण्याची भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे ते स्थलांतराचा विचार करताना कचरतात. या प्रकरणात सांस्कृतिक घटक हवामानबदलाशी जुळवून घेण्यात अडथळा ठरले आहेत. त्यामुळे यांसारखी प्रकरणे हाताळण्यासाठी वातावरण व संस्कृती यांच्यातील अनुबंध समजून घेणे गरजेचे आहे. आणि तरच आपण येणाऱ्या आपत्ती-काळात योग्य त्या उपाययोजना स्वीकारू शकतो. ‘हेरिटेज डे’च्या माध्यमातून अशा नष्ट होऊ पाहणाऱ्या संस्कृतींच्या जतानाकडे साक्षेपी नजरेने पाहणे गरजेचे आहे. तसेच हवामानबदलाच्या प्रभावापासून संस्कृतीचे आणि विशेषत: असुरक्षित समुदायांचे संरक्षण करण्याच्या गरजेबद्दल आपण अधिक जागरूक असणे आवश्यक आहे. म्हणूनच वातावरणातील होणाऱ्या बदलांचा संस्कृती, वारसा- हेरिटेजवर होणारा परिणाम हा विषय घेऊन या वर्षीचा वर्ल्ड हेरिटेज दिवस साजरा केला जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World heritage day 2023 international day for monuments and sites climate action and its relation to cultural heritage svs
First published on: 18-04-2023 at 08:43 IST