रवींद्र पाठक (निवृत्त अभियंता, जलसंपदा विभाग)
तापमानवाढीमुळे जलशयांमध्ये साठवलेल्या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. हे बाष्पीभवन कसे रोखायचे, त्याविषयी…
बाष्पीभवनाचा प्रश्न किती गंभीर?
राज्याचा पाणी लेखापरीक्षण अहवाल २०२१-२२ नुसार राज्यातील मोठ्या, लहान व मध्यम प्रकल्पांची एकूण पाणीसाठवण क्षमता सुमारे १४९६ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. त्यापैकी या अहवालानुसार सरासरी सुमारे ११ टक्के म्हणजे १६५ टीएमसी पाण्याचे एका वर्षांत बाष्पीभवन होते. विदर्भात बाष्पीभवनाचा दर सर्वाधिक तर कोकणात सर्वांत कमी आहे. विदर्भात एका वर्षात २.५ ते ३ मीटर, मराठवाड्यात २ ते २.७५ मीटर, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात १.५ ते १.७५ मीटर आणि कोकणात ०.८० मीटर इतक्या खोल पाण्याचे बाष्पीभवन होते. राज्यात विभागनिहाय साठवलेल्या पाण्यापैकी सरासरी ६ ते १९ टक्के पाणी बाष्पीभवन होऊन वाया जाते. केवळ राज्याचा विचार करता बाष्पीभवनाद्वारे वाया जाणाऱ्या पाण्यामुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान होते. १६५ टीएमसी पाण्याद्वारे ८.२५ लाख हेक्टरवरील शेतीचे सिंचन होऊ शकते. पुण्याला नऊ वर्षे, तर मुंबईला तीन वर्षे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाऊ शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन पाणी वाया जाते.
हेही वाचा >>> विश्लेषण: राज्य आहे, पण राजधानीच नाही! आंध्र प्रदेशवर २ जूनपासून ही वेळ का येणार?
फक्त तापमानवाढीमुळे बाष्पीभवन होते?
फक्त वाढत्या तापमानामुळेच बाष्पीभवन होते, असा समज आहे. पण, प्रत्यक्षात बाष्पीभवनावर एकूण पाच घटकांचा परिणाम होतो. त्यात पसरलेल्या पाण्याचे क्षेत्रफळ (पाणी पसारा), तापमान, वातावरणातील बाष्पाचे प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि पाण्याची खोली यांचा समावेश आहे. वायुप्रवाह (वाऱ्याचा वेग) हा बाष्पीभवनातील अत्यंत कळीचा घटक आहे. बाष्पीभवन होणाऱ्या एकूण पाण्यापैकी ८० टक्के पाण्याच्या बाष्पीभवनासाठी वायुप्रवाह जबाबदार असतो. हिवाळा आणि पावसाळ्यात बाष्पीभवनाचा दर तुलनेने कमी असतो. मात्र, साठवलेल्या पाण्याचे क्षेत्रफळ जास्त असल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी असूनही बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा दर जास्त असतो; पण धरणांतील पाणी आटल्यामुळे पाणी पसारा कमी असतो. कोकणात हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी असतो.
बाष्पीभवन कसे मोजले जाते?
राज्यातील प्रत्येक धरणक्षेत्रावर शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या कढईच्या आकाराचे ‘पॅन इव्हयपोरी मीटर’ (बाष्पीभवन पात्र) ठेवलेले असते. त्यातील किती मिलीमीटर पाण्याचे एका दिवसात बाष्पीभवन झाले, त्या अंकाचा आणि त्या दिवसातील धरणातील पाण्याच्या एकूण क्षेत्रफळाचा गुणाकार केला जातो. या गुणाकारातून एका दिवसात किती पाण्याचे बाष्पीभवन झाले याची नोंद केली जाते. धरणनिहाय आणि हंगामनिहाय बाष्पीभवनाचा वेग भिन्न असतो. देशात महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग सर्वाधिक आहे. एका वर्षात श्रीशैलम प्रकल्पातील ३३ टीएमसी, नागार्जुन सागरमधील १६ टीएमसी आणि उजनी धरणातील २२ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढत आहे.
बाष्पीभवन रोखण्याच्या उपाययोजना काय?
तापमानवाढीमुळे जगभरातील जलाशयांतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी जगभरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात जलाशयातील पाण्यावर रसायनांचा थर तयार केला जातो. सूर्यकिरणे थेट पाण्यावर पडत नाहीत. तसेच वाऱ्याचा थेट संबंध येत नाही त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. पण, पाण्यावर सातत्याने रसायनाचा थर कायम ठेवण्यासाठी खर्चिक उपाययोजना कराव्या लागतात. तसेच वाऱ्याच्या वेगामुळे पाण्यावरील रसायनाचा थर फाटतो, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यात फारसे यश मिळत नाही. पाण्यावर रसायनाचा थर तयार करण्यासाठी विविध ग्रेडच्या फॅटी अल्कोहोलचा वापर केला जातो. दुसरा उपाय म्हणून पाण्याच्या पृष्ठभागावर स्थिर किंवा तरंगत्या आवरणांचे आच्छादन केले जाते. प्रामुख्याने जलाशयातील पाण्यावर थर्माकोल पसरले जाते. पण, वाऱ्यामुळे थर्माकोल सतत हलते. त्यामुळे हा उपाय फारसा यशस्वी ठरला नाही. पाण्यावर सावली निर्माण होईल, असे पाण्यावर तरंगणारे लहान गोळे पसरले जातात. पण, त्यासाठी दर वर्षी खर्च करावा लागतो. अमेरिका आणि युरोपात वाऱ्याचा वेग कमी करून वायुप्रवाह खंडित करण्यासाठी धरणाच्या सभोवती कमी अधिक उंचीच्या झाडांची लागवड केली जाते. पण, यापैकी कोणतीही उपाययोजना फारशी यशस्वी ठरलेली नाही. पाण्यावर रसायनाचा थर तयार करणे, थर्माकोलचा वापर करणे आणि पाण्यावर तरंगणारे गोळे पसरण्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. धरणातील पाण्याची खोली वाढवली जाते. धरणात बांध घातला जातो. पाणी कमी जागेत साठविण्याचा प्रयत्न केला जातो. बांध घालून दूरवर पसरलेले पाणी कमीत कमी जागेत साठविण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी हा सर्व प्रकार करावा लागत असल्यामुळे मोठा आर्थिक खर्च करावा लागतो.
हेही वाचा >>> २ दिवसात ३५ जण आगीच्या भक्ष्यस्थानी; नियमांकडे दुर्लक्ष होतंय का?
बाष्पीभवन रोखण्याचे पर्यावरणीय प्रारूप काय?
धरणाच्या किंवा जलाशयाच्या प्रमुख पाणीसाठवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर साठलेला गाळ काढायचा. काढलेला गाळ शेतजमिनीत किंवा धरणाच्या परिसरात पसरून रीतसर शेती सुरू करायची, प्रामुख्याने बांबू लागवड करायची. गाळ काढल्यामुळे पाणी साठ्याची खोली वाढते आणि खोली वाढल्यामुळे पाणी पसाऱ्याचे क्षेत्रफळ कमी होते. पसरलेल्या पाण्याचे क्षेत्रफळ कमी झाल्यामुळे आणि पाण्याची खोली वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. त्यासह धरणाच्या चौफेर वेगाने वाढणाऱ्या आणि कार्बन स्थिरीकरण करणाऱ्या बांबूची दाट लागवड करायची. जेणेकरून धरणाच्या चहुफेर बांबूची भिंतच तयार होईल. परिणामी, वाऱ्याचा वेग मंदावेल आणि धरणांवर बाष्पयुक्त हवा कायम राहील. सहजासहजी धरण परिसरात हवा खेळती राहणार नाही. हवेत बाष्पाचे प्रमाण पुरेसे असेल आणि हवा खेळती नसेल, अशी स्थिती निर्माण होऊन बाष्पीभवन तब्बल ८० टक्क्यांनी कमी होईल. हरित सरोवर तंत्रज्ञान, नावाने हे प्रारूप मी स्वत: मांडले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश राज्य सरकारने या प्रारूपाला मंजुरी देऊन अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. हरित सरोवर तंत्रज्ञान पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या एक व्यवहार्य पर्याय आहे.