– भक्ती बिसुरे

क्षयरोग (ट्यूबरक्युलॉसिस – टीबी) हा मागील अनेक वर्षांपासून केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरील आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान ठरत आला आहे. भारतात एचआयव्ही आणि मलेरिया या दोन आजारांनी होणाऱ्या मृत्यूंपेक्षा क्षयरोगाने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या कितीतरी अधिक आहे. ‘क्षयाचे मृत्यू रोखण्यासाठी गुंतवणूक करा’ असे आवाहन करत आज (२४ मार्च) हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक क्षयरोग जागृती दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने क्षयरोग, त्याचे स्वरूप, उपचार आणि आव्हान जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?

क्षयरोगाची सद्य:स्थिती?

जागतिक स्तरावर दररोज सुमारे २८ हजार नागरिकांना क्षयरोगाचा संसर्ग होतो. त्यांपैकी ४१०० रुग्ण दगावतात, असे जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. भारतात एचआयव्ही आणि मलेरिया या आजारांपेक्षा क्षयरोगाने दगावणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. क्षयरोगावर मात करण्यासाठी केलेली जनजागृती आणि कृती यांमुळे इ. स. २००० पासून जगभरातील ६ कोटी ६० लाख नागरिकांचा क्षयापासून बचाव करण्यात आरोग्य यंत्रणांना यश आले. मात्र, करोना महासाथीने या सकारात्मक चित्रावर पाणी फेरले. २०२० या वर्षात क्षयरुग्ण आणि त्यांचे मृत्यू हे चित्र ३६० अंशात बदलल्याचे दिसून आले आहे. क्षयरोगाच्या जगातील रुग्णांपैकी २६ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण भारतात आहेत.

क्षयरोग म्हणजे काय?

क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू सर्वसाधारणपणे फुप्फुसांवर परिणाम करतो. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून उडणाऱ्या थेंबांमधून हा रोग सहज पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा संसर्ग वेगवान असतो. लवकर निदान आणि नियमित उपचार न झाल्यास क्षयरोगाचे स्वरूप गंभीर होते, त्यातून रुग्ण दगावण्याचा धोका असतो. भारतातील लोकसंख्येपैकी सुमारे ४० टक्के लोकसंख्येमध्ये क्षयरोगाचे जीवाणू आहेत. प्रत्यक्षात त्यांपैकी सुमारे १० टक्के नागरिकांना क्षयरोग होतो. केवळ फुप्फुसांवर परिणाम करणाऱ्या क्षयरोगाला फुप्फुसांचा क्षयरोग म्हणजेच पल्मनरी ट्यूबरक्युलॉसिस, तर फुप्फुसांसह इतर अवयांवरही परिणाम करणाऱ्या क्षयरोगाला एक्स्ट्रा पल्मनरी ट्यूबरक्युलॉसिस म्हणून ओळखले जाते. मिलिअरी क्षयरोग हा प्रकार संपूर्ण शरीरावर तर मेंदूज्वर क्षयरोग हा मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो. लीम्फ नोड ट्यूबरक्युलॉसिस हा किशोरवयीन मुलींमध्ये आढळणारा गंभीर प्रकार आहे. यात मानेवर सूज येते तसेच फुप्फुसांसह सर्वच यंत्रणांवर तो परिणाम करतो. क्षयरोगाच्या दुर्मीळ प्रकारांमध्ये त्वचेचा क्षयरोग, डोळ्याचा क्षयरोग हे प्रकार मोडतात. क्षयरोगाच्या इतर काही प्रकारांचा परिणाम हृदयाचे आवरण, आतड्यांवर तसेच हाडांवरही होतो.

क्षयरोगाची कारणे, लक्षणे?

कमी झालेली रोगप्रतिकार शक्ती हे क्षयरोग होण्याचे एक सर्वसामान्य कारण आहे. एचआयव्ही, ताणतणाव, मधुमेह, फुफ्फुसांचे आजार, मद्यपान-धूम्रपान करणारे यांची रोगप्रतिकारशक्ती मुळातच कमी झालेली असते. त्यांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते. एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूचे क्षयरोग हे एक प्रमुख कारण आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीच्या शरीरात क्षयाच्या जंतूचे अस्तित्व असेल तर त्याच्या शरीरात आजार बळावण्याची शक्यता सर्वाधिक असते. क्षयरोगाची सामान्य लक्षणे आणि विशिष्ट लक्षणे असतात. दोन आठवड्यांपेक्षा जास्त असलेला खोकला हे सर्वात प्रमुख आणि मोठ्या प्रमाणावर आढळणारे लक्षण आहे. वजन कमी होणे, भूक न लागणे, रात्री ताप येणे ही सर्व प्रकारच्या क्षयरोगांची लक्षणे आहेत. छातीत दुखणे, थकवा, झपाट्याने वजन कमी होणे, थुंकीतून रक्त पडणे ही एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलॉसिसच्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने आढळणारी लक्षणे आहेत. क्षयरोग मेंदूज्वरामध्ये डोकेदुखी, ग्लानी, गुंगी अशी लक्षणे दिसतात.

मुलांमध्ये क्षयरोग?

जागतिक स्तरावर मुलांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. २०२० मध्ये करोनामुळे मुलांमधील क्षयरोगाचे चित्र चिंताजनक आहे. संभाव्य क्षयरुग्णांपैकी सुमारे ६३ टक्के मुले आणि किशोरवयीन रुग्णांपर्यंत निदान आणि उपचारांच्या सुविधा न पोहोचल्याने चिंतेचे कारण आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांमध्येही क्षयरोगाचा धोका आहे. मुले आणि किशोरवयीन रुग्णांमध्ये ज्यांचे लवकर क्षयरोगाचे निदान झाले आहे त्यांना आता सहा महिन्यांऐवजी चार महिने उपचार द्यावेत. तसेच, मेंदूज्वर क्षयरोगामध्ये एक वर्षाऐवजी सहा महिने उपचार करावेत अशी सुधारित शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. क्षयरोगावरील उपचारांसाठी उपयुक्त बेडाक्विलिन आणि डेलामॅनिड ही औषधे सर्व वयोगटातील मुलांसाठी वापरणे सुरक्षित असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

क्षयरोग बरा होत नाही?

क्षयरोग बरा होत नाही असा एक प्रचंड मोठा गैरसमज सर्व स्तरांमध्ये आहे. क्षयरोग हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. मात्र, तो पूर्ण बरा होतो. त्यासाठी लवकर निदान होणे आवश्यक आहे. क्षयरोग बरा होण्यासाठी दीर्घकालीन उपचारांची गरज आहे. या उपचारांमध्ये खंड पडू न देणे, औषधोपचारांतील सातत्य राखणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पूरक जीवनशैली, चौरस आहार, व्यायाम करणे, त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान टाळणे अशी काळजी घेतल्यास क्षयरोग पूर्ण बरा होतो.