World’s Largest Spider Web: खिडकीच्या कोपऱ्यात किंवा अगदी भिंतींच्या कोपऱ्यात आलेली जळमटं किंवा वापरात नसलेल्या दिव्याभोवतीही असणारी जळमटं… म्हणजेच कोळ्याचं जाळं. त्याला आपण कोळीष्टकं असंही म्हणतो. जंगलात गेलोच तर अनेकदा तिथेही जंगली कोळ्याची मोठी जाळी पाहायला मिळतात. असं हे कोळ्याचं जाळं मोठं म्हणजे किती मोठ्ठं असू शकतं? याचाच शोध घेण्यासाठी गेलेल्या संशोधकांना ग्रीस- अल्बानिया सीमेवर, पृथ्वीच्या पोटात, सल्फरच्या दर्पाने भरलेल्या अशाच एका अंधाऱ्या गुहेत जे दिसलं, ते कल्पनेपलीकडचं होतं!

इथे सापडलंय जगातील सर्वात मोठं कोळ्यांचं जाळं! तब्बल ११४० चौरस फूट पसरलेलं, गुहेच्या छत आणि भिंतींना चिकटलेलं… खरं तर हे दिसायला एकच एक जाळं दिसत असलं, तरी त्यात अनेक थर होते. त्याला कोळ्यांची मेगासिटी म्हणजे कोळ्यांच भलंमोठ्ठ शहर असं म्हणता येऊ शकेल. या शहरात राहतात सुमारे १,११,००० कोळी, हजारोंच्या समूहात अतिशय शांतपणे.

कोळ्यांच्या वर्तनाविषयी आजवरचे माणसाचे असलेले सर्व समज या शोधानंतर गळून पडले.

सल्फरची गुहा: अंधारात धगधगणारा जीवसृष्टीचा संसार

spider web
कोळ्याचे जाळे (फोटो सौजन्य: Freepik)

ही गुहा ‘सल्फर केव्ह’ म्हणून ओळखली जाते. या गुहेत ना सूर्यप्रकाश, ना झाडं, ना पारंपरिक अन्नसाखळी. पण पृथ्वीच्या तळातून उसळणाऱ्या सल्फरच्या झऱ्यांवर आहे जीवाणूंची गर्दी आणि त्या जीवाणूंवर जगणाऱ्या मिजेस म्हणजेच अतिशय लहान आकाराच्या घोंघावणाऱ्या कोट्यवधी माशा, जिथे भरपूर कीटक, तिथे भक्षक तर येणारच.

  • इथल्या कोळ्यांसाठी ही गुहा म्हणजे जणू स्वर्गच.
  • शत्रू नाही,
  • आणि अन्नाचा अमर्याद पुरवठा,
  • तापमान स्थिर,
  • अंधार कायम.

त्यामुळे वर्षानुवर्षं इथे राहणाऱ्या कोळ्यांच्या या जाळ्यांनी एकमेकांमध्ये एकमेकांना गोवणं, मिसळणं, आणि अखेर एकच विशाल, अखंड महाजाळ्याची रचना त्यातून तयार होणं, ही प्रक्रिया अगदी नैसर्गिकपणे, कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय नैसर्गिकरित्या पार पडलेली दिसते. आज या सल्फरच्या गुहेचा अरुंद मार्ग पूर्णपणे जाळ्यांनी व्यापला आहे. आणि पाहणाऱ्याला तो एखाद्या जिवंत वस्त्राप्रमाणे भासतो. म्हणजे हे महाजाळं श्वासोच्छवास घेत असल्याप्रमाणे ते हलतं, ताणलं जातं, तुटलं की स्वतःच स्वतःला दुरुस्त करतं…

इथे प्रामुख्याने दोन जातींचे कोळी आढळतात.

१) Tegenaria domestica (घराघरांत आढळणारा कोळी)

२) Prinerigone vagans (शीट-वीव्हर).

या दोन्ही प्रकारच कोळी आपण घरात, बाथरूममध्ये किंवा बागेत नेहमी दिसतात. त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते हे एकटेच राहण्यास प्राधान्य देतात, स्वतःचं जाळं स्वतःच विणतात आणि साधारणपणे इतर कोळ्यांपासून दूर किंवा वेगळे राहतात.

पण या सल्फर गुहेत त्यांनी स्वतःचे हे सर्व नियम मोडले.

वैज्ञानिकांना लक्षात आलं की…

  • १) हे कोळी एकमेकांना सहन करतात,
  • २) जाळ्यांचे तंतू एकमेकांत विणतात,
  • ३) एकत्र शिकार करतात,
  • ४) एकाच जागेत शांतपणे राहतात.

म्हणजे इथल्या वातावरणाने त्यांना समूहप्राणी म्हणून राहण्यास शिकवलं आहे, कोळ्यांमध्ये हे समूहात राहण्याचं वर्तन अभावानेच आढळतं. कोळ्यांची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे एकटं राहणं. पण इथे त्यांनी एक प्रकारचा सामाजिक करार केलेला दिसतो “एकमेकां करू सहाय्य… तू राहा, मी राहतो, आणि अन्न सगळ्यांसाठी पुरेसं आहे, तेही एकत्र शिकार करून खाऊ.”

कोळ्यांचं समूह वर्तन वैज्ञानिकांसाठी चक्रावून टाकणारे

वैज्ञानिकांनी या कोळ्यांचे जनुकीय नमुनेही घेतले आणि त्यातून हाती आलेल्या निष्कर्षांनी सर्वांनाच आश्चर्याचे धक्के दिले.

  • गुहेतील कोळी हे त्यांच्या इतर नातलगांपासून हळूहळू जनुकीयदृष्ट्या वेगळे होत आहेत.
  • काहींची दृष्टी कमी होत आहे
  • त्यांचे रंगही फिकट होत आहेत,
  • शरीररचनेत सूक्ष्म बदल दिसू लागले आहेत.

ही प्रक्रिया पुढे चालू राहिली, तर भविष्यात गुहेतल्या कोळ्यांमध्ये उत्क्रांती होऊन एक वेगळीच प्रजाती असित्त्वात येईल. कदाचित ती जमिनीखाली असलेल्या गुहांमध्ये राहणारी आंधळी किंवा रंगहीन कीटकांची प्रजाती असेल.

कोळ्याच्या महाजाळ्याचं वास्तुशास्त्र

हे जाळं दिसतं कसं?

  • धुक्यासारखं, पांढुरकं, लुसलुशीत कापड गुहेच्या भिंतीवर पसरलंय, असं या जाळ्याकडे पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी भासतं.
  • यातील अनेक थर जाळ्याला मजबूत करतात
  • काही धाग्यांची वीण कोळ्यांना जाळ्यात वेगाने फिरायला मदत करते
  • यातील काही थरांचा वापर कोळी एखाद्या पुलाप्रमाणे किंवा जिन्यासारखा करतात.
  • हे जाळं म्हणजे कोळ्यांचं एक वेगळं वास्तुशास्त्रच आहे. ही रचना सतत बदलत राहाते.

अशा प्रकारची रचना आपण मुंग्यांच्या वारुळात किंवा वाळवीच्या साम्राज्यात दिसते.

सल्फरच्या गुहेतील कोळ्यांची मेगासिटी आणि नवे प्रश्न

कीटकांच्या वर्तनावर वातावरणाचा किती खोल परिणाम होऊ शकतो?
कीटक आपली प्रवृत्ती किती लवचिकपणे बदलतात?
पृथ्वीच्या आजवर उघड न झालेल्या सांधी-कोपऱ्यांत आणखी काय काय दडलेलं आहे?