झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम आणि ओडिशातील आदिवासी समाजांनी गेल्या आठवड्यात करम किंवा करम पर्व हंगाम या नावाने साजरा होणारा सण साजरा केला.

करम सण म्हणजे नक्की काय?

करम सण हा करम वृक्षाची पूजा करून साजरा केला जातो. परंपरेने या वृक्षाला करम देवता किंवा करमसानी म्हटले जाते. हा देव शक्ती, तारुण्य आणि जीवनाचा देव म्हणून ओळखला जातो; या त्रयींचा प्रतीक मानला जातो आणि याच देवाच्या नावावरून या सणाचेही नामकरण झाले आहे. हा सण विशेषतः मुण्डा, हो, ओरावन, बैगा, खरिया आणि संथाळ या समाजांमध्ये लोकप्रिय आहे. तो पारंपारिकरित्या भाद्रपद महिन्याच्या एकादशीला साजरा केला जातो. मुळतः ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार हा सण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये साजरा करण्यात येतो. (साक्षी सिंग आणि केया पांडे, ‘फेस्टिवल अॆण्ड इट्स सिम्बॉलिक इंटर्प्रिटेशन: अ‍ॅन अँथ्रोपोलॉजिकल स्टडी ऑफ द कर्मा फेस्टिवल ऑफ द ओरॅओन्स इन रांची डिस्ट्रिक्ट ऑफ झारखंड’, इंटरनॅशनल जर्नल ऑफ हुमॅनिस्ट सोशल सायन्स अँड मॅनेजमेंट, जुलै-ऑगस्ट २०२४)

अधिक वाचा: Pregnancy tourism in Ladakh: प्रेग्नन्सी टुरिझम म्हणजे नक्की काय? या संकल्पनेचा संबंध इतिहासातील आर्यांच्या टोळीशी कसा जोडला गेला?

या वृक्षाची पूजा कशी केली जाते?

या वर्षी हा सण १४-१५ सप्टेंबरला साजरा करण्यात आला. पवित्र करम वृक्ष हा या सणाचा प्रमुख घटक आहे. वृक्षाची पूजा करण्याच्या अचूक पद्धती प्रादेशिक बदलानुसार थोड्या वेगळ्या असू शकतात. हरे कृष्ण कुईरी यांनी केलेल्या वर्णनानुसार, हा सण सुरू होण्याच्या सुमारे एक आठवड्यापूर्वी, तरुण स्त्रिया नदीतून स्वच्छ वाळू आणतात, आणि त्याच वाळूत सात प्रकारचे धान्य पेरतात. सणाच्या दिवशी, करम वृक्षाची एक फांदी अंगणात किंवा आखाड्यात लावली जाते. भक्त जवा म्हणजेच जास्वंदीचं फुल या देवतेला अर्पण करतात. तर पुरोहित करम राजाची म्हणजेच देवतेची पूजा करतो. त्यानंतर पारंपरिक करम गाणी गाऊन नृत्य केले जाते (‘मुंडारी कल्चर अँड फेस्टिवल: इकोसॉफिकल स्टडी ऑफ रामदयाल मुंडाज आदि-धर्म’, एक पर्यावरणीय अध्ययन’, न्यु लिटरेरिया, जानेवारी-फेब्रुवारी २०२२). या सणाचा समारोप करम देवता म्हणून ज्या फांदीला पुजले आहे ती फांदी नदी किंवा तलावात विसर्जित करून केला जातो. तर जास्वंदाची फूले देवतेचा आशीर्वाद म्हणून भक्तांमध्ये वाटली जातात. करम सणाच्या शेवटी सल किंवा भेलवा वृक्षाच्या फांद्या शेतात लावल्या जातात. यामागे करम राजा किंवा देवता त्यांच्या पिकांचे संरक्षण करतील अशी आशा असते, असे कुईरी यांनी सांगितले.

या सणाशी संबंधित आख्यायिका

ओडिशात या सणाशी निगडित एक आख्यायिका सांगितली जाते. या आख्ययिकेनुसार ओडिशातील सात भावांनी करमसानीची पूजा केली नाही आणि त्यामुळे त्यांना आरोग्याची हानी, शेतीचे नुकसान आणि जनावरांमध्ये आजारपण सहन करावे लागले होते. शेवटी गावातील एका वडीलधाऱ्याने केलेल्या मार्गदर्शनानुसार त्या सात भावांनी पुन्हा एकदा करम वृक्षाचे रोपण करून त्याची पूजा केली आणि देवतेची माफी मागितली. मानववंशशास्त्रज्ञ हरि मोहन यांनीही सात भावांशी संबंधित अशीच एक दंतकथा सांगितली आहे (‘चेरो: एक संस्कृती अध्ययन’, १९७३). या कथेनुसार, एके दिवशी या भावांच्या बायका त्यांना शेतात जेवण देण्यासाठी गेल्या नाहीत आणि घरी परतल्यावर, भावांनी त्यांना करम झाडाच्या फांदीजवळ नाचताना पाहिले. भावांना राग आला आणि त्यातील एकाने करम फांदी नदीत फेकून दिली. त्यानंतर काही काळानंतर, भावांना संकटांचा सामना करावा लागला. त्यांना एका पुरोहिताने सांगितले की हे करम रानीच्या रागामुळे झाले आहे. पश्चात्ताप झालेल्या भावांनी करम रानीचा शोध घेतला आणि तिची पूजा केली.

अधिक वाचा: बिगबॉस सारखे शो प्रेक्षकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सणाचा संबंध शेतीशी

हिंदीच्या सहाय्यक प्राध्यापक पार्वती तिर्की यांनी करम सणाशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली. त्या सांगतात, आदिवासी समाजांनी शेती करण्यास सुरू केल्यानंतर हा सण सुरु झाला. या संदर्भातील उदाहरण देताना त्या सांगतात. ओरावन/ कुरुख समाजाने जंगल साफ करून शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शेतीच्या पद्धती या ऋतुचक्राशी जुळवून घेतल्या. करम वृक्षाची पूजा करणं हे देखील याचेच प्रतीक आहे. या सणाच्या निमित्ताने लोक नृत्य करतात, गाणी गातात तसेच करम वृक्षाच्या बरोबरीने चिरचिटी (गवतफूल) आणि सिंदवार (विटेक्स) हे शेतात लावले जाते. चिरचिटी (गवतफूल) आणि सिंदवार (विटेक्स) हे नैसर्गिक कीटकनाशकाप्रमाणे काम करतात असं तिर्की यांनी सांगितलं.