संसदेचं पावसाळी अधिवेशन २१ जुलैला सुरू झाले. हे अधिवेशन चर्चेत राहिले ते विरोधकांनी एसआयआरवरून केलेला निषेध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवर केलेलं भाषण यामुळे. या पार्श्वभूमीवर राजस्थान विधानसभेने युवा संसदेच्या चौथ्यांदा केलेल्या आयोजनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये १३ राज्यांमधील १६८ विद्यार्थी राष्ट्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते. पण, युवा संसद म्हणजे नेमकं काय? आणि ती कशासाठी आयोजित केली जाते हे सविस्तर जाणून घेऊ…

युवा संसदेत १७ वर्षीय सोनाक्षी भट्टाचार्य या विद्यार्थिनीने गृहमंत्र्यांची भूमिका साकारली आहे. सीमेपलिकडे होणाऱ्या दहशतवादावर तिने या संसदेत दमदार भाषण केले. दुसऱ्या व्हिडीओमध्ये आर्या ओझा हिने ऑनलाइन जुगाराचे ॲप्स आणि हानिकारक तंबाखूजन्य उत्पादनं यांच्या जाहिराती आणि प्रचार करणाऱ्या सेलिब्रिटींवर टीका केली. या दोन्ही मुद्द्यांना मोठ्या प्रमाणात ऑनलाइन प्रतिसाद मिळाला असून युवा संसदेबाबत आता चांगलीच चर्चा रंगली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने युवा संसद ही योजना सुरू केली, कारण तरुण भारतीयांना लोकशाहीची सखोल माहिती मिळण्यासाठी संसदेच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देते.

युवा संसद म्हणजे नेमकं काय?

युवा संसद हा एक शैक्षणिक उपक्रम आहे. ही युवा संसद म्हणजे भारताच्या संसदेच्या कार्यपद्धतीची प्रतिकृती आहे. यामध्ये विद्यार्थी संसद खासदार म्हणून सहभागी होतात आणि चर्चासत्रे, वादविवाद आणि निर्णय प्रक्रियेत भाग घेतात. राष्ट्रीय युवा संसद योजनेअंतर्गत आयोजित हा उपक्रमासाठी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी एक विशेष वेब पोर्टल सुरू करण्यात आले. त्यामुळे देशभरातली शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या कार्यक्रमात अधिवेशनाची सत्रे घेतली जातात. तिथे विद्यार्थी किंवा गट खासदारांच्या भूमिकेत काम करतात आणि सामाजिक न्याय, आर्थिक विकास, शिक्षण, आरोग्य, सरकारी कल्याण योजना यांसारख्या वादग्रस्त नसलेल्या विषयांवर चर्चा करतात.

इयत्ता ९वी ते १२वीपर्यंतच्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी असा एक गट असतो. यामध्ये साधारणपणे ५० ते ५५ सदस्य सहभागी होऊ शकतात. युवा सत्रामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा दरवर्षी शाळांसाठी, विद्यापीठे किंवा महाविद्यालये, केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये यांच्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करतात. तसंच प्रादेशिक आणि राष्ट्रीय फेऱ्या यांसारख्या स्पर्धांचा यामध्ये समावेश असतो.

राष्ट्रीय युवा संसद योजना हा उपक्रम सुरू केल्याने संस्थांपलीकडे जाऊन औपचारिक किंवा अनौपचारिक गट आणि व्यक्तींनाही प्रश्नोत्तरांमार्फत सहभागी होण्याची संधी मिळते. ही सत्रे साधारणपणे एक तास चालतात. ही संसद सहभागी सदस्यांसाठी सोयीच्या ठिकाणी घेतली जातात. तसंच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार किंवा आमदारांना बोलावले जाते. भविष्यकाळातील भारत या दृष्टिकोनातून राष्ट्रीय विकास उद्दिष्टांवर चर्चा घडवून आणली जाते.

युवा संसदेचे महत्त्व काय?

युवा संसद भारतातील तरुणांमध्ये लोकशाहीची मूल्ये रूजविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. तरुणाई ही देशाची खूप मोठी ताकद आहे. लोकशाहीच्या मुळांना बळकटी देणे, शिस्त आणि इतरांच्या मतांचा आदर करणे, संसदीय प्रक्रिया आणि शासकीय कारभाराची माहिती देणे ही या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. संसदेतील वादविवादांचे अनुकरण केल्याने तरुणांना सामाजिक प्रश्नांची जाणीव होते, माहिती मिळते, मतं मांडता येतात आणि गटचर्चा तसंच निर्णयप्रक्रियेतील कौशल्ये वाढतात.

युवा संसदेचा फायदा काय?

युवा संसदेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नेतृत्व विकासाची भावना निर्माण होते. इतरांच्या मतांचा आदर, सामाजिक समस्यांची जाणीव, नेतृत्वगुणांचा विकास तसंच राष्ट्रीय विषयांवर सामूहिक दृष्टिकोन मांडण्याची क्षमता वाढते. सार्वजनिक भाषण, सखोल विचार, संशोधन आणि धोरण विश्लेषणाची क्षमता वाढते; त्यामुळे तरुण सक्रिय नागरिक आणि भावी राजकारणी होऊ शकतात. आर्थिक स्थिती, जात किंवा प्रदेश यांचा अडथळा न ठेवता या योजनेअंतर्गत सर्वांना संधी, राष्ट्रीय एकात्मता आणि सहिष्णुतेला चालना मिळते. युवा संसदेसारखे कार्यक्रम नागरी सहभाग आणि धोरण चर्चेला प्रोत्साहन देतात, त्यामुळे राष्ट्रनिर्मितीला हातभार लागू शकतो. हा कार्यक्रम तरुणांना शासनाशी जोडतो. त्यांना शिक्षण, आरोग्य आणि शाश्वत विकासासारख्या आव्हानांवर उपाय सुचवण्यास सक्षम करतो.

युवा संसदेत सहभागी होण्यासाठी पात्रता काय?

युवा संसदेत सहभागी होण्यासाठी अधिकृत वेब पोर्टलद्वारे संस्थांना, गटांना आणि व्यक्तींना पर्याय उपलब्ध आहेत. मान्यताप्राप्त शाळांमधील तसंच महाविद्यालयांमधील किमान १० विद्यार्थ्यांचा गट असावा. त्याचा एक गटनेता नियुक्त केला जातो. कोणताही नागरिक ऑनलाइन प्रश्नोत्तरांमार्फत सहभागी होऊ शकतो. विशिष्ट श्रेणीनुसार तसंच वयोगटानुसार निवड केली जाते. १८ ते २५ वयोगटातील प्रत्येक जिल्ह्यांतून जवळपास १५० सदस्य सहभागी होऊ शकतात.

युवा संसदेसाठी नोंदणी कशी करावी?

https://nyps.mpa.gov.in यावर प्राचार्य, संस्थाप्रमुख किंवा गटनेत्याच्या आधारा कार्डद्वारे नोंदणी करता येऊ शकते. शिवाय पोर्टलवर प्रश्नोत्तरांमधूनही सहभागी होता येऊ शकतं. My Bharat पोर्टलवरही नोंदणी होऊ शकते. वर्षातून दोन वेळा नोंदणी करता येऊ शकते. ५० ते ५५ सदस्यांनी सहभागी होऊन वादग्रस्त नसलेला विषय ठरवून एक तासाचे सत्र आयोजित करता येऊ शकते. तयारीसाठी पोर्टलवरील ई-प्रशिक्षण साधनांचा वापर करता येऊ शकतो. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाते.