FIFA World Cup 2018. फिफा २०१८ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून शक्य त्या सर्व मार्गांनी फुटबॉल प्रेमी या अनोख्या आणि लोकप्रिय अशा खेळाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. यामध्येच फिफाच्या जुन्या आठवणींनाही आवर्जून उजाळा दिला जात आहे. फिफाच्या या इतिहासाची पानं उलटून पाहिल्यावर एका पानावर अनेकजणांच्या नजरा खिळतात. ते पान म्हणजे १९८६ सालचा फिफा विश्वचषकावर. अर्जेंटिनाच्या संघाने त्या वर्षाच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बाजी मारली होती. अशा या विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामनाही तितकाच रंजक ठरला होता.

इंग्लंड आणि अर्जेंटिना या दोन संघामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात अर्जेटिनाने इंग्लंडवर २-१ ने मात केली होती. पण, या सामन्याचं मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे दिएगो मॅराडोना Diego Maradona या फुटबॉलच्या जादूगाराने केलेला हँडगोल. ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, पण मॅराडोनाचा तो हँडगोल खऱ्या अर्थाने क्रिडारसिकांच्या भुवया उंचावून गेला होता. नावाप्रमाणेच त्याने हाताने फुटबॉल गोलपोस्टपर्यंत पोहोवला होता.

वाचा : FIFA World Cup 2018 : मच्चाsss… देवभूमी केरळात अशी पसरतीये फुटबॉलची जादू

दहा नंबरची जर्सी घालून फुटबॉलच्या मैदानावर अधिराज्य गाजवणाऱ्या या खेळाडूची कामगिरी पाहता, असा गोल पुन्हा होणे नाही, हे वाक्य इथे सार्थ ठरेल हेच खरं. इंग्लंड आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांमध्ये असणारी चुरस त्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाली होती. मुळात मॅराडोनाला रोखण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी तितक्याच ताकदीने प्रयत्नही केले होते. पण, अखेर तो अविश्वसनीय गोल करण्यात मॅराडोनाला यश मिळालं आणि फिफाच्या इतिहासात एक नवं पान जोडलं गेलं.