FIFA World Cup 2018 COL vs JPN : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज जपानने कोलंबियावर २-१ अशी धक्कादायक मात केली. १६ व्या स्थानावर असलेल्या कोलंबियाला क्रमवारीत पहिल्या ५० देशात स्थान नसणाऱ्या जपानकडून पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. संपूर्ण सामन्यात कोलंबियाने केवळ १ गोल केला, तर याउलट ६१ व्या स्थानी असलेल्या जपानने २ गोल करत सामना आपल्या नावे केला.

१६व्या स्थानी असलेल्या कोलंबियाला सामन्यात ६ व्या मिनिटालाच पहिला धक्का बसला. जपानकडून कागावाने ६व्या मिनिटाला पेनल्टी किकचा सदुपयोग करत गोल केला आणि जपानला १-०ची आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर पूर्वार्धातच कोलंबियाने लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्यात बरोबरी साधली. क्विंटेरोने ३९व्या मिनिटाला तो गोल केला. पण त्यानंतर, उत्तरार्धात फार काळ गोत होऊ शकला नाही. सामना बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच ओसाकोने ७३व्या मिनिटाला गोल केला आणि जपानला २-१ अशी आघाडी मिळाली.

या आघाडीनंतर जपानच्या नागाटोमो, योशिदा, शोजी आणि साकाई या बचाव फळीने कोलंबियाची सर्व आक्रमणे रोखली आणि जपानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

या विजयाबरोबर जपानने आशियाई देशांना अभिमान वाटेल, असा एक विक्रम केला. विश्वचषकात दक्षिण अमेरिकन उपखंडातील एखाद्या देशाला पराभूत करणारा जपान हा पहिला आशियाई देश ठरला.

याशिवाय, या विश्वचषक स्पर्धेत आणखी एक विक्रम घडला. १९७४च्या विश्वचषक स्पर्धेपासून प्रथमच सलामीच्या सामन्यात दक्षिण अमेरीकी देशांना विजय मिळवता आलेला नाही.

ब्राझीलचा सलामीचा सामना स्विर्त्झलंडशी बरोबरीत सुटला. आईसलँडनेही अर्जेंटिनाला बरोबरीत रोखले. तर पेरूला डेन्मार्कने पराभूत केले.