विश्वचषकातील अखेरचा डाव!

वाढत्या वयामुळे येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता हा अखेरचा विश्वचषक खेळावा लागेल

ब्राझीलमध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीने बाजी मारली आणि त्या जेतेपदाचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर मिरोस्लाव्ह क्लोजने निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीमागे विश्वचषक उंचावण्याची स्वप्नपूर्ती हे कारण होतेच, परंतु वाढत्या वयामुळे येणाऱ्या मर्यादांची जाणही त्याला होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय त्याने घेतला. चार वर्षांनी येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्तीचे हे सत्र सुरूच राहते. रशियातील विश्वचषक स्पर्धेनंतर असे अनेक मातब्बर खेळाडू निवृत्ती पत्करतील. आजच्या पिढीचे आदर्श असलेले असे अनेक खेळाडू चार वर्षांनंतर कदाचित कतारमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही. त्यामध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, अर्जेटिनाचा लिओनेल मेसी, स्पेनचा आंद्रे इनिएस्टा व सर्गियो रामोस, जर्मनीचा मॅन्युयल नॉयर यांची नावे असणे म्हणजे युवा पिढीच्या काळजाचा ठोका चुकण्यासारखे आहे. रोनाल्डो आणि मेसी यांचे तर भारतभर कोटय़वधी चाहते आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूने अखेरच्या स्पर्धेत विश्वचषक हातात घ्यावा, ही प्रत्येकाची इच्छा आहे. या खेळाडूंव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा टिम काहिल, इजिप्तचा एस्साम एक हादरी, अर्जेटिनाचा झेव्हियर मास्केरानो यांच्यासह असे अनेक खेळाडू आहेत, की ज्यांना वाढत्या वयामुळे येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता हा अखेरचा विश्वचषक खेळावा लागेल.

लिओनेल मेसी (अर्जेटिना)

दिएगो मॅरेडोना यांच्यानंतर अर्जेटिनाचा सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून लिओनेल मेसी ओळखला जातो. मात्र जेतेपदाच्या नजीक पोहोचूनही एकदाही त्याच्या वाटय़ाला यश आलेले नाही. त्यामुळे सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत असूनही प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद नसल्याची खंत त्याला सतावत आहे. ही खंत दूर करण्याची अखेरची संधी त्याला रशियात असेल. कारण येथे पराभव झाल्यास तो ताबडतोब निवृत्त होऊ  शकतो. त्यामुळे ही त्याची अखेरची विश्वचषक स्पर्धा ठरू नये, अशी प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत. ब्राझीलमधील विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या मेसीला कोपा अमेरिका स्पर्धेत दोन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

आंद्रेस इनिएस्ता (स्पेन)

यंदाच्या फुटबॉलपटूंमध्ये सर्वोत्तम मध्यरक्षक म्हणून आंद्रेस इनिएस्ता ओळखला जातो आणि त्याने या विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ला लीगाच्या जेतेपदानंतर त्याने बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने २०१० साली विश्वचषक विजयाची चव चाखली आहे, तरीही कारकीर्दीचा शेवट आणखी एका जेतेपदाने करण्याची त्याची इच्छा आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)

भारतात सर्वाधिक चाहते लाभलेला ३३ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो वयाची मर्यादा पाहता २०२२मध्ये कतारमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. २०१६ची युरो स्पर्धा प्रथमच जिंकून ऐतिहासिक जेतेपद नावावर करणारा रोनाल्डो क्लबस्तरावर सर्वात यशस्वी खेळाडू आहे. मात्र त्याच्या वैयक्तिक चषकाच्या संग्रहालयात विश्वचषक नाही आहे आणि यंदा तो आपल्याकडे आणण्याची अखेरची संधी असेल. रेयाल माद्रिदच्या या प्रमुख खेळाडूने नुकताच चॅम्पियन्स लीग चषक उंचावला. सलग तिसऱ्यांदा हा पराक्रम करून ऐतिहासिक भरारी घेणारा रोनाल्डो पोर्तुगालला विश्वचषक जिंकून देण्यासाठी उत्सुक आहे.

मॅन्युएल नॉयर (जर्मनी)

गतविजेता जर्मन संघ प्रमुख गोलरक्षक मॅन्युएल नॉयरला पुन्हा विजयी भेट देण्यासाठी सज्ज आहे. जवळपास एका वर्षांनंतर नॉयर मैदानावर परतत आहे. गेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याला गोल्डन ग्लोव्हज पुरस्काराने गौरवण्यात आले होते. वयाची मर्यादा लक्षात घेता ३२ वर्षीय नॉयरची ही अखेरची स्पर्धा ठरू शकते. त्यामुळे आपल्या कामगिरीने पुन्हा जर्मनीला जेतेपद जिंकून देण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

सर्गियो रामोस (स्पेन)

रेयाल माद्रिदचा कर्णधार सर्गियो रामोस राष्ट्रीय संघाकडूनही जेतेपदाच्या कामगिरीसाठी उत्सुक आहे. २०१०च्या विश्वचषक विजेत्या संघाचा रामोस सदस्य होता. ३२ वर्षीय रामोस रशियातील स्पर्धेनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. जगातील सर्वोत्तम बचावपटूमध्ये त्याचा समावेश आहे आणि रेयाल माद्रिदच्या विक्रमी कामगिरीत त्याचा वाटा दुर्लक्षित करून चालणारा नाही. स्पेनकडूनही त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

विश्वचषकाची रणमैदाने : रोस्तोव्ह स्टेडियम, रोस्तोव्ह ऑन डॉन

’डॉन नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या रोस्तोव्ह ऑन डॉन या शहरामध्ये विश्वचषकासाठी हे स्टेडियम उभारण्यात आले आहे. रशियातील प्रमुख बंदरांपैकी येथे हे ठिकाण असल्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण शहर मानले जाते. साहजिकच येथील सामन्यांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे. २०१२च्या सप्टेंबरमध्ये त्याचे बांधकामास प्रारंभ झाला. विश्वचषकासाठी खर्चामध्ये काटकसर करण्याच्या दृष्टीने त्याच्या काही रचनेत २०१५मध्ये बदल करण्यात आला. या स्टेडियमवर मोठे पडदे उभारण्यात आले आहेत.

  • आसन : क्षमता : ४५ हजार
  • सामने : ब्राझील वि. स्वित्र्झलड, उरुग्वे वि. सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया वि. मेक्सिको, आइसलँड वि. क्रोएशिया. तसेच उपउपांत्यपूर्व फेरीचा एक सामना.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 2018 fifa world cup

ताज्या बातम्या