विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता उपउपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ‘क’ गटात दुसऱ्या स्थानासाठी जोरदार चुरस असल्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पेरूविरुद्धच्या लढतीत विजय मिळवण्याचे ध्येय आस्ट्रेलिया संघाचे असणार आहे. दोन सामन्यांतून सहा गुणांनिशी फ्रान्सने आधीच या गटातून उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.
ऑस्ट्रेलियाची भिस्त कर्णधार माइल जेडिनाकवर असेल. त्याला आक्रमणात टिम काहिल, डॅनिएल अर्झानी यांची साथ लाभेल. १२ वर्षांनंतर बाद फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला विजयासह फ्रान्सने डेन्मार्कला पराभूत करावे, यासाठीही प्रार्थना करावी लागणार आहे. तसेच ३६ वर्षांनंतर विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या पेरूचे आव्हान सलग दोन पराभवांमुळे संपुष्टात आले आहे.
आइसलँडला विजय अनिवार्य; गटातील अव्वल क्रोएशियाशी आज सामना
पहिलाच विश्वचषक खेळणाऱ्या आइसलँडने ‘ड’ गटातील पहिल्या लढतीत अर्जेंटिनासारख्या बलाढय़ संघाला बरोबरीत रोखले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात नायजेरियाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे आइसलँडचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न सध्या अधांतरी आहे. त्यामुळे मंगळवारी क्रोएशियाला नमवून बाद फेरीतील स्थान निश्चित करण्याचे व अर्जेंटिनाच्या चिंता वाढवण्याचे लक्ष्य आइसलँड संघाचे असणार आहे.
क्रोएशियाने दोन्ही लढतीत सुरेख खेळ करताना नायजेरिया आणि अर्जेंटिनाला धूळ चारून आधीच आपले बाद फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यातच अर्जेंटिनाला ३-० अशा फरकाने मात केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे. कर्णधार लुका मॉड्रिच, इव्हान रॅकिटिक व बचावफळीही चांगल्या फॉर्मात असल्याने क्रोएशियाचे पारडे या लढतीत जड मानले जात आहे.
आइसलँडला सर्वस्व पणाला लावून क्रोएशियाला अधिक गोलफरकाने पराभूत करावे लागेल. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये झालेल्या एकमेव सामन्यात आइसलँडने क्रोएशियाला १-० असे नमवूनच विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात यश मिळवले होते. त्यांची मदार गिल्फी सिगुर्डसन, अल्फ्रेड फिनबोगसन आणि इमिल आल्फ्रेडसन यांच्यावर आहे.