|| सिद्धार्थ खांडेकर

सर्बियाविरुद्धच्या सामन्यात स्वित्र्झलडनं ०-१ पिछाडीवरून दोन गोल केले आणि २-१ असा थरारक विजय मिळवला. यामुळे ‘इ’ गटात चार गुणांसह स्वित्र्झलड आणि ब्राझील हे संघ बाद फेरीच्या उंबरठय़ावर आहेत. स्वित्र्झलडचा शेवटचा सामना कोस्टारिकाशी आहे, तर ब्राझीलचा सामना सर्बियाबरोबर आहे. एकंदरीत स्वित्र्झलडची वाटचाल तुलनेनं अधिक सोपी वाटते. पण या वाटचालीत खंड पडू शकतो, कारण स्वित्र्झलडचे दोन मोक्याचे फुटबॉलपटू शेवटच्या साखळी सामन्यात न दिसण्याची शक्यता आहे. ग्रॅनिट झाका आणि झेरडान शाकिरी या दोन फुटबॉलपटूंनी सर्बियाविरुद्ध महत्त्वाचे गोल केले, पण दोघांनी गोल झाल्यानंतर केलेला विजयी जल्लोष राजकीय स्वरूपाचा आणि चिथावणीखोर असल्याची चर्चा असून, तसं सिद्ध झाल्यास ‘फिफा’च्या नियमांनुसार त्यांच्यावर दोन सामन्यांनी बंदी आणि दंडाची कारवाई होऊ शकते. अशी कारवाई खरोखरच अमलात आली, तर शेवटचा साखळी सामन्याबरोबरच बाद फेरीच्या लढतीतही या दोघांना बेंचवर बसावं लागेल आणि याचा स्वित्र्झलडच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होईल. सर्बियाचे प्रशिक्षक आणि फुटबॉल संघटनेनं हे प्रकण फारच मनावर घेतलं. पण त्यांच्या प्रेक्षकांनी स्टँडमध्ये हुल्लडबाजी करून शाकिरी आणि झाका यांना चिथावलं होतंच.

शाकिरी आणि झाका हे दोघंही मूळचे कोसोवो-अल्बानियन. तिथं सर्बियन लष्करानं केलेल्या अत्याचारांना आवर घालण्यासाठी १९९९मध्ये ‘नाटो’ला हस्तक्षेप करावा लागला होता. कोसोवोतील अल्बानियन जनतेला हा प्रांत अल्बानियाशी जोडावासा वाटतो. हा प्रांत कागदावर तरी सर्बियाचा असून, त्यामुळे कोसोवोचा मुद्दा ही त्या देशासाठीची ठसठसती जखम आहे. शाकिरी आणि झाका यांनी दोन हातांचे पंजे अंगठय़ांच्या साह्य़ानं जोडून पक्ष्याच्या पंखांप्रमाणे बोटे हलवली. हा पक्षी म्हणजे अल्बानियाच्या ध्वजावरील द्विमुखी काळा गरूड! ‘फिफा’च्या नियम क्र. ५४ अंतर्गत सामन्यादरम्यान प्रेक्षकांना चिथावणी देणं नियमबाह्य़ आहे. ‘फिफा’नं या संदर्भात चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात क्रीडांगणावर खेळांडूनी त्यांच्या राजकीय अभिव्यक्तीचे प्रदर्शन करावं का, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

विश्वचषकासारख्या स्पर्धेचा भौगोलिक, सांस्कृतिक आवाकाच इतका प्रचंड आहे, की वेगवेगळी पाश्र्वभूमी असलेले खेळाडू मोठय़ा संख्येने येत असतात. क्रिकेट किंवा हॉकीमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यांना दोन्ही देशांतील राजकीय आणि ऐतिहासिक पाश्र्वभूमीमुळेच वेगळी धार येते. फॉकलंड युद्धानंतर फुटबॉलच्या मैदानावर इंग्लंड आणि अर्जेंटिना आमने-सामने भिडले की तो केवळ फुटबॉलचा सामना राहात नाही. जर्मनी आणि इंग्लंड यांच्यातील फुटबॉल सामन्यांनाही विशेषत: इंग्लिश माध्यमांनी (निष्कारण) महायुद्धाची छटा दिली. १९७४च्या विश्वचषक स्पर्धेत पश्चिम आणि पूर्व जर्मनी हे विरोधी विचारसरणीचे देश परस्परांसमोर होते. पूर्व जर्मनीनं त्या सामन्यात एका गोलनं धक्कादायक विजय मिळवला. इराण आणि अमेरिका १९९८च्या स्पर्धेत परस्परांसमोर आले. फॉकलंड युद्धानंतर इंग्लंड आणि अर्जेंटिना १९८२, १९८६, १९९८, २००२मध्ये एकमेकांशी खेळले. पण.. उपरोल्लेखित कोणत्याही सामन्यात संबंधित फुटबॉलपटूंनी राजकीय शिष्टाचाराची सीमा ओलांडली नाही. ‘खेळ म्हणजे दारूगोळ्याविना युद्धच’ असं जॉर्ज ऑरवेल यांनी लिहून ठेवलंय. पण किमान खेळाच्या मैदानावर राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचा परिपक्वपणा बहुतेकदा विश्वचषक स्पर्धेत दाखवला गेलाय. शाकिरी आणि झाका यांनी ती सीमारेषा ओलांडली. सर्बियाकडून किती अत्याचार झालेत, सर्बियन प्रेक्षकांनी कोणती चिथावणी दिली, हे मुद्देही महत्त्वाचेच आहेत. त्यांचे निराकरण करण्याची किंवा त्याविषयी निषेध नोंदवण्याची जागा फुटबॉल मैदान ही नक्कीच नाही! शाकिरी आणि झाका हे दोघेही आता स्वित्र्झलडकडून खेळतात. या देशाने राजकीय तटस्थतेच्या बाबतीत वर्षांनुर्वष काही मानदंड निर्माण केले आहेत. ‘फिफा’चे सोडा, पण स्विस फुटबॉल संघटनेनं उद्या आक्षेप घेतले आणि या दोघांवर बंदी घातली तर? शाकिरीच्या एका बुटावर स्वित्र्झलडचा राष्ट्रध्वज आणि दुसऱ्या बुटावर अल्बानियन ध्वज असतो. अल्बानियाविषयी इतकं प्रेम असेल, तर त्याच देशाकडून खेळावंसं त्याला का वाटू नये? आणखी एक कळीचा प्रश्न.. स्वित्र्झलडचा शेवटचा साखळी सामना कोस्टारिकाशी आहे. या देशानं इतर बहुतेक देशांच्या आधी कोसोवोच्या ‘स्वातंत्र्याला’ मान्यता दिली होती. शाकिरी आणि झाका खेळण्याची संधी/संमती मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध मित्रत्वानं खेळतील का?

siddharth.khandekar@expressindia.com