विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आता प्रत्येक संघांचे प्रत्येकी दोन सामने रविवारी पूर्ण झाले. जसजशी स्पर्धा पुढे जाईल, तसतशी स्पर्धेतील चुरस वाढत चालली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात फुटबॉलचे वातावरण तप्त होण्यास सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या फेरीअखेर ३२ सामन्यांमध्ये ८५ गोल झालेले आहेत, तर १४ पेनल्टी मिळालेले आहेत. यापैकी नऊ पेनल्टींचे गोलमध्ये रूपांतर झालेले आहे. २००२च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक १८ पेनल्टी मिळालेले होते. स्पर्धेच्या प्रारंभी चाचपडत सुरुवात करणाऱ्या ब्राझील, जर्मनी, पोर्तुगाल, स्पेन या संघांनी दुसऱ्या फेरीत चांगली कामगिरी करीत आपापल्या प्रतिस्पध्र्यावर विजय मिळवले आणि आशा जिवंत राखल्या आहेत, तरीही ब्राझीलसारख्या माजी विजेत्या संघाला कोस्टारिकाविरुद्धच्या सामन्यात जादा वेळेपर्यंत विजयाची वाट पाहावी लागली. या सामन्याच्या निमित्ताने चालू विश्वचषक स्पर्धेतील नेयमारला आपल्या गोलचे खाते उघडता आले, ही त्याच्या समर्थकांच्या दृष्टीने समाधानाची बाब. दुसऱ्या फेरीत ख्रिस्तियानो रोनाल्डो, मारिओ गोमेझ, एडिन हजार्ड, रोमेलू लुकाकू, झेर्दान शकिरी, हॅरी केन यांचा खेळ रुबाबदार झाला.
दुसऱ्या फेरीअखेर ‘अ’ गटात प्रथम व द्वितीय स्थानावर रशिया व उरुग्वे हे संघ आहेत. त्याबरोबरच ‘ब’ गटातील स्पेन व पोर्तुगाल संघांचे भवितव्य तिसऱ्या फेरीतील सामन्यावर अवलंबून असेल. स्पेन व पोर्तुगालने त्यांचे मोरोक्को व इराणविरुद्धचे सामने बरोबरीत जरी सोडवले, तरी ते दोन्ही संघ बाद फेरीत प्रवेश करू शकतात. पण या दोहोंपकी एकाने जरी सामना गमावला तरी त्या संघास स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. ‘क’ गटातून फ्रान्स संघ बाद फेरीत पोहोचलेला आहे, पण डेन्मार्क व ऑस्ट्रेलिया यांना तिसऱ्या फेरीपर्यंत थांबावे लागेल.
‘ड’ गटात क्रोएशिया दोन सामने जिंकून बाद फेरीत दाखल झालेला आहे, पण अर्जेंटिना व नायजेरिया या सामन्यावर उर्वरित संघाचे स्थान निश्चित होईल. सामना बरोबरीत सुटला तर नायजेरिया बाद फेरीत दाखल होईल, अर्जेंटिनाला मात्र हा सामना जिंकावाच लागेल, म्हणूनच त्यांच्या दृष्टीने हा सामना ‘करो, या मरो’ असा असेल, अर्जेंटिनाला क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला आणि स्टेडियममध्ये उपस्थित असणाऱ्या मॅराडोनासह जगभरातील अर्जेंटाइन समर्थकांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. या स्पर्धेत मेसीला अद्याप त्याच्या दर्जानुसार खेळ दाखवता आलेला नाही. अर्जेंटिनासारख्या दोन वेळा विश्वचषक विजेत्या ठरलेल्या संघाला १६ वर्षांनंतर प्रथमच प्राथमिक फेरीतच बाद होण्याची भीती निर्माण झाली आहे.
‘इ’ गटात तिसऱ्या फेरीत ब्राझील व सर्बयिा यांच्यातील विजेत्याला बाद फेरीत जाण्याची संधी आहे. मात्र ब्राझील व स्वित्र्झलड हे दोन्ही संघ त्यांचा अनुक्रमे सर्बयिा व कोस्टारिका यांच्याबरोबरचा सामना बरोबरीत राहिला तरी ते बाद फेरीत पोहोचू शकतात. ‘फ’ गटात मेक्सिकोने दोन्ही सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश केलेला आहे, पण जर्मनीला द. कोरिया व स्वीडनला मेक्सिकोविरुद्धचे सामने जिंकावेच लागतील. तसे झाले तर मात्र गोल सरासरीवर बाद फेरीतील संघ निश्चित केला जाईल. ‘ग’ गटात इंग्लंड व बेल्जियम यांनी आपले दोन्ही सामने जिंकून अगोदरच आपला बाद फेरीतील प्रवेश निश्चित केलेला आहे. मात्र इंग्लंड-बेल्जियम यांच्यात होणारा सामना मात्र अतिशय चुरशीचा व रंगतदार होईल यात शंकाच नाही. ‘ह’ गटात जपान व सेनेगल यांच्यात दुसऱ्या फेरीअखेर समान गुण व समान गोल संख्या झालेली असल्याने गटविजेता व उपविजेता ठरवण्याकरिता तिसऱ्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागेल. या गटात पोलंड संघालाही बाद फेरीत जाण्याची संधी आहे. मात्र त्याकरिता त्यांना जपानबरोबरचा सामना जिंकावाच लागेल. जपान मात्र तिसऱ्या फेरीत सामना बरोबरीत राहिला तरी बाद फेरीत प्रवेश करू शकतो.
विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने एक मात्र दिसून आले की, जर्मनी, स्पेन, ब्राझील, अर्जेंटिना, पोर्तुगाल, फ्रान्स या संघांच्या तोडीस तोड इतर संघाची कामगिरी झालेली आहे, किंबहुना त्यांच्यापेक्षाही सरस झालेली आहे. या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये इंग्लंडचा हॅरी केन, पोर्तुगालचा ख्रिस्तियाना रोनाल्डो, बेल्जियमचा रोमेलू लूकाकू, रशियाचा डेनिस चेरिशेव्ह व स्पेनचा दिएगो कोस्टा हे खेळाडू आघाडीवर आहेत. त्यामुळे यापकी कोणता खेळाडू ‘गोल्डन शूज’चा मानकरी ठरतो, ते येत्या काही दिवसांतच निश्चित होईल.
abhijitvanire@yahoo.com