विश्वचषकातील प्रमुख दावेदार मानल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या संघाला गटातील सर्वोच्च स्थान कायम राखण्याची आस असून मुख्य आक्रमक अ‍ॅन्टोइन ग्रीझमन पुन्हा बहरात परतण्याकडे फ्रान्सवासीयांचे डोळे लागलेले आहेत. या सामन्याचा निकाल बरोबरीत गेला तरी फ्रान्स आणि डेन्मार्क हेच दोन संघ बाद फेरीत प्रवेश करणार आहेत.

क- गटातून फ्रान्सचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे, तर डेन्मार्कला आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी बरोबरीचा एक गुण अत्यावश्यक आहे. बार्सिलोना क्लबने खूप रस दाखवूनदेखील ग्रीझमनने अ‍ॅटलेटिको माद्रिदसमवेत २०२३ सालापर्यंतच्या कालावधीसाठी नुकताच करार वाढवला आहे. त्यामुळे चर्चेत असलेल्या ग्रीझमनला विश्वचषकात फ्रान्सकडून खेळताना मात्र अद्याप फारशी छाप पाडता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याने एक पेनल्टी लगावत संघाच्या विजयात योगदान दिले; परंतु त्याव्यतिरिक्त मात्र त्याने कुठेही चमक दाखवली नाही. पण तो लवकरच अपेक्षित कामगिरी करेल, असा विश्वास संघातील प्रत्येक सदस्याला आहे. फ्रान्सचा संघ सध्या अव्वल स्थानावर असून कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकून प्रथम स्थान कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.

दुसरीकडे डेन्मार्कचा संघदेखील एक विजय आणि एक बरोबरीसह चांगली कामगिरी करून गटात द्वितीय स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्यात अजून एक विजय मिळवून गटात अव्वल स्थानावर झेपावण्याचे डेन्मार्कचे इरादे आहेत. डेन्मार्कचा मध्यरक्षक युसूफ पॉल्सेन हा आता तंदुरुस्त होऊन चांगली कामगिरी करेल, असा विश्वास वाटत आहे. मात्र फ्रान्सच्या सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होऊन संघात परतण्याची शक्यता कमीच आहे. दोन्ही संघांना पुढील सामन्यात क्रोएशियाशी लढत नको असल्याने अव्वल स्थान मिळवण्याची उत्सुकता आहे.

तुम्हाला हे माहीत आहे?

पेरूविरुद्धच्या सामन्यात कायलियान मबाप्पे हा फ्रान्ससाठी गोल झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याचे वय १९ वष्रे सहा महिने आहे. १९९८ साली म्हणजे २० वर्षांपूर्वी जेव्हा फ्रान्सने विश्वचषक जिंकला, तेव्हा त्याचा जन्मदेखील झाला नव्हता.