फुटबॉल असो किंवा क्रिकेटचा सामना. मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये आणि त्यावेळी अमुक एक सामना प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवणाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतो. हाच उत्साह या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहणाऱ्यांमध्येही पाहायला मिळतो. पण, मुळात त्यामागचं कारण मात्र वेगळं असतं. टेलिव्हिजन सेटवर एखाद्या सामन्याचा आनंद घेतेवेळी अनेकांची पसंती असते त्या सामन्यासाठीच्या समालोचकांना.
खुमासदार शैलीत सामन्याचं समालोचन करणाऱ्या अनेकांनाच क्रिडारसिकांती पसंती मिळते. असेच एक समालोचक सध्या फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने चर्चेत आले आहेत. ज्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. मुख्य म्हणजे फुटबॉलच्या सामन्यामध्ये त्यांची फिल्मी समालोचनाची शैली पाहून खुद्द आनंद महिंद्रा यांनीसुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं.
“Na vanthuten sollu…thirumbi vanthuten sollu.” ही ‘काला’ या चित्रपटातील ओळ त्या दिवशी मोठ्या आवेगात ऐकायला मिळाली. अहं…. पण, तच्यावेळी सुपरस्टार रजनीकांत ती ओळ किंवा तो संवाद म्हणत नव्हते, तर अनेक फुटबॉलप्रेमींच्या घरातून हा कालाचा कल्ला ऐकू येत होता. अर्थात त्याला कारण होतं ते म्हणजे मल्याळम समालोचनाचे सुपरस्टार शैजू दामोदरन यांची उत्साहपूर्ण कॉमेंट्री.
पोर्तुगाल विरुद्ध स्पेन या सुपरहिट सामन्याचं समालोचन करतेवेळी शैजू यांच्या अंगात असा काही उत्साह संचारला होता, की विचारून सोय नाही. पोर्तुगालचा खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याची ‘ती’ अफलातून फ्री किक पाहिल्यानंतर फक्त चाहतेच नव्हे, तर या सामन्याचं समालोचन करणाऱ्या दामोदरन यांचा आनंद जणू गगनात मावेनासा झाला होता.
Cristiano Ronaldo's third (hat-trick) goal against Spain in #FIFAworldcup2018 with Malayalam commentary. ENJOY! pic.twitter.com/JvUYXVLaqO
— Mohandas Menon (@mohanstatsman) June 16, 2018
Ok that’s it. I’m switching to this channel with commentary in Malayalam. No, I don’t understand the language but I don’t need to—these guys are so pumped up they make the English & Hindi commentators sound tame! pic.twitter.com/yWqApVx6jp
— anand mahindra (@anandmahindra) June 16, 2018
वाचा : FIFA World Cup 2018 : मच्चाsss… देवभूमी केरळात अशी पसरतीये फुटबॉलची जादू
दामोदरन यांच्या समालोचनाच्या असंख्य चाहत्यांच्या मते, त्यांच्या मल्याळम कॉमेंट्रीपुढे अनेकदा तर इंग्रजी समालोचनही मागे पडतं. देवभूमी केरळमध्ये ज्याप्रमाणे फुटबॉल या खेळाला अनन्यसाधारण महत्त्वं दिलं जातं, त्याचप्रमाणे, दामोदरन यांच्या समालोचनालाही तितकच महत्त्वं दिलं जातं. खेळाप्रती असणारी ओढ, त्यात शिगेला पोहोचणारा उत्साह आणि तो उत्साह क्रीडारसिकांपर्यंत पोहोचवण्याची कला दामोदरन यांना अगदी चांगल्या पद्धतीने अवगत असल्यामुळे ते ही जबाबदारी लिलया पेलत आहेत.

कोण आहेत शैजू दामोदरन?
क्रीडा क्षेत्रात शैजू जवळपास दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. एशिया नेट न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वत:विषयी काही माहिती दिली होती. काही वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी क्रीडा पत्रकारितेकडे आपला मोर्चा वळवला. ज्यानंतर जवळपास दोन दशकं त्यांनी या क्षेत्रात काम केलं. ज्याचा फायदा त्यांना फुटबॉल समालोचनाच्या कामात झाला.