28 January 2021

News Flash

नाग (प्रॉस्पिना) क्षेपणास्त्र

 नाग हे ४ किमी अंतरावर मारा करू शकणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.

नाग मिसाइल कॅरियर (नामिका) वाहनावरून नाग क्षेपणास्त्र डागले जाताना

सचिन दिवाण

भारताने १९८३ साली सुरू केलेल्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत (इंटिग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) विकसित केले जाणारे नाग हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र होते. मात्र ते तयार करणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेला (डीआरडीएल) अनेक वर्षे यशाने हुलकावणी दिली होती. अखेर काही वर्षांपूर्वी नाग क्षेपणास्त्राला एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातून वेगळे काढून त्याचा ‘प्रॉस्पिना’ या नव्या नावाने स्वतंत्रपणे विकास करण्यात आला. या क्षेपणास्त्राच्या चाचण्या सुरू असून त्यांचे निकाल उत्साहवर्धक आहेत.

नाग हे ४ किमी अंतरावर मारा करू शकणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. ते प्रक्षेपित करण्यासाठी ‘नाग मिसाइल कॅरियर’ (नामिका) नावाचे चिलखती वाहन विकसित केले जात आहे. हे वाहन रशियाकडून घेतलेल्या ‘बीएमपी-२’ या चिलखती वाहनावर आधारित आहे. ते भारतात सारथ नावाने तयार करण्यात येते. याशिवाय नाग क्षेपणास्त्राची हेलिकॉप्टरवरून डागता येणारी, ७ किमी पल्ला असलेली आवृत्ती तयार केली जात आहे. तिला ‘हेलिना’ असे नाव दिले आहे.

मात्र नाग क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमात अनेक अडचणी येत होत्या. क्षेपणास्त्र पूर्णपणे यशस्वी होत नव्हते. काही चाचण्यांमध्ये क्षेपणास्त्र त्याचा अपेक्षित ४ किलोमीटरचा पल्ला गाठू शकत नव्हते. त्यामुळे सेनादलांना ३ ते ३.२ किमी असा कमी पल्ला असलेले क्षेपणास्त्र स्वीकारावे लागले असते. तसेच नाग क्षेपणास्त्रावर बसवलेल्या ‘इमेजिंग इन्फ्रारेड (आयआयआर) सीकर’ यंत्रणेत अडचणी येत होत्या. त्याचे संवेदक तप्त वाळवंटात ४७ अंश सेल्सिअसवरील तापमानात  लक्ष्य आणि त्याच्या आसपासचा भूप्रदेश यातील फरक ओळखू शकत नसे. त्यामुळे नव्या प्रॉस्पिना क्षेपणास्त्रात आयआयआर सीकरवर उष्णतेचे अधिक संवेदनशील संवेदक (सेन्सर) बसवून चाचण्या घेतल्या जात आहेत. हे तंत्रज्ञान जगात खूप कमी देशांकडे आहे.

प्रॉस्पिनाची बांधणी कॉम्पोझिट मटेरिअलपासून केली आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रणगाडय़ावर वरून हल्ला करते, कारण वरील भागात रणगाडय़ाचे चिलखत कमी जाडीचे असते. त्याला ‘टॉप अटॅक कपॅबिलिटी’ म्हणतात. मात्र हे क्षेपणास्त्र पूर्णपणे यशस्वी होण्यास अद्याप अवधी आहे. तोपर्यंत अमेरिकेची जॅव्हलिन किंवा इस्रायलची स्पाइक ही रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे विकत घेण्याचा सरकारकडे प्रस्ताव आहे. येत्या २० वर्षांत लष्कराला ४०,००० रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांची गरज भासणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2018 2:59 am

Web Title: article about nag missile
Next Stories
1 गाथा शस्त्रांची : अग्नि क्षेपणास्त्र
2 गाथा शस्त्रांची : पृथ्वी क्षेपणास्त्र
3 लक्ष्य, निशांत आणि रुस्तम ड्रोन
Just Now!
X