01 March 2021

News Flash

अमेरिकेची पोलॅरिस, पोसायडॉन आणि ट्रायडेंट क्षेपणास्त्रे

आण्विक क्षेपणास्त्रांच्या विकासात पाणबुडीतून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्रांना विशेष महत्त्व आहे.

पाण्याखालून प्रक्षेपित केलेले ट्रायडेंट क्षेपणास्त्र

आण्विक क्षेपणास्त्रांच्या विकासात पाणबुडीतून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्रांना विशेष महत्त्व आहे. त्यांना सबमरीन लाँच्ड बॅलिस्टिक मिसाइल्स (एसएलबीएम) म्हणतात. शत्रूच्या पहिल्या हल्ल्यातून आपली अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे वाचवणे आणि शत्रूवर प्रतिहल्ला करण्याची क्षमता बाळगणे (सेकंड स्ट्राइक कॅपॅबिलिटी) गरजेचे असते. त्यासाठी जमिनीवरून डागली जाणारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, विमानांवरून टाकता येणारी अण्वस्त्रे आणि पाणबुडीतून डागली जाणारी अण्वस्त्रे असे तीन पर्याय वापरले जातात. या तिहेरी रचनेला ‘न्यूक्लिअर ट्राएड’ असे म्हणतात. ऐन युद्धात यातील किमान एक व्यवस्था तरी खात्रीशीरपणे चालावी हा त्यामागील हेतू असतो. त्यासाठी पाणबुडय़ांची अथांग समुद्रात लपून राहण्याची क्षमता उपयोगी पडते.

पाणबुडीवरून क्षेपणास्त्र डागण्याच्या प्रयत्नांना १९५०च्या दशकातच सुरुवात झाली होती. सोव्हिएत युनियनने त्यांच्या स्कड क्षेपणास्त्राची आर-११ एफएम या नाविक आवृत्तीची १९५५ मध्ये चाचणी घेतली आणि चार वर्षांत ते क्षेपणास्त्र सोव्हिएत नौदलात कार्यान्वित झाले. त्यानंतर अमेरिकेने यूजीएम-२७ पोलरिस नावाचे दोन टप्प्यांचे, घनरूप इंधनावर आधारित क्षेपणास्त्र तयार केले. पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागाखाली असताना तेथून डागता येणारे हे पहिलेच क्षेपणास्त्र होते. पोलॅरिसच्या विकासाला १९५६ मध्ये सुरुवात झाली आणि १९५९ साली ते अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन पाणबुडीवर तैनात करण्यात आले. पाणबुडी पाण्याखाली असताना तेथून क्षेपणास्त्र डागून ते पाण्यावर येऊन दूरवर जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी क्षेपणास्त्रात विशेष यंत्रणा बसवली होती. पाण्याची वाफ किंवा गरम वायू क्षेपणास्त्राला पाणबुडीतून पाण्याबाहेर ढकलतात. त्यानंतर नेहमीचे इंधन पेट घेते. पोलॅरिसच्या ए-१ या अण्वस्त्रधारी आवृत्तीचा पल्ला १३७० मैल होता आणि नेम चुकण्याची शक्यता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी-सीईपी) ५९४० फूट होती. पोलरिसच्या ए-२ आणि ए-३ या सुधारित आवृत्ती तयार करण्यात आल्या. पोलॅरिस ए-३ चा पल्ला २९०० मैल आणि सीईपी २९७० फूट इतकी होती.

अमेरिकेने १९७० च्या दशकात पोसायडॉन आणि ट्रायडेंट नावाची अधिक प्रगत एसएलबीएम विकसित केली. पोसायडॉनचा पल्ला २५०० ते ३२०० सागरी मैल (४६०० ते ५९०० किमी) असून त्यावर १० ते १४ अण्वस्त्रे (एमआयआरव्ही) बसवता येतात. ट्रायडेंटचा पल्ला ६००० मैलांहून अधिक आहे आणि त्यावर ८ अण्वस्त्रे (एमआयआरव्ही) बसवण्याची सोय आहे. ट्रायडेंट क्षेपणास्त्रे ओहायो वर्गातील पाणबुडय़ांवर तैनात होती. ट्रायडेंट क्षेपणास्त्रे ब्रिटनलाही पुरवण्यात आली आणि ब्रिटिश नौदलाच्या व्हॅनगार्ड पाणबुडय़ांवर तैनात होती.

पोसायडॉन आणि ट्रायडेंट क्षेपणास्त्रांनी सज्ज अमेरिकी पाणबुडय़ा या जगातील सर्वात घातक शस्त्रास्त्र प्रणाली आहेत. अशा प्रकारच्या एका पाणबुडीवर प्रत्येकी आठ ते १४ अण्वस्त्रे असलेली १६ ते २४ क्षेपणास्त्रे तैनात करता येतात. त्यामुळे एका पाणबुडीत दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या सर्व बॉम्बपेक्षा अधिक संहारक क्षमता सामावली आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 1:00 am

Web Title: different types of weapons part 116
Next Stories
1 रशियाची अत्याधुनिक टोपोल, यार्स, सरमत क्षेपणास्त्रे
2 गाथा शस्त्रांची : ‘एमआयआरव्ही’ तंत्रावर आधारित सोव्हिएत क्षेपणास्त्रे
3 मिनिटमन क्षेपणास्त्र आणि ‘एमआयआरव्ही’ तंत्रज्ञान
Just Now!
X