पहिल्या महायुद्धापर्यंत युद्धाची दाहकता खूपच वाढली होती. त्यात मशिनगन आणि तोफांचा वाटा मोठा होता. या दोन शस्त्रांच्या माऱ्यामुळे खुल्या मैदानात सैन्याच्या हालचाली करणे अवघड झाले होते. त्यामुळे युद्धाच्या आघाडीवर मैलोनमैल अंतरावर समोरासमोर खंदक खणून त्यात दबा धरून बसणे ही पद्धत बनली होती.

हल्ला करताना प्रथम शत्रूच्या खंदकांवर प्रथम तोफांचा जोरदार भडिमार करणे आणि त्यामागोमाग पायदळाने बंदुकांवर संगिनी चढवून समोरच्या खंदकावर स्वारी करणे असे तंत्र वापरले जात असे. पण त्यात शत्रूने उभी केलेली काटेरी तारांची दाट कुंपणे आणि मोर्चेबंदी भेदणे शक्य होत नसे. तसेच एकदा खंदकाबाहेर आले की मशिनगन आणि तोफांपासून काही बचाव नसे. त्यात लाखो सैनिक मारले जात. पहिल्या महायुद्धातील फ्रान्समधील सोम आणि व्हर्दूनच्या लढायांत याची उच्चतम पातळी गाठली गेली होती. युद्धतंत्रात एक प्रकारचे साचलेपण आले होते. महिनोनमहिने युद्ध रेंगाळले जात होते.  लाखो सैनिकांची आहुती देऊनही निर्णय लागत नव्हते. ही ‘ट्रेंच वॉरफेअर’ची कुचंबणा होती.

ही कोंडी फोडण्यासाठी रणगाडय़ांचा जन्म झाला. रणगाडय़ांच्या जाडजूड धातूच्या आवरणामुळे आतील सैनिकांना शत्रूच्या मशिनगनच्या माऱ्यापासून संरक्षण मिळत होते. त्याच्या चाकांवरील ट्रॅक्टरसारख्या पट्टय़ामुळे (ट्रॅक्स किंवा चेन) ओबडधोबड जमिनीवर व काटेरी तारांच्या कुंपणांमधून मार्गक्रमणा करणे शक्य होते. तसेच त्याच्यावरील तोफ आणि मशिनगनने शत्रूची मोर्चेबंदी भेदता येत होती. म्हणजेच रणगाडय़ात संरक्षण (प्रोटेक्शन), गतिमानता (मोबिलिटी) आणि मारक क्षमता (फायरपॉवर) यांचा संगम होता.  आजही कोणत्याही रणगाडय़ासाठी या तीन बाबी महत्त्वाच्या आहेत. किंबहुना रणगाडय़ाच्या अस्तित्वाचे तत्वज्ञानच संरक्षण, गतिमानता आणि मारक क्षमता या त्रिसूत्रीवर आधारित आहे. या तीन घटकांमध्ये काही फेरफार, बदल, सुधारणा (परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन) करून रणगाडय़ांचे विविध प्रकार विकसित झाले. पण त्यांचे मूलभूत तत्व तेच आहे – सैन्याला संरक्षण, गतिमानता आणि मारक क्षमता प्रदान करणे.

पहिल्या महायुद्धात फ्रान्समधील सोम येथील लढाईत १५ सप्टेंबर १९१६ रोजी ब्रिटनने सर्वप्रथम रणगाडे वापरले. या परिसरात ब्रिटिश-फ्रेंच आणि जर्मन सैन्य समोरासमोरच्या लांब खंदकांत दबा धरून बसले होते. ब्रिटिश पायदळ आणि घोडदळाने केलेल्या स्वाऱ्या जर्मन मशिनगन्सनी निष्प्रभ ठरवल्या होत्या. अखेर ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्सचे जनरल सर डग्लस हेग यांनी फ्लेर्स-कोर्सलेट गावांवरील १५ सप्टेंबर १९१६ च्या हल्ल्यात ‘मार्क-१’ हे नव्याने लष्करात दाखल झालेले रणगाडे वापरण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट १९१६ मध्ये ते लष्करात दाखल झाले होते. आघाडीवर ४९ रणगाडे आले होते. त्यापैकी २५ रणगाडय़ांनीच प्रत्यक्ष हल्ल्यात भाग घेतला. केवळ ९ रणगाडे दोन्ही खंदकांमधील ‘नो मॅन्स लँड’ पार करून जर्मन फळीपर्यंत पोहोचून हल्ला करू शकले.

या पहिल्यावहिल्या रणगाडा हल्ल्याने ब्रिटिशांना प्रत्यक्ष रणभूमीवर फारसा फायदा झाला नाही. आघाडीवरील १.८ किलोमीटरच्या पट्टय़ात जर्मनांनी माघार घेऊन तो भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला. मात्र रणगाडय़ांच्या वापराचा शत्रूवरील मनोवैज्ञानिक आघात मोठा होता. त्याला ‘टँक टेरर’ म्हटले जायचे. त्याने साचलेले युद्ध पुन्हा गतिमान झाले होते.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com