अमेरिकेने १९७०च्या दशकात बांधलेल्या निमिट्झ वर्गातील आणि १९८०-९० च्या दशकात बांधलेल्या सुधारित निमिट्झ वर्गातील विमानवाहू नौका जगातील सर्वात अत्याधुनिक आणि मोठय़ा विमानवाहू नौका मानल्या जातात. दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकी अ‍ॅडमिरल चेस्टर निमिट्झ यांच्या स्मरणार्थ या वर्गातील नौका बांधल्या आहेत. निमिट्झ वर्गात कार्ल विन्सन, ड्वाइट डी. आयसेनहॉवर, निमिट्झ या नौका तर सुधारित निमिट्झ वर्गात थिओडोर रुझवेल्ट, अब्राहम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टन, जॉन स्टेनिस, हॅरी ट्रमन, रोनाल्ड रीगन आणि जॉर्ज बुश या नावांच्या नौका तयार करण्यात आल्या. त्यांनी आजवर जगभरच्या समुद्रांवर हुकुमत गाजवली आहे.

त्यातील जॉर्ज वॉशिंग्टन ही नौका १९९२ साली तयार झाली. तिची लांबी ३३३ मीटर (१,०९२ फूट) आणि वजन ८८,००० टन आहे. तिच्यावर  ८५ हून अधिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर आणि साधारण ६००० कर्मचारी, नाविक आणि वैमानिक मावतात. तिच्यावरील फ्लाइट डेकचे क्षेत्रफळ १.८ हेक्टर (४.५ एकर) इतके आहे. तिच्यावर दोन अणुभट्टय़ांची सोय असून त्या तिला अमर्याद पल्ला आणि ताशी ३० नॉट्सचा वेग प्रदान करतात. अणुभट्टीत एकदा अणुइंधन भरल्यानंतर ती सलग १८ वर्षे काम करू शकते. याशिवाय कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवणाची, करमणुकीची, व्यायामाची सोय, सुसज्ज रुग्णालय जमेस धरता हे तरंगते शहरच आहे.

विमानवाहू नौकांना त्यांचे स्वत:चे संरक्षण फारसे नसते. त्यामुळे विमानवाहू नौका एकटय़ाने प्रवास करत नाहीत. त्या विनाशिका, फ्रिगेट, पाणबुडी अशा युद्धनौकांच्या समूहात कारवाई करतात. त्यांना कॅरियर बॅटल ग्रुप म्हटले जाते. जॉर्ज वॉशिंग्टनवर केवळ पोलादाचे नव्हे तर केवलार या अत्याधुनिक कृत्रिम धाग्यांचे चिलखती आवरण आहे. या नौकेवर हवेत १९ किमीवर मारा करणारी सी-स्पॅरो नावाची क्षेपणास्त्रे आणि मिनिटाला ३००० ते ४५०० मोठय़ा गोळ्यांचा वर्षांव करणाऱ्या मशिनगन आहेत.

लढाऊ विमाने ही या नौकांची खरी ताकद. त्यात एफ-१४ टॉमकॅट, एफ/ए-१८ हॉर्नेट आणि सुपर हॉर्नेट या विमानांचा प्रामुख्याने समावेश होतो. ही नौका तिच्यावरील कॅटापुल्टच्या मदतीने २० सेकंदात एक या वेगाने विमाने आकाशात धाडू शकते. एक एफ-१४ विमान त्यावरील स्पॅरो, साइडवाईंडर, फिनिक्स अशा क्षेपणास्त्रांनिशी ७२५ किमीच्या परिघात लढू शकते. तर एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट विमान स्मार्ट बॉम्ब, क्षेपणास्त्रे यांच्यासह २,२२५ किमी त्रिज्येच्या विभागात (कॉम्बॅट रेडियस) प्रभावीपणे लढू शकते. यासह हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी ‘अवॅक्स’ प्रकारची विमाने, हेलिकॉप्टर, अत्याधुनिक रडार, सोनार आणि संवेदक यामुळे या नौकांची जगात कोठेही लढण्याची (पॉवर  प्रोजेक्शन) क्षमता अफाट आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com