26 February 2021

News Flash

युरोफायटर टायफून: २१ व्या शतकाचे लढाऊ विमान 

अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संशोधन, विकास आणि निर्मितीचा खर्च अफाट आहे.

अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संशोधन, विकास आणि निर्मितीचा खर्च अफाट आहे. खूप कमी देशांना एकटय़ाला तो खर्च पेलवतो. त्यामुळे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि स्पेन या युरोपीय देशांनी १९८३ मध्ये एकत्र येऊन ‘नाटो’ संघटनेसाठी अत्याधुनिक लढाऊ विमान तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला. फ्रान्सने १९८५ साली या प्रकल्पातून बाहेर पडून स्वत:चे राफेल हे विमान विकसित केले. मात्र उरलेल्या चार देशांनी प्रकल्प सुरू ठेवला. त्यातून युरोफायटर टायफून या विमानाची निर्मिती झाली. आजच्या सर्वात आधुनिक लढाऊ विमानांमध्ये टायफूनचा क्रमांक बराच वरचा आहे.

युरोफायटरच्या विकासाचे काम ब्रिटन आणि जर्मनीने प्रत्येकी ३३ टक्के, इटलीने २१ टक्के आणि स्पेनने १३ टक्के अशा प्रमाणात वाटून घेतले होते. मार्च १९९४ मध्ये त्याच्या पहिल्या प्रारूपाचे उड्डाण झाले. त्यानंतर जर्मनी, ब्रिटन, इटली आणि स्पेनच्या हवाईदलांमध्ये त्याचा समावेश झाला. त्याची युरोजेट ईजे-२०० टबरेफॅन इंजिने कमी इंधन वापरून अधिक थ्रस्ट उत्पन्न करतात. अधिक थ्रस्ट टू वेट रेशो, कमी विंग लोडिंग, कॉकपिटच्या कॅनॉपीतून वैमानिकाला लाभलेली चौफेर पाहण्याची क्षमता, हाताळण्यातील सुलभता, स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर, शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची मोठी क्षमता आदींमुळे युरोफायटर टायफून कमालीचे परिणामकारक विमान बनले आहे. टायफूनचा ताशी कमाल वेग २१२५ किमी (माक २) इतका आहे. त्याचा पल्ला १३९० किमी आणि उंची गाठण्याची क्षमता अडीच मिनिटात ३५,००० फूट इतकी आहे.

टायफूनच्या निर्मितीत ७० टक्के कार्बन फायबर कॉम्पोझिट मटेरिअल, १२ टक्के ग्लास रिइन्फोस्र्ड प्लास्टिक तर केवळ १५ टक्के धातू (अ‍ॅल्युनिअम आणि टायटॅनियमचे मिश्रधातू) वापरले आहेत. हवाई युद्धाच्या धामधुमीत वैमानिकाला विमान उडवण्याकडे कमीत कमी लक्ष देऊन अधिक लक्ष लढण्यावर केंद्रित करता यावे या दृष्टीने टायफूनची रचना केली आहे. त्यासाठी टायफूनचे नियंत्रण संगणकीकृत आणि इलेक्ट्रॉनिक फ्लाय बाय वायर, शक्तिशाली रडार आदी यंत्रणांनी होते. विमानाचे बरेचसे नियंत्रण संगणक करतो. इतकेच नव्हे तर संगणक वैमानिकाला आगामी धोक्यांचा ‘बोलून’ इशारा देतो. वैमानिकही विमानाला तोंडी आदेश देऊ शकतो. वैमानिकाच्या हेल्मेटच्या काचेवरील खास यंत्रणेमुळे त्याची नजर ज्या लक्ष्यावर स्थिरावेल त्यावर क्षेपणास्त्र डागले जाते. टायफूनवर कॅनन, ७५०० किलोचे पारंपरिक बॉम्ब, पेव्हवे स्मार्ट आणि लेझर गायडेड बॉम्ब यासह साइडवाईंडर, एआयएम-१२०, १३२, मिटिऑर (स्टॉर्म शॅडो), ब्रिमस्टोन ही क्षेपणास्त्रे बसवता येतात.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 12:58 am

Web Title: different types of weapons part 93
Next Stories
1 अमेरिकी एफ/ए-१८ हॉर्नेट आणि सुपर हॉर्नेट
2 पॅनएव्हिया टॉर्नेडो
3 फ्रेंच मिराज-२००० : अण्वस्त्रवाहू लढाऊ विमान
Just Now!
X