सोव्हिएत युनियनची मिग-२३ आणि मिग-२७ ही लढाऊ विमाने त्यापूर्वीच्या मिग-१५ किंवा मिग-२१ इतकी गाजली नसली तरी दोन तंत्रज्ञानांच्या विकासासाठी त्यांचे महत्त्व आहे. या विमानाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात वापरलेले स्विंग-विंग किंवा व्हेरिएबल जिऑमेट्री विंग्ज हे तंत्रज्ञान.

या विमानाचे पुढील मुख्य पंख उड्डाणादरम्यान मागे वळून मागील लहान पंखांना साधारण जुळत. त्यामुळे दोन पंख मिळून एकाच त्रिकोणी पंखासारखे (डेल्टा विंग) काम करत. पुढील पंख त्यावरील बिजागिरीवर झोक्यासारखा मागे फिरत असे. त्यामुळे त्याला स्विंग विंग म्हणत. या कृतीदरम्यान पंखांची मूळ भूमिती बदलत असे. त्यामुळे त्याला व्हेरिएबल जिऑमेट्री विंग्ज म्हणत.

जी विमाने तुलनेने कमी आणि अधिक अशा दोन्ही वेगाने उडतात. त्यांमध्ये प्रामुख्याने स्विंग विंग्जचा वापर केला जातो. सरळ पंख कमी वेगात उपयोगी असतात तर मागे वळलेले त्रिकोणी पंखे अधिक वेगासाठी उपयोगी असतात. या प्रकारच्या विमानात पंख मागे-पुढे वळण्याची सोय असल्याने ते दोन्ही वेगांसाठी उपयुक्त ठरते. त्याने उड्डाण करतानाही फायदा होतो. तसेच हवेत वेगानुसार वैमानिक पंखांची रचना बदलू शकतो. वेग आणि विमानाची कामगिरी सुधारल्यामुळे विमान अधिक इंधन आणि शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकते.

या तंत्रज्ञानावर १९४०च्या दशकापासून प्रयोग होत असले तरी १९७० च्या दशकात त्याचा प्रामुख्याने वापर होऊ लागला. अमेरिकेच्या एफ-१११ या विमानात त्याचा प्रथम वापर केला गेला. त्यानंतर सोव्हिएत युनियनच्या मिग-२३, मिग-२७, सुखोई-२४ या विमानांमध्ये, अमेरिकेच्या एफ-१४ टॉमकॅट, फ्रान्सच्या मिराज जी-४, जर्मनी आणि अन्य युरोपीय देशांच्या टॉरनॅडो आदी विमानांमध्ये अशा प्रकारचे पंख वापरले गेले.

मिग-२३ विमानाची आणखी एक खासियत म्हणजे त्यावरील लुक डाऊन-शूट डाऊन रडार. नेहमीचे रडार जेव्हा हवेतील विमानावरून जमिनीच्या रोखाने वापरले जाते तेव्हा खालील लक्ष्ये शोधणे अवघड असते. रडारच्या लहरी जमिनीवर आपटून परत आल्याने जमीन, झाडे आदी नको त्या बाबींच्या प्रतिमा उमटून रडारच्या पडद्यावर खूप गर्दी होते. त्यातून विमान आणि जमिनीमधील लक्ष्य वेगळे ओळखणे खूप अवघड होते. लुक डाऊन, शूट डाऊन रडारमध्ये हा गोंधळ टाळून केवळ फिरती लक्ष्ये टिपता येतात. हे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानंतर अमेरिकी विमानांची सोव्हिएत हवाई क्षेत्रातील घुसखोरी बरीच कमी झाली.

मिग-२३ हे फायटर विमान होते तर मिग-२७ त्याच डिझाइनवर आधारित ग्राऊंड-अ‍ॅटॅक विमान होते. त्यांनी अरब-इस्रायल, लिबिया, सीरिया, अफगाणिस्तानसह कारगिल युद्धांत भाग घेतला.

sachin.diwan@expressindia.com