News Flash

सब-मशिनगन आणि असॉल्ट रायफलचा उदय

पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेत स्प्रिंगफिल्ड कारखान्यात अशी बंदूक तयार केली गेली.

पहिल्या महायुद्धाच्या दरम्यानच्या काळात रिव्हॉल्व्हरची जागा ऑटोमॅटिक पिस्तुले घेत होती. तसेच रायफलची जागा सब-मशिनगननी घेण्यास सुरुवात केली होती. या काळात रायफलचा साधारण पल्ला ८०० ते १२०० मीटरच्या जवळपास होता. पण पहिल्या महायुद्धानंतर १९३० च्या दशकात जर्मनीने केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले की प्रत्यक्षात चकमकी इतक्या लांबच्या अंतरावर घडत नाहीत त्या फारफार तर ४०० मीटरच्या अंतरात घडतात. त्यामुळे बंदुकांचा इतका लांबचा पल्ला अनावश्यक वाटू लागला. तसेच शत्रूवर अतिंम टप्प्यात निकराचा हल्ला करताना (असॉल्ट) बोल्ट-अ‍ॅक्शन रायफलइतक्या अचूकतेचीही गरज भासत नाही. त्यावेळी नेम अचूक नसला तरी चालतो पण शत्रूवर गोळ्यांचा जोरात वर्षांव करण्याची गरज भासते. तसेच पारंपरिक मशिनगन एकटय़ा सैनाकाने उचलून नेण्याइतक्या हलक्या नसत. या गरजेतून सब-मशिनगन आणि असॉल्ट रायफलचा उदय झाला.

पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेत स्प्रिंगफिल्ड कारखान्यात अशी बंदूक तयार केली गेली. पण तिचा युद्धात वापर झाला नाही. १९१५ साली इटलीच्या डोंगराळ भागातील सैनिकासाठी व्हिलार पेरोसा नावाची  पहिली सब-मशिनगन तयार झाली. पण दोन बॅरल असलेल्या आणि ब्लो-बॅक अ‍ॅक्शनवर आधारित ही बंदूक मिनिटाला १२०० च्या वेगाने गोळ्या झाडत असे. पण दोन बॅरलमुळे ती वापरास किचकट होती. त्यामुळे पहिली खरी सब-मशिनगन बनण्याचा मान जातो तो जर्मन बर्गमान कंपनीचे डिझायनर ह्य़ुगो श्मिसर (Hugo Schmeisser) यांच्या मस्केट (Musquete) नावाच्या बंदुकीला. या बंदुकीने सब-मशिनगनची कल्पना प्रत्यक्षात उतरली होती आणि १९१७ साली जर्मन स्टॉर्मट्रपर्सना ती पुरवण्यात आली.

त्यानंतर ब्रिटिश लँकेस्टर आणि अमेरिकी डिझायनर जनरल जॉन टी. थॉमसन यांची एम १९२८ टॉमी गन बाजारात आली. सोव्हिएत युनियनची पीपीएसएच-४१ ही सब-मशिनगनही बरीच गाजली. या दोन्ही  बंदुकांना गोल थाळीच्या आकाराचे डिस्क मॅगझिन होते. यासह जर्मन एमपी-४०, ब्रिटिश स्टेन गन आणि अमेरिकी एम-३ या सब-मशिनगनही वापरात आल्या. युद्धात  खंदकांमध्ये उतरून हल्ला करताना या बंदुकांनी खूप महत्त्वाची कामगिरी पार पाडली. दोन महायुद्धांदरम्यान आणि त्यांच्या नंतर अमेरिकी टॉमी गनसारख्या बंदुका माफियांच्या हाती पडल्या. त्यामुळे टॉमी गन लष्करापेक्षा माफियांची बंदूक म्हणूनच कुप्रसिद्ध झाली.

sachin.diwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 4:37 am

Web Title: information on sub machinagan and assault rifle
Next Stories
1 अमेरिकी एम १ गरँड रायफल
2 हिटलर आणि जेम्स बॉण्डने वापरलेले वॉल्थर पीपीके
3 बरेटा पिस्तुले : गांधीहत्येसाठी वापरलेले एम १९३४
Just Now!
X