शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात प्रत्यक्ष युद्ध भडकू शकेल अशी परिस्थिती १९६२ साली क्युबातील क्षेपणास्त्र संकटादरम्यान (क्युबन मिसाइल क्रायसिस) आली होती. फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून अवघ्या ९० मैलांवरील क्युबा बेटावर फिडेल कॅस्ट्रो यांची साम्यवादी राजवट यावी हेच अमेरिकेला सलत होते.  बे ऑफ पिग्ज येथे सैन्य उतरवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेची इभ्रत गेली होती.

त्यानंतर १९६२ साली सोव्हिएत युनियनने क्युबाच्या भूमीवर बसवलेल्या क्षेपणास्त्रांची हवाई छायाचित्रे अमेरिकी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांना दाखवण्यात आली आणि त्यांनी नौदलाला क्युबाची नाकेबंदी करण्याचे आदेश दिले. २४ ऑक्टोबर १९६२ रोजी क्युबाकडे निघालेल्या सोव्हिएत नौकांना अडवण्यासाठी अमेरिकी युद्धनौका सरसावल्या आणि जगाने श्वास रोखला. आजपर्यंत दूरवर कोठेतरी क्षितिजावर दिसणारा अणुयुद्धाचा धोका अमेरिकेच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला होता. अखेरच्या क्षणी सोव्हिएत नेते निकिता ख्रुश्चेव्ह यांनी त्यांच्या नौकांना माघारी फिरण्याचे आदेश दिले आणि युद्ध टळले. त्यानंतर सोव्हिएत युनियनने क्युबातून क्षेपणास्त्रे मागे घेतली आणि अमेरिकेने पुन्हा कधीही क्युबावर हल्ला न करण्याचे वचन दिले.

क्युबातील क्षेपणास्त्र संकट आणि १९६७ सालचे अरब-इस्रायल युद्ध यांतील अनुभवानंतर सोव्हिएत युनियनने नौदलाचा विस्तार करण्याचे ठरवले. ही जबाबदारी सोपवली अ‍ॅडमिरल सर्गेई जॉर्जियेविच गॉश्र्कोव्ह यांच्यावर आणि त्यांनी १९७०च्या दशकात सोव्हिएत नौदलाचा विक्रमी विस्तार केला. फ्रुन्झ येथील नाविक अकादमीतून १९३१ साली प्रशिक्षित झालेले गॉश्र्कोव्ह दुसऱ्या महायुद्धात लढले होते आणि काळ्या समुद्रातील नौदल ताफ्याचे नेतृत्व करताना युक्रेन, रुमानिया, बल्गेरिया मुक्त करण्यास मदत केली होती. वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी ते रिअर-अ‍ॅडमिरल या पदावर पोहोचले होते आणि १९५६ साली सोव्हिएत नौदलप्रमुख बनले होते. त्यांनी १९७६ साली ‘सी पॉवर अँड द स्टेट’ हा ग्रंथ लिहून त्यांच्या नाविक संकल्पना मांडल्या. १९८८ साली मृत्यूपर्यंत ते सेवेत होते. त्यांच्या स्मरणार्थ रशियाने त्यांच्या अत्याधुनिक फ्रिगेटना गॉश्र्कोव्ह असे नाव दिले आहे. भारताची विमानवाहू नौका आयएनएस विक्रमादित्य हीदेखील मूळची अ‍ॅडमिरल गॉश्र्कोव्हच.

गॉश्र्कोव्ह यांच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत युनियनने १९७०च्या दशकात तब्बल ३५ क्रूझर, ८५ विनाशिका, १५९ फ्रिगेट, दोन हेलिकॉप्टरवाहू नौका, किव्ह वर्गातील दोन विमानवाहू नौका बांधल्या. याशिवाय त्यावेळी सोव्हिएत नौदलात साधारण ७० क्षेपणास्त्रधारी पाणबुडय़ा आणि ३०० अन्य प्रकारच्या नौका होत्या. हा विस्तार पाहून अमेरिकी अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी १९८१ साली सत्तेवर येताच ६०० युद्धनौकांनी सज्ज नौदल उभारणीचा संकल्प सोडला, पण तो कधीच पूर्णत्वास गेला नाही.

sachin.diwan@expressindia.com