‘लाँग लॅण्ड पॅटर्न मस्केट’ असे अधिकृत नाव असलेल्या पण ‘ब्राऊन बेस’ या नावाने अधिक प्रसिद्ध झालेल्या या बंदुकीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास ब्रिटिश साम्राज्यविस्तारास हातभार लावणारी बंदूक, असेच करावे लागेल. खूप कमी शस्त्रांनी इतिहासात इतक्या व्यापक प्रमाणावर आपली छाप पाडली आहे. त्यामध्ये ब्राऊन बेसचे स्थान नक्कीच वरचे आहे.

या बंदुकीची मूळ आवृत्ती वापरात आली ती १७२२ सालात. त्यानंतर पुढील शतकाहून अधिक काळ म्हणजे १८३०च्या दशकापर्यंत ती वापरात राहिली. हाही एक विक्रमच. या बंदुकीची लांबी खूप जास्त म्हणजे ६३ इतकी होती. त्यामुळेच तिच्या नावात लाँग हा शब्द होता. या बंदुकीला ब्राऊन बेस नाव नेमके कशावरून पडले हे ज्ञात नाही. ही स्मूथ बोअर म्हणजे नळीचा आतील पृष्ठभाग गुळगुळीत असलेली आणि ०.७५ इंच कॅलिबरची (नळीचा आतील व्यास) बंदूक होती. तिची मझल व्हेलॉसिटी म्हणजे बंदुकीतून गोळी सुटण्याचा वेग १४७६ फूट प्रति सेकंद इतकी होती आणि त्यात फ्लिंटलॉक पद्धतीचा अवलंब केला जात असे. मात्र स्मूथ बोअर गन असल्याने तिची अचूकता कमी होती. साधारण ५० यार्ड (४६ मीटर) अंतरापर्यंत तिचा नेम बरा लागत असे. त्यामुळे त्या काळात सैनिकांच्या वैयक्तिक नेमबाजीला फार महत्त्व नसे. बरेच सैनिक एका ओळीत किंवा चौकोनात उभे राहून एकत्र गोळीबार करत. त्याला ‘व्हॉली फायर’ म्हणत. तशा प्रकारे ही बंदूक १०० यार्डापर्यंत (९१ मीटर) प्रभावी मारा करू शकत होती.

पुढे तिची लांबी थोडी करून अनेक प्रकार अस्तित्वात आले. त्यात शॉर्ट लॅण्ड पॅटर्न, न्यू लॅण्ड पॅटर्न, न्यू लाइट इन्फंट्री लॅण्ड पॅटर्न, कॅव्हलरी कार्बाइन, सी सव्‍‌र्हिस पॅटर्न अशा प्रकारांचा समावेश होता. पण भारतीयांसाठी विशेष बाब म्हणजे तिचा एक प्रकार इंडिया पॅटर्न नावाने ओळखला जायचा आणि तिचा वापर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक करत. तिची लांबी ५४ इंचांच्या आसपास होती. मूळच्या बंदुकीतील लाकडी रॅम-रॉडच्या जागी त्यात लोखंडी रॅम-रॉड होता. फ्रान्समध्ये १७९३ साली क्रांतिकारी युद्धे सुरू झाली तेव्हा युरोपात बंदुकांची कमतरता भासू लागली. त्यामुळे भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या काही बंदुका तिकडे पाठवण्यात आल्या होत्या. रुडयार्ड किपलिंगने १९११ साली ब्राऊन बेसवर कविताही रचली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्राऊन बेसने ब्रिटिश साम्राज्याचा जगभर विस्तार करण्यात मोठा हातभार लावला. स्थानिक नागरिकांच्या शस्त्रांच्या मानाने ती बरीच वरचढ होती. ब्रिटिश साम्राज्य विस्तारले जात असताना जी युद्धे झाली त्यात ब्राऊन बेसचा मोठा वाटा आहे. त्यात अँग्लो-म्हैसूर वॉर, अँग्लो-मराठा वॉर्स, भारतातील १८५७चा उठाव, युरोपमध्ये नेपोलियनची युद्धे, फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकी स्वातंत्र्ययुद्ध, आयरिश क्रांती, अमेरिकन आणि मेक्सिकन युद्ध, चीनमधील ओपियम वॉर, ऑस्ट्रेलियातील युद्धे अशा अनेक युद्धांचा समावेश आहे. भारतीयांसाठी १८५७च्या उठावात ब्राऊन बेसचा वापर दूरगामी परिणाम करणारा ठरला.

sachin.diwan@expressindia.com