क्रिमियन युद्धानंतर झालेले अमेरिकी गृहयुद्धही आधुनिक शस्त्रास्त्रांच्या वापरासाठी आणि विकासासाठी महत्त्वाचे होते. १८६१ ते १८६५ दरम्यान अमेरिकेत गृहयुद्ध चालले. त्यात उत्तरेकडील राज्ये (युनियन) आणि दक्षिणेकडील बंडखोर राज्ये (कन्फेडरेट स्टेट्स) यांच्यात युद्ध झाले. अखेर उत्तरेकडील राज्यांनी दक्षिणेचे बंड मोडून काढत देशाचे एकीकरण केले. या युद्धात दोन्ही बाजूंकडून तोफखान्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात आला. किंबहुना उत्तरेच्या विजयात तोफखान्याची भूमिका महत्त्वाची होती. गेट्टिसबर्गच्या निर्णायक लढाईत तोफखान्याने उत्तरेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

उत्तरेच्या राज्यांत कारखानदारीने चांगले मूळ धरले असल्याचा फायदा त्या राज्यांना झाला. उलट दक्षिणेकडील राज्ये बहुतांशी शेतीवर आधारित होती. त्यांना लष्करी सामग्रीच्या पुरवठय़ाबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या युद्धसामग्रीत तसेच तिच्या वापराच्या पद्धतीतही फरक होता. त्याने युद्धाच्या निर्णयावर परिणाम केला.

Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा

उत्तरेकडील राज्यांच्या तोफखान्याच्या रचनेत फरक होता. त्यांच्या तोफखान्यात ब्रिगेडपर्यंतच्या तुकडय़ांच्या तोफा त्या-त्या तुकडीकडेच ठेवल्या होत्या. तर डिव्हिजन आणि कोअर पातळीवरील तुकडय़ांच्या तोफा काढून घेऊन आर्टिलरी रिझव्‍‌र्ह नावाच्या वेगळ्या तुकडय़ा बनवल्या होत्या. त्याने लहान तुकडय़ा त्यांच्या पातळीवर गरजेनुसार माफक प्रमाणात तोफखाना वापरू शकल्या. तर मोठय़ा प्रमाणावर तोफखान्याचा मारा नियंत्रित करण्यासाठी राखीव दलांच्या तोफा उपयोगी पडल्या. ही रचना प्रत्यक्ष युद्धात खूप प्रभावी ठरली.

अमेरिकी गृहयुद्धात प्रामुख्याने ब्राँझ किंवा लोखंडी बनावटीच्या तोफा वापरात होत्या. त्यात ६ पौंडांची फिल्ड गन, १२ पौंडांची हॉवित्झर, १२ पौंडांची माऊंटन गन, ३ इंच व्यासाची ऑर्डनन्स रायफल, २४ पौडांची हॉवित्झर आदी तोफांचा समावेश होता. पण त्यातही १०, १२ आणि २० पौंडांची पॅरट तोफ, १२ पौंडांची नेपोलियन तोफ आणि १२ पौंडांची व्हिटवर्थ ब्रिच-लोडिंग तोफ या विशेष गाजलेल्या तोफा होत्या.

फ्रान्सचा सम्राट तिसरा नेपोलियन याच्या नावाने १२ पौंडी तोफेचे नाव नेपोलियन असे ठेवले होते. तिचा पल्ला साधारण दीड किलोमीटर होता. ही स्मूथ बोअर गन असली तरी ती खात्रीलायक आणि सुरक्षित असल्याने सैनिकांमध्ये आपलीशी होती. रॉबर्ट पार्कर पॅरट या अमेरिकी तंत्रज्ञ आणि सैनिकाने विकसित केलेल्या तोफा पॅरट गन म्हणून ओळखल्या जात. विविध प्रकारच्या पॅरट तोफांचा पल्ला १८०० ते २००० मीटर होता. ब्रिटिश तंत्रज्ञ जोसेफ व्हिटवर्थ यांनी तयार केलेल्या तोफाही या युद्धात प्रभावी ठरल्या. १२ पौंडी व्हिटवर्थ तोफा अडीच किलोमीटपर्यंत मारा करू शकत.

– सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com