प्राचीन काळापासून नौदलाचा वापर होत असता तरी त्याचा पहिला सुसंघटित वापर करण्याचे श्रेय चिनी संस्कृतीला दिले जाते. त्याशिवाय ग्रीक, रोमन, फिनिशियन, व्हायकिंग, कार्थेजियन, बायझंटाइन, इजिप्शियन, भारतीय आदी संस्कृतींमध्येही नौदलाचा विकास झाला होता.
चिनी संस्कृतीत प्रथम लौ चुआन म्हणजे टॉवर शिप नावाने ओळखल्या जाणाऱ्या नौकांचा नद्या आणि समुद्रातील युद्धांत वापर झाला. चिनी युद्धनौकांचा वापर ख्रिस्तपूर्व २२१ चे २१० या काळात किन घराण्याच्या आणि क्रिस्तपूर्व २०६ ते इस २२० या काळात हान वंशाच्या काळात शिगेला पोहोचला होता. त्यात झिआन डेंग म्हणजे हल्ल्यासाठी वापले जाणारे जहाज, मेंग चोंग म्हणजे शत्रूच्या जहाजावर धडकवले जाणारे जहाज (रॅमिंग शिप) बेन मा म्हणजे घोडय़ासारखे वेगवान जाणारे जहाज यांचा समावेश होता.
भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांसाठी त्या समुद्रावर प्रभुत्व मिळवणे हे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि व्यापारासाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे ग्रीक, रोमन, फिनिशियन, इजिप्शियन लोकांनी नौदलाचा विकास केलेला आढळतो. फिनिशियन, ग्रीक आणि रोमन लोक गॅली या प्रकारची जहाजे वापरत. ती सामान्यत: वल्ह्य़ांनी हाकली जात आणि बरेचदा त्यांना वाऱ्याच्या शक्तीने प्रवासासाठी शिडेही असत. पश्चिमेकडील रोमन साम्राज्याचा ५ व्या शतकात पाडाव होईपर्यंत सागरी युद्धांत गॅली या प्रकरच्या युद्धनौकांचे वर्चस्व राहिले. त्यानंतरही बायझंटाइन, मुस्लीम आणि रोमन साम्राज्याच्या वंशजांमध्ये गॅलीचा काही प्रमाणात वापर होत राहिला. इटलीतील व्हेनिस, पिसा, जिनोआ आदी राज्यांकडून पुढील अनेक वर्षे गॅली या प्रकरच्या जहाजांचा वापर होत राहिला. त्यानंतर शिडाच्या जोरावर वेगाने प्रवास करणाऱ्या कॉग आणि कॅरॅक या प्रकारच्या जहाजांचा जमाना आला. त्यांनी गॅलीचा वापर मागे पाडला.
सचिन दिवाण
sachin.diwan@expressindia.com