ग्रीक, रोमन, फिनिशियन, इजिप्शियन, चिनी संस्कृतींप्रमाणेच भारतीय संस्कृतीतही समृद्ध सागरी परंपरा आहे. भारतातून रोम, इराण, इजिप्त, जावा, सुमात्रा आदी ठिकाणी व्यापार चालत असे. आजच्या बांगलादेशमधील ढाक्याचे रेशीम, दक्षिणेतील मसाल्याचे पदार्थ, लाकूडफाटा, दागदागिने, जडजवाहीर आदी वस्तू भारतातून निर्यात होत असत. ढाक्याचे रेशीम रोमच्या बाजारपेठेत विशेष लोकप्रिय होते असे म्हणतात. आजच्या सागरी किंवा विदेशी व्यापाराच्या भाषेत सांगायचे तर त्यावेळी भारताचा परदेशी व्यापार फेवरेबल ट्रेड या सदरात मोडत होता. भारताचा ट्रेड बॅलन्स देशाच्या बाजूने झुकलेला होता. म्हणजेच भारतातून निर्यात अधिक होत होती आणि भारतात आयात कमी होत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋग्वेदामध्ये वरुण ही पाणी आणि समुद्राची देवता मानली गेली आहे. तसेच प्राचीन काळी भारतात मत्स्ययंत्र नावाने जे यंत्र वापरले जायचे ते सध्याच्या मरीनर्स कंपाससारखे होते असे म्हणतात. सिंधू नदीच्या परिसरातील प्राचीन मोहन्जोदडो आणि हडाप्पा संस्कृतींमध्ये सागरी व्यापाराला मोठे महत्त्व होते. सिंधू संस्कृतीतील लोथल हे बंदर ख्रिस्तपूर्व २३०० वर्षांपूर्वी बांधले गेल्याचे मानले जाते. सध्याच्या गुजरातमधील मंगरोळजवळ लोथल हे बंदर होते. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात राज्याचे स्वतंत्र नाविक दल होते. सम्राट अलेक्झांडर (सिकंदर) भारताच्या सीमेवरून जेव्हा परत गेला तेव्हा त्याने सिंधमध्ये बांधलेल्या नौका वापरल्या होत्या.

दक्षिणेतील चोला वंशाच्या शासनकाळात भारतीय सागरी परंपरा शिगेला पोहोचल्याचे मानले जाते. त्या राजांनी म्यानमार आणि आग्नेय आशियातील बऱ्याच मोठय़ा प्रदेशावर वर्चस्व निर्माण केले होते. कलिंग आणि विजयनगरच्या साम्राज्यानेही मोठी सागरी सत्ता प्रस्थापित केली होती. प्राचीन काळी भारतात जहाजांची सामान्य आणि विशेषां अशा  दोन प्रकारांत विभागणी केली होती. सामान्यमध्ये क्षुद्र, मध्यमा, भीमा, चपला, पटला, भाया, दीर्घा, पत्रापुता, गर्भारा आणि मंथरा अशा नावांची जहाजे होती. तर विशेषांमध्ये लांबीनुसार दीर्घा आणि उंचीनुसार उन्नता असे दोन उपप्रकार होते. दीर्घामध्ये दीर्घिका, तारणी, लोला, गत्वारा, गामिनी, तारी, जानघाला, प्लाबिनी, धारिणी आणि बेगिनी ही जहाजे असत. तर उन्नता प्रकारात उध्र्व, अनुध्र्वा, स्वर्णमुखी, गर्भिणी, मंथरा अशा प्रकारच्या जहाजांचा समावेश होता. विशेषां प्रकारची जहाजे समुद्रप्रवासासाठी योग्य होती.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different types of weapons part
First published on: 15-06-2018 at 00:45 IST