दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या रायफलमध्ये जर्मन हेक्लर अँड कॉख जी-३ रायफलचे डिझाइन आणि गुणवत्ता बरीच उच्च होती. रशियाची एके-४७, अमेरिकेची एम-१६ या रायफलना जे स्थान मिळाले तेच जर्मन जी-३ रायफललाही आहे. जगातील साधारण ७५ देशांच्या सैन्याने त्या रायफलचा स्वीकार केला आणि बऱ्याच देशांत त्या रायफलची निर्मितीही होऊ लागली.
वास्तविक दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जर्मनीच्या माऊझर कारखान्यातील अभियंते सिलेक्टिव्ह फायर, मॅगझिन-लोडेड रायफलच्या डिझाइनवर काम करत होते. युद्धानंतर स्पेनमधील सीईटीएमई या कंपनीत ते डिझाइन अधिक विकसित करण्यात आले. त्यावर आधारित रायफलच्या उत्पादनाचे अधिकार जर्मनीने १९५९ साली विकत घेतले आणि जर्मनीतील हेक्लर अँड कॉख (एच अँड के) या नामांकित कंपनीकडे दिले. त्यानुसार या कंपनीने तयार केलेल्या रायफलला गेवेर ३ किंवा रायफल मॉडेल ३ म्हटले जाऊ लागले. त्यापेक्षा ती रायफल जी-३ नावानेच अधिक प्रसिद्ध झाली.
त्या काळात नावारूपास आलेल्या बेल्जियमच्या एफएन-एफएएल आणि अमेरिकेच्या एम-१४ रायफलच्या तुलनेत जी-३ तयार करण्यास कमी खर्च येत असे, कारण तिच्या निर्मितीत दबाव देऊन घडवलेले पोलाद (स्टँप्ड स्टील) वापरले होते. या बंदुकीत नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) देशांच्या सैन्याकडून वापरात येणाऱ्या ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्या वापरल्या जात. त्यात रोलर-डिलेड ब्लोबॅक अॅक्शन तंत्राचा वापर केला आहे.
या बंदुकीची रिअर साइट (नेम धरण्यासाठी वापरण्यात येणारी मागील खूण) ड्रमच्या आकाराची होती. ते या रायफलचे वेगळेपण होते. तिला सुरुवातीला लोखंडी साइट्स होत्या. नंतर डायॉप्टर प्रकारच्या रोटेटिंग साइट्स बसवण्यात आल्या. त्यावर १०० ते ४०० मीटपर्यंत नेम धरण्याची सोय होती. ती सेमी-ऑटोमॅकि किंवा फुल-ऑटोमॅटिक प्रकारात वापरता येत असे. ही बंदूक देखभालीसाठीही अत्यंत सोपी होती. तिला २० गोळ्यांचे मॅगझिन किंवा ५० गोळ्यांचे ड्रम मॅगझिन लावता येत असे. त्यातून मिनिटाला ५०० ते ६०० च्या वेगाने गोळ्या झाडता येत असत. याशियावाय या रायफलवर संगीन, अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर, टेलिस्कोपिक साइट्स आणि नाइट व्हिजन उपकरणेही बसवता येत असत.
पश्चिम जर्मनीच्या सैन्याने स्वीकारल्यानंतर साधारण ५० देशांच्या सैन्यात जी-३ रायफल वापरात आली. ग्रीस, इराण, मेक्सिको, नॉर्वे, पोर्तुगाल, स्वीडन, तुर्कस्तान यांच्यासह पाकिस्तानी सैन्यातही जी-३ रायफल वापरात होत्या. ग्रीस, पाकिस्तान, इराण, तुर्कस्तान आणि पोर्तुगालमध्ये जी-३ रायफलची निर्मितीही होत होती.
पाकिस्तानने जी-३ त्यांच्या सैन्याची स्टँडर्ड रायफल म्हणून स्वीकारली होती. या बंदुकीने सिमेंट काँक्रिट नसलेल्या विटांच्या भिंती आणि बंकरच्या भिंतीही भेदता येतात. तसेच तिच्या गोळ्या लेव्हल-३ प्रकारचे चिलखत भेदू शकतात. भारतीय लष्करात साधारणपणे हीच चिलखते वापरात होती. म्हणून पाकिस्तानने ही रायफल स्वीकारल्याचे एक कारण दिले जाते. तसेच थोडय़ा सुधारणा करून जी-३ चांगली स्नायपर रायफल म्हणूनही वापरता येते.
सचिन दिवाण : sachin.diwan@ expressindia.com