लंडनमधील इराणच्या वकिलातीत ३० एप्रिल १९८० रोजी डेमोक्रॅटिक रेव्होल्युशनरी फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ अरबिस्तान नावाच्या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ जणांना ओलीस ठेवले. खुझेस्तान येथील तुरुंगातील अरब कैद्यांना मुक्त करून ब्रिटनबाहेर जाण्यास मुक्तद्वार द्यावे अशी त्यांची मागणी होती. मात्र ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी दहशतवाद्यांसमोर झुकण्यास नकार दिला आणि ब्रिटिश स्पेशल एअर सव्‍‌र्हिसच्या (एसएएस) कमांडोंनी इराणी वकिलातीत ‘ऑपरेशन निमरॉड’ नावाने कारवाई केली. ५ मे १९८० रोजी पाच दहशतवाद्यांना ठार मारून आणि एकाला अटक करून कारवाई संपली. त्यात दोन ओलीसही मारले गेले. या कारवाईच्या टेलिव्हिजन प्रक्षेपणात लोकांची नजर खिळवली ती सफाईदारपणे दहशतवाद्यांना टिपणाऱ्या हेक्लर अ‍ॅण्ड कॉख एमपी-५ सब-मशीनगनने!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी जर्मनीच्या ‘जीएसजी-९’ या दहशतवादविरोधी कमांडो पथकाने ऑक्टोबर १९७७ मध्ये लुफ्तांसा विमानाचे अपहरण करून ते सोमालियातील मोगादिशू येथे नेणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध एमपी-५चा वापर केला होता. तेव्हापासून आजतागायत ही जर्मन बंदूक अमेरिकी नेव्ही सील्ससह जगभरच्या दहशतवादविरोधी कमांडो पथकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. त्यात भारतातील ‘एनएसजी’सह अन्य कमांडो पथकांचाही समावेश आहे. दहशतवादविरोधी कारवाईत एमपी-५ म्हणजे कमांडोंची ‘वेपन ऑफ चॉइस’ आहे.

एमपी-५ची (मशीननपिस्टोल) निर्मिती तशी १९६६ सालची. तिच्या मॅगझिनमध्ये ९ मिमी व्यासाच्या १५ ते ३० पॅराबेलम गोळ्या मावतात. मिनिटाला ८०० च्या वेगाने साधारण २०० मीटपर्यंत गोळ्या झाडणारी एमपी-५ तुलनेने खूपच स्थिर आहे. परिणामी तिची अचूकताही उत्तम आहे. त्याचे गमक एमपी-५च्या ‘रोलर-डिलेड ब्लोबॅक’ प्रणालीत आहे. एमपी-५चे वजन केवळ अडीच किलो आणि लांबी २६ इंच आहे. त्यामुळे ती हाताळण्यास हलकी आणि लपवण्यास सोपी आहे. मात्र तिचा मारा तितकाच प्रखर आहे. तिचे हे गुण दहशतवादविरोधी कारवाईत उपयोगी ठरतात.

शहरी भागातील कारवायांसाठी एमपी-५ची कुर्झ म्हणजे लहान आवृत्तीही १९७२ साली वापरात आली. तिला एमपी-५ के म्हणतात. तिची लांबी केवळ १३ इंच आणि वजन २.१ किलो आहे. मात्र मारकक्षमता एका मिनिटाला ९०० गोळ्या इतकी आहे. इतक्या वेगाने गोळ्या झाडताना बंदूक स्थिर राहावी म्हणून तिच्या पुढेही वेगळी मूठ बसवली आहे. ही बंदूक खास ब्रिफकेसमध्ये ठेवूनही फायर करता येते.

जर्मन अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असलेली ही बंदूक जगातील सर्वात प्रभावी सब-मशीनगनमध्ये गणली जाते.

sachin.diwan@expressindia.com 

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heckler koch mp5 submachine gun
First published on: 20-03-2018 at 05:21 IST