scorecardresearch

‘अवतार’ हायपरप्लेन

शस्त्रास्त्रांच्या विकासाला आधुनिक अंतराळ तंत्रज्ञानाची (स्पेस टेक्नॉलॉजी) जोड मिळाल्याने नवे दालन खुले होत आहे.

‘अवतार’ हायपरप्लेन

शस्त्रास्त्रांच्या विकासाला आधुनिक अंतराळ तंत्रज्ञानाची (स्पेस टेक्नॉलॉजी) जोड मिळाल्याने नवे दालन खुले होत आहे. प्रगत देशांच्या बरोबरीने भारतानेही या क्षेत्रात पदार्पण केले असून स्वदेशी प्रयत्नांना काही प्रमाणात यशही येत आहे. ‘अवतार’ हा भारताचा अत्याधुनिक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ‘अवतार’ हे एरोबिक व्हेइकल फॉर ट्रान्सअ‍ॅटमॉस्फेरिक हायपरसॉनिक एरोस्पेस ट्रान्स्पोर्टेशन या शब्दसमूहाचे लघुरूप आहे. या प्रकल्पाबद्दल फारशी वाच्यता झालेली नाही आणि पुरेशी माहितीही उपलब्ध नाही. मात्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या प्रकल्पावर काम करीत आहे. या प्रकल्पाला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) सहकार्य मिळत असल्याची चर्चा होती. मात्र सरकारने लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात त्याचा इन्कार केला आहे.

कमी वेळात नागरी आणि लष्करी उपयोगाचे कृत्रिम उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठीचे, पुन्हा वापरता येणारे (रि-युजेबल) आणि हायपरसॉनिक वेगाने प्रवास करणारे प्रक्षेपक वाहन तयार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्याचा पुढे क्षेपणास्त्रासारखा आणि हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकल शस्त्रासारखाही वापर करता येईल. ‘अवतार’ प्रकल्पात अनेक उपयंत्रणांचाही विकास केला जात आहे. त्यात प्रामुख्याने एअर-ब्रीदिंग रॉकेट तंत्रज्ञानाचा समावेश आहे. उपग्रह प्रक्षेपकात ७० टक्क्य़ांहून अधिक वजन त्याच्या इंधनाचे आणि ऑक्सिडायझरचे असते. त्यासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजन द्रवरूपात वाहून नेले जातात. या वजनामुळे प्रत्यक्ष उपग्रह किंवा क्षेपणास्त्रांच्या बाबतीत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता कमी होते. यावर मात करण्यासाठी एअर-ब्रीदिंग रॉकेटमध्ये प्रक्षेपणादरम्यान वातावरणातील ऑक्सिजन वेगळा काढून तो वापरण्याची सोय केलेली असते. त्यामुळे द्रवरूप ऑक्सिजन वाहून नेण्याची गरज उरत नाही.

तसेच हे वाहन हायपरसॉनिक वेगाने (ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपटहून अधिक वेगाने – माक-५) प्रवास करेल. सध्या त्याचा वेग माक-६ ते माक-९ पर्यंत असेल. भविष्यात तो माक-२५ पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. हे वाहन सुरुवातीला रॉकेट इंजिन वापरून ठरावीक उंचीवर वाहून नेले जाईल. त्यानंतर ते स्क्रॅमजेट इंजिनाचा वापर करून हायपरसॉनिक वेगाने प्रवास करेल. त्याला दिलेली मोहीम पूर्ण झाल्यानंतर हे वाहन विमानाप्रमाणे किंवा स्पेस शटलप्रमाणे जमिनीवर उतरेल आणि पुन्हा वापरासाठी तयार करता येईल.

यासाठी इस्रो रि-युजेबल लाँच व्हेइकल-टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन (आरएलव्ही-टीडी) या प्रक्षेपकाच्या चाचण्या घेत आहे. मात्र ‘इस्रो’च्या ‘आरएलव्ही-टीडी’ या प्रकल्पाचा ‘डीआरडीओ’च्या ‘अवतार’  हायपरप्लेन प्रकल्पाशी काही संबंध नसल्याचे सांगितले जाते. याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी या प्रकल्पांच्या उपयंत्रणांच्या चाचण्यांच्या बातम्या अधूनमधून प्रसारमाध्यमांत येत आहेत. अशा प्रकल्पांच्या यशस्वितेवरच भारताची भविष्यातील युद्धे लढण्याची आणि जिंकण्याची क्षमता अवलंबून आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची ( Gaatha-shastranchi ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या