राजकीय नेत्यांची छबी असलेले मोठाले फलक उभारून गणेशोत्सव आयोजनाचा खर्च वसूल करणाऱ्या मंडळांनी यंदा कोणत्याही क्षणी जाहीर होणाऱ्या निवडणूक आचारसिहताचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. वाढदिवस तसेच उत्सवांमध्ये कार्यकर्त्यांकरवी आपली छबी असलेले फलक जागोजागी झळकावून घेण्याची ठाण्यातील नेत्यांना भारी हौस असते. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रौत्सवात शहरातील प्रत्येक चौक अशा बेकायदा फलकांनी आणि जाहिरातीच्या प्रवेशद्वारांनी फुलून गेल्याचे दिसतात. यंदा मात्र निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे राजकीय नेत्यांकडून मिळणाऱ्या देणग्यांच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या या फलकांवर गंडांतर येण्याची चिन्हे दिसू लागल्याने मंडळांचे पदाधिकारी धास्तावले आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवांचे मोठय़ा प्रमाणावर व्यावसायिकीकरण झाल्याचे चित्र दिसून येते. मोक्याच्या चौकात अथवा रस्त्यांच्या कडेला साजरा करण्यात येणाऱ्या मंडळांना जाहिरातींच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या देणग्या मिळत असल्याने या काळात रस्ते खोदून कमानी, प्रवेशद्वार उभारण्याची अक्षरश अहमहमिका लागते. वाशीसारख्या शहरात महत्त्वाच्या चौकात अशा कमानींवर जाहिराती झळकविण्याचे दर दीड ते दोन लाख रुपयांच्या घरात पोहचले आहेत. ठाण्यात नौपाडा परिसरात अशा कमानींवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या जाहिरातींचे दर सर्वाधिक आहेत. या व्यावसायिक जाहिराती करत असताना राजकीय नेत्यांमार्फत मोठय़ा प्रमाणावर फलकांची उभारणी केली जाते. निवडणुकीच्या तोंडावर उत्सवाच्या आयोजकांनी सर्वच इच्छुकांकडून मोठय़ा प्रमाणावर देणग्या वसूल करण्यासाठी सपाटा लावला आहे. या देणग्यांच्या माध्यमातून मंडळे स्वखर्चाने फलकांची उभारणी करत असल्याने नेत्यांचेही काम फत्ते होते. त्यामुळे उत्सवांच्या काळात अशा राजकीय जाहिरातबाजीला अक्षरश: ऊत येत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, राज्याच्या निवडणुकांच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची चिन्हे असल्यामुळे मंडळांचे पदाधिकारी द्वीधा मन:स्थितीत सापडले आहे. निवडणुका जवळ असल्यामुळे राजकीय नेत्यांकडून घसघशीत वर्गणी मिळत असली तरी या नेत्यांचे फलक उभारण्यासंबंधी अजूनही स्पष्टता नसल्याने गणेश मंडळांचे पदाधिकारी गोंधळले आहेत. आचारसिहतेच्या काळात राजकीय नेत्यांची छबी असलेले फलक स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत तातडीने काढले जातात. लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या प्रचाराच्या फलकांचा अतिरेक झाल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शंकर भिसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यामुळे फलक उभारणीच्या नियमांची यंदाही काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांचे फलक उभारून एक-दोन दिवसांतच काढावे लागले तर असा केलेला खर्च वाया जाईल, अशी भीती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे नेत्यांकडून देणगी घेताना ‘साहेब फलकांचे काय करू’, अशी विचारणा मंडळांकडून केली जात असल्याचे ठाण्यातील एका राजकीय नेत्याने सांगितले. राजकीय नेत्याची छबी असलेले प्रवेशद्वार उभारणीस मान्यता मिळाल्यास देणगीचा आकडा वाढतो. मात्र, आचारसिहतेमुळे प्रवेशद्वारावर गंडांतर येण्याची चिन्हे असल्यामुळे देणग्यांचा आकडाही आटला आहे, अशी माहिती ठाण्यातील एका गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिला.