ढोल-ताशांचा निनाद.. बँडपथकांचे सुरेल वादन.. ‘बाप्पा मोरया’चा गजर.. अशा उत्साही वातावरणात अकरा दिवसांच्या आनंद सोहळ्याची शुक्रवारी प्रतिष्ठापना होणार आहे. मानाच्या गणपतींची विधिवत पूजेनंतर माध्यान्हीपूर्वीच प्रतिष्ठापना होणार आहे. तर, कलाकारांसह कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण देत पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवामुळे सर्वाना ‘अच्छे दिन’ची प्रचिती येणार आहे.
सकल कलांचा अधिपती आणि गणांचा नायक असलेल्या लाडक्या गणरायाचे शुक्रवारी गणेश चतुर्थीपासून घरोघरी आगमन होत असून पुण्यनगरीच्या वैभवशाली गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. आंबेगाव तालुक्यातील माळीण येथील दुर्घटनेचे दु:ख पचवून सर्व कार्यकर्ते गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. काही गणेश मंडळांनी उत्सवावरील खर्चामध्ये बचत करून काही निधी माळीण दुर्घटनेतील पुनर्वसनासाठी देण्याचे निश्चित केले आहे. लाडक्या गणेशाच्या स्वागतासाठी सारे उत्सुक झाले आहेत. देखाव्याची तयारी सुरू ठेवतानाच शुक्रवारी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. प्रतिष्ठापनेसाठी गुरुजींकडून मुहूर्त घेणे, पूजा साहित्याची खरेदी, ढोल-ताशा पथके आणि बँडपथकांच्या प्रमुखांना भेटून वेळ निश्चित करणे आणि देखाव्याच्या कामामध्ये सहभाग अशा सर्वच पातळ्यांवर कार्यकर्ते झटून काम करीत आहेत. घरोघरी प्रतिष्ठापना करावयाच्या गणेश मूर्ती अनेकांनी पारंपरिक पेहरावामध्ये गुरुवारी सायंकाळी घरी आणून ठेवली. तर, काहींनी गणेश मूर्ती आधीच निश्चित केली होती. त्यामुळे कामावरुन घरी परतल्यानंतर कुटुंबीयांसमवेत दुकानांमध्ये जात गणेश मूर्ती घरी आणण्यात आली.

प्रतिष्ठापना माध्यान्हीपूर्वी
घरोघरी मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी ६ या अरुणोदय समयापासून ते ११ वाजून ५३ मिनिटे या माध्यान्ह प्रहरापर्यंत करावी. सूर्योदयापासून ते सकाळी १० वाजेपर्यंतचा काळ हा प्रथम प्रहराचा म्हणून सर्वोत्तम असल्याचे ‘शारदा ज्ञानपीठम्’चे पं. वसंत गाडगीळ यांनी सांगितले. पहाटे ४ वाजून ५५ मिनिटे या ब्राह्म मुहूर्तापासून ते माध्यान्ह समाप्तीपर्यंत म्हणजे दुपारी १ वाजून ४० मिनिटांपर्यंत कोणत्याही वेळी गणरायाची प्रतिष्ठापना करावी, असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले.  
…………….
– कसबा गणपती
उत्सव मंडपापासून सकाळी १० वाजता मिरवणुकीस प्रारंभ
देवळाणकर बंधूंचे सनईवादन
प्रभात बँडपथक
समर्थ प्रतिष्ठानचे ढोल-ताशा पथक
अॅड. सुनील काळे यांच्या हस्ते ११.१६ वाजता प्रतिष्ठापना
पंचरथा मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये श्रींची मूर्ती

– श्री तांबडी जोगेश्वरी
चांदीच्या पालखीतून सकाळी १० वाजता मिरवणूक
सतीश आढाव यांचे नगारावादन
शिवमुद्रा ढोल-ताशा पथक
न्यू गंधर्व बँडपथक
‘भाग्यश्री ट्रॅव्हल्स’चे विवेक गोळे यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता प्रतिष्ठापना

– श्री गुरुजी तालीम मंडळ
सकाळी ९ वाजता मिरवणूक
सुभाष सरपाले यांनी केलेला पुष्परथ
नगरकर बंधूंचे नगारावादन
शिवगर्जना, नादब्रह्म, चेतन स्पोर्ट्स पथके
उद्योजक मनोज आणि डॉ. प्रीती छाजेड यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता प्रतिष्ठापना
फायबर ग्लासपासून केलेली मंदिराची प्रतिकृती

– तुळशीबाग गणपती ट्रस्ट
टिळक पुतळा येथून सकाळी ९.३० वाजता मिरवणूक
लोणकर बंधूंचे नगारावादन
गजलक्ष्मी, शौर्य, वज्र ढोल-ताशा पथके
कर्नल (निवृत्त) संभाजी पाटील यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता प्रतिष्ठापना
– गणरायासाठी केलेला चांदीचा हार

– केसरीवाडा गणेशोत्सव ट्रस्ट
रमणबाग प्रशाला येथून सकाळी १० वाजता मिरवणूक
बडवे बंधूंचे नगारावादन
श्रीराम ढोल-ताशा पथक
रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता प्रतिष्ठापना

– श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट
लाकडी रथातून सकाळी ९ वाजता मिरवणूक
खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता प्रतिष्ठापना

– श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट
फुलांच्या रथातून सकाळी ८ वाजता मंदिरापासून मिरवणूक
मुळशी तालुक्यातील ढोल-ताशा पथके
प्रभात, दरबार बँडपथके
अॅड. विष्णू पारनेरकर यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता प्रतिष्ठापना
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंह यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता विद्युत रोषणाईचे उद्घाटन

– अखिल मंडई मंडळ
उत्सव मंडपापासून सकाळी १० वाजता मिरवणूक
रणवाद्य, नूमविय ढोल-ताशा पथके
अॅड. हर्षद निंबाळकर यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता प्रतिष्ठापना
………………….
बाप्पा मोरया
बुद्धिदेवता गणेश, नृत्यनिपुण, वादक, चित्रकार, व्यासांच्या महाभारताचे लेखन करणारा, असुरांचा नाश करणारा, रांगोळी काढणारा अशी गणेशाची वेगवेगळी २५ रुपे ‘बाप्पा मोरया’ या अनोख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहावयास मिळणार आहेत. प्रसिद्ध रंगावलीकार जगदीश चव्हाण यांनी रांगोळीच्या माध्यमातून तसेच धान्य, डाळी, साबूदाणा, वरई यांचा वापर करून ही रुपे साकारली आहेत. लक्ष्मण भुवन मंगल कार्यालय येथे शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजता पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य हेमंत पेंडसे यांच्या हस्ते जगदीश चव्हाण यांच्या रौप्यमहोत्सवी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. पाटे डेव्हलपर्सचे बाळासाहेब पाटे या वेळी उपस्थित राहणार आहेत. ६ सप्टेंबपर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ११ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.