डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकवादाच्या प्रचाराची गरज आणखीनच अधोरेखित झाली असून यंदा गणेशोत्सवातही त्याचे प्रतिबिंब उमटणार आहे. शहरातील काही मंडळे अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधीचे देखावे उभारत आहेत, तसेच काही संस्थांनी या विषयावरील देखाव्यांना उत्तेजन देण्यासाठी स्पर्धाचेही आयोजन केले आहे.
मोती चौकातील सराफ सुवर्णकार गणपती ट्रस्टतर्फे या वर्षी ‘श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी’ हा देखावा उभारण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय देवकर यांनी सांगितले. भोंदू महाराज नागरिकांच्या श्रद्धाळू वृत्तीचा गैरफायदा घेऊन त्यांना लिंबू, गंडेदोरे, अंगारे देऊन कसे फसवतात, सेवा करून घेण्याच्या बहाण्याने स्त्रियांचा गैरफायदा कसा घेतात, पुढारी मंडळीही याच बुवाबाबांचे लांगूलचालन कसे करतात याची गोष्ट या देखाव्यात सांगण्यात आली आहे. मूर्तिकार सतीश तारू यांनी हा देखावा साकारला आहे.
अंदश्रद्धा देवाख्यांसाठी बक्षिसे
 धर्म आणि अंधश्रद्धांचा पगडा न जुमानणाऱ्या शिवाजी महाराजांचे स्मरण करण्यासाठी तसेच डॉ. दाभोलकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी काही शिवप्रेमी संघटनांनी अंधश्रद्धाविरोधी देखावे उभारण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिवप्रेमी जनजागरण समिती, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रशक्ती संघटना, अखिल भारतीय मराठा महासंघ, पुरंदर प्रतिष्ठान, बुलंद छावा संघटना, मराठा युवा फाऊंडेशन, छावा युवा संघटना या संघटनांनी या स्पर्धेची संकल्पना समोर आणली आहे. या स्पर्धेतील विजयी मंडळांसाठी तब्बल अकरा लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबर सोसायटय़ा व बाल मित्र मंडळेही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक मंडळांसाठी पाच हजार रुपयांचे प्रवेश शुल्क असून सोसायटय़ा व बाल गणेश मंडळांसाठी अनुक्रमे पाचशे व शंभर रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९४२२३०९४५०, ९४२३५०५०७०, ९८५०८४२७०३ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक संस्थांतर्फे मुकुंद काकडे यांनी केले आहे.