अद्वैत परिवार (अपंग-अव्यंग समन्वय) यांच्यातर्फे हत्ती गणपती मंडळाच्या सहकार्याने गणेशोत्सवाचे दहा दिवस खास अंधांसाठी स्वयंपाक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या दहा दिवसांत स्वयंपाकापासून व्यवसायापर्यंत सर्व काही शिकवण्याचा प्रयत्न परिवाराचे कार्यकर्ते करत आहेत.
मदन पुरंदरे यांनी या उपक्रमाची सुरुवात कोथरूड येथील अंध मुलींच्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका अर्चना तापीकर आणि हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर यांच्या सहकार्याने साधारण १५ वर्षांपूर्वी केली. अंधांना स्वयंपाकाच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे हा या मागचा मुख्य उद्देश होता.
गेल्या पंधरा वर्षांत अनेक जण या ठिकाणी येऊन प्रशिक्षण घेऊन गेले आहेत. जी मुले शिकून तयार झाली आहेत ती नवीन आलेल्यांना मार्गदर्शन करतात. रीटा दिवटे शाळेत असल्यापासून म्हणजे गेली बारा वर्षे या उपक्रमामध्ये सहभागी होते आहे. ‘मी सुरुवातीला फक्त कणीस भाजू शकत होते. पण आता मला संपूर्ण स्वयंपाक करता येतो,’ अशा शब्दात तिने आपला अनुभव सांगितला. ‘लोकांचाही स्टॉलला प्रतिसाद चांगला असतो. आमच्याकडे बघून अंधही काम करू शकतात यावर लोकांचा विश्वास बसतो,’ असेही तिने सांगितले.
‘अंधांनाही स्वयंपाक करता येतो हे समाजाला कळणे आवश्यक आहे. या स्टॉलच्या माध्यमातून हा हेतू साध्य होतो,’ असे स्वत: अंध असलेल्या आणि स्टॉलचा सगळा हिशोब ठेवणाऱ्या रीना पाटील यांनी सांगितले. ‘आम्हाला एक वेळचे जेवण न देता रोजगार कमवायला जागा द्या. पुण्यात अनेक प्रस्थापित मंडळे आहेत. दहा मंडळांनी जरी आम्हाला जागा दिली तरी आम्ही आमची केंद्रे सुरू करू शकतो, त्यामुळे अनेक मुलांना फायदा होईल,’ असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
संतोष डिंबळे हे सुरुवातीपासून उपक्रमाशी जोडले गेलेले एक कार्यकर्ते. ‘या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी हा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला मी स्वत: वडे तळायचो पण कालांतराने मुलांकडे हे काम सोपवायचे धाडस दाखवले. आधी आम्हालाही धास्ती वाटली. पण आता मुलांची इतकी प्रगती झाली आहे की मी नुसता बसलेला असतो. सगळी तयारी ही मुलंच करतात,’ असे त्यांनी सांगितले. समाजात अंधांच्या बाबतीत प्रबोधन करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कॅम्पमधील उत्सव संवर्धक संघाने या वर्षी गणपतीची प्रतिष्ठापना अद्वैत परिवारातील राहुल कवडे आणि सोनाली बोर्डे यांच्या हस्ते केली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2013 रोजी प्रकाशित
गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंधांनी शोधला रोजगार!
अद्वैत परिवार (अपंग-अव्यंग समन्वय) यांच्यातर्फे हत्ती गणपती मंडळाच्या सहकार्याने गणेशोत्सवाचे दहा दिवस खास अंधांसाठी स्वयंपाक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
First published on: 14-09-2013 at 02:48 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav helped blind peoples to get employment