How to Clean Pooja Utensils Fast: गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठेत गर्दी वाढलीय, घराघरांत साफसफाई, सजावट, फुलांची तयारी सुरू झालीय. पण, बाप्पाची पूजा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट – पूजेची भांडी. ही भांडी बहुतेक वेळा तांबे किंवा पितळेची असतात. पण, खरी गंमत म्हणजे ती भांडी जितकी पूजेसाठी पवित्र, तितकीच स्वच्छ करताना त्रासदायक. होय… कारण तांब्या-पितळेच्या भांड्यांवर पटकन डाग पडतात. कितीही पितांबरी, साबण, लिंब, चिंच वापरली तरी हात थकतात; पण डाग मात्र तसेच राहतात. म्हणूनच गणेशोत्सव जवळ आला की, घरातील मंडळींची सर्वांत मोठी डोकेदुखी असते – ही भांडी चमकवायची कशी?
चमत्कारिक उपायाचा दावा
येत्या उत्सवात मात्र तुमच्या डोक्याला हा त्रास होणार नाही. कारण- सोशल मीडियावर एक भन्नाट उपाय व्हायरल होतोय. दावा असा की – भांडी अजिबात घासायची नाहीत; फक्त ती पाण्यात ठेवायची आहेत आणि मग घडणारं दृश्य पाहून तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हो, अगदी बरोबर वाचलंत! भांडी घासून हात दुखवून घेण्यापेक्षा ती थेट एका खास पाण्यात बुडवली, तर ती मिनिटाभरात चमचमत स्वच्छ होतात.
मग हे पाणी तयार कसं करायचं?
त्यासाठी गरज आहे फक्त घराघरात सहज मिळणाऱ्या दोन गोष्टींची – मीठ आणि सायट्रिक अॅसिड (लिंबूसत्व). एका भांड्यात एक चमचा मीठ घ्या, त्यात एक चमचा लिंबूसत्व टाका आणि मग त्यात एक ग्लासभर पाणी ओता. हे मिश्रण छान ढवळून तयार झालं की, झालं तुमचं काम संपलं. आता या पाण्यात तांब्या-पितळेची भांडी बुडवा… आणि काय जादू घडते ते पाहा. डोळ्यांदेखत काळपट डाग नाहीसे होतात भांडी पुन्हा एकदा उजळून निघून आरशासारखी चमकू लागतात.
व्हिडीओमुळे वाढली चर्चा
@BtoAKitchen या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट झाला आणि काही क्षणांत तो चर्चेचा विषय ठरला. हजारो लोकांनी तो पाहिला, शेअर केला आणि “हे खरंच इतकं सोपं असेल का” असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. कारण- ज्यांनी वर्षानुवर्षं भांडी घासून स्वत:ची दमछाक करून घेतलीय, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे जणू एखादा जादुई फॉर्म्युलाच.
पण लक्षात ठेवा- या व्हिडीओतील दाव्याची आमच्याकडून पडताळणी केलेली नाही. म्हणजेच हा उपाय प्रत्यक्षात सर्वांनाच सारखाच परिणाम देईलच, असं नाही. तरीही गणेशोत्सवाच्या तयारीत व्यग्र असलेल्या घरांसाठी ही ‘नो-स्क्रब ट्रिक’ ऐकायला नक्कीच भन्नाट वाटते.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=cprYaLKN9W4
तर बाप्पा येण्याआधी तुमचं घर उजळवताना एकदा हा उपाय करून पाहायचा का? की अजूनही जुन्या पद्धतीनंच भांडी घासायची?
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करीत नाही.)