अकोला : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव विदर्भातील काही जुन्या गणेशोत्सव मंडळांनी आणि घराण्यांनी तेवढ्याच श्रद्धेने व भक्तिभावाने जोपासला. या मंडळ व घराण्यांच्या उत्सवाने आता शतके ओलांडली आहेत. मात्र, त्यांच्याकडील गणेशाची मूर्ती, त्यामागच्या कलाकारांचे हात आजही ती परंपरा जतन करून आहेत. अकोल्यातील जुने शहरात जयहिंद चौकातील १३४ हून अधिक वर्षांचा इतिहास असलेला मानाचा श्री बाराभाई गणपती विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या गणपतीची प्राचीन परंपरा नाथ कुटुंबीय व अकोलेकरांनी भक्तिभावाने जपली.

पेशवेकालीन बाराभाईशी निकट संबंध

श्री बाराभाई गणपती अकोला शहरातील गणेशोत्सवाचे एक आगळे-वेगळे आकर्षण. वऱ्हाडातील पारंपरिक गणपती म्हणून श्री बाराभाई गणपतीचा नावलौकिक आहे. श्री बाराभाई गणपतीची स्थापना नेमकी केव्हापासून झाली, याची कोणतीही नोंद नाही. या गणपतीचा पेशवेकालीन बाराभाईच्या कारस्थानाशी निकट संबंध असावा म्हणूनच याला बाराभाई हे नाव प्राप्त झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. प्राचीनकाळी श्री बाराभाई गणपतीची रुढी-परंपरेने स्थापना केल्या जात होती. मात्र, कालांतराने गणेशोत्सवातील सार्वजनिक उत्साह कमी झाला व ही परंपरा संपुष्टात येऊ नये म्हणून संस्थापक अध्यक्ष कै.भगवाननाथ इंगळे यांनी आपल्या घरी श्री बाराभाई गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून श्री बाराभाई गणपती संपूर्णत: नाथ कुटुंबाचा आहे. श्री बाराभाई गणपतीची परंपरा नाथ कुटुंबियांनी गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली. या गणपतीला मानाचे स्थान प्राप्त होऊन आज १३४ वर्ष लोटली आहेत.

हे ही वाचा…वर्धा : ‘ बोला, दूध हवे की दारू ‘ शक्कल लढविणाऱ्यास अद्दल

विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान

लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर इंग्रजकालीन परिस्थतीतही अकोल्यातून कै.भगवाननाथ इंगळे यांनी श्री बाराभाई गणपतीसह शहरातील सात-आठ मंडळांची मिरवणूक काढली होती. तेव्हापासून अकोल्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत पहिल्या स्थानावर श्री बाराभाई गणपती पालखीत असतो. अकोल्यातील ही प्रथा १८९० च्या सुमारास सुरू झाली. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक दिंड्या असतात. श्री बाराभाई गणपतीची पालखी वाहणारे भोईराज सुद्धा पिढ्यांपिढ्या आपली सेवा गणेश चरणी अर्पण करीत आहेत. अनेक वर्षांपासून असलेल्या या गणपतीचे अकोलेकरांच्या मनात श्रद्धेचे भाव आहेत. श्री बाराभाई गणपतीला अनेक जण नवस बोलतात, साकडे घालतात. भक्तांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला श्री बाराभाई गणपतीने कधीही तडा जाऊ दिला नाही, असे मोठ्या अभिमानाने नाथ कुटुंबीय सांगतात. अकोल्यातील श्री बाराभाई गणपती एकात्मतेचे प्रतीक आहे.

हे ही वाचा…सोलापुरात संशयास्पद ९६ बांधकाम परवान्यांची होणार फेरपडताळणी, बेकायदा बांधकामांच्या चौकशीची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शंभरहून अधिक वर्षांपासून एकच मूर्ती

श्री बाराभाई गणपतीची मूर्ती गेल्या शंभर वर्षाहून अधिक वर्षांपासून एकच आहे. या अगोदर जुन्या पिढीतील मूर्तीकार ओंकारराव मोरे ठाकूर हे श्री बाराभाई गणपतीची मूर्ती तयार करीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर वारंवार प्रयत्न करुनही श्री बाराभाई गणपतीची मूर्ती तयार करण्यात यश आले नाही. त्यामुळे ही मानाची मूर्ती विसर्जीत करण्यात येत नाही. पुजेच्या मूर्तीचे मात्र विसर्जन करण्यात येते.