श्री गणरायाच्या स्वागतासाठी शहरात गेला महिनाभर सुरू असलेल्या तयारीला सोमवारी मूर्त स्वरूप आले आणि पुण्यनगरीत वाजत-गाजत, पारंपरिक थाटात व मोठय़ा भक्तिभावाने गणरायाचे आगमन झाले. विघ्नहर्ता आणि सकलांचे कल्याण करणाऱ्या श्री गणरायाच्या आगमनामुळे पुण्यनगरीत आता चहूकडे चैतन्य संचारले आहे आणि अशा आनंदमयी वातावरणात यंदाच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे.
घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरूपात वैशिष्टय़ूपर्ण उत्सव साजऱ्या करणाऱ्या पुण्याला गणेशोत्सवाचे वेध महिनाभर आधीच लागले होते आणि गेला आठवडाभर तर शहरात सर्वत्र गणेशोत्सवाचेच वातावरण पाहायला मिळत होते. खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या होत्या आणि ठिकठिकाणी सार्वजनिक उत्सवाचीही तयारी जोरात सुरू होती. घरगुती गणरायाच्या आगमनाचा आणि प्रतिष्ठापनेचा सोहळा श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी; सोमवारी पहाटेपासूनच प्रारंभ झाला आणि सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका सकाळी दहानंतर सुरू झाल्या.
मोरया.. मोरया..
अनेक मंडळांनी फुलांनी सजवलेल्या रथांमधून श्रींच्या मिरवणुकीचे आयोजन केले होते आणि त्यात ढोल-ताशा पथकांचा सहभागही मोठा होता. फटाक्यांची आतषबाजी, रांगोळ्यांच्या पायघडय़ा, भगवे फेटे बांधलेले पथकांमधील उत्साही तरुण-तरुणी, मर्दानी प्रात्यक्षिके आणि मोरया, मोरया असा गजर.. अशा थाटात या मिरवणुका निघाल्या होत्या.
चांदीच्या पालखीतून ग्रामदैवत
पुण्यनगरीचे ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सांगली येथील वेंटकरमण दीक्षित शास्त्रीमहाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी झाली. त्यापूर्वी हमालवाडा येथील मूर्तिकार नीलेश पार्सेकर यांच्याकडून गणेशमूर्ती घेतल्यानंतर मंडळाच्या मिरवणुकीची सुरुवात झाली. सनई-चौघडय़ाचा गाडा अग्रभागी होता. प्रभात बँडपथक, शिवदर्शन आणि समर्थ ही ढोल-ताशा पथके सहभागी झाली होती. कार्यकर्ते भोई झालेल्या पारंपरिक चांदीच्या पालखीमध्ये श्रींची मूर्ती विराजमान झाली होती. अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर या मार्गाने शिवाजी रस्त्याने मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली.
तांबडी जोगेश्वरी: पारंपरिक मिरवणूक
शनिवार पेठेतील मूर्तिकार द. म. गुळुंजकर यांच्याकडून श्रींची मूर्ती घेतल्यानंतर पारंपरिक चांदीच्या पालखीतून श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक सुरू झाली. नगारावादनाचा गाडा, न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा ढोल-ताशापथक यांचा सहभाग असलेली ही मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकातून उत्सव मंडपामध्ये आली. दुपारी बारा वाजता गोखले कन्स्ट्रक्शन्सचे विशाल गोखले यांनी सपत्नीक श्रींची प्रतिष्ठापना केली.
गुरुजी तालीम मंडळाचा फुलांचा रथ
उद्योजक ललित सिंघवी आणि आरती सिंघवी या दांपत्याच्या हस्ते श्री गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणरायाची प्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी झाली. त्यापूर्वी फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणुकीचा प्रारंभ झाला. नादब्रह्म आणि शिवगर्जना या ढोल-ताशा पथकातील कलाकारांचा आविष्कार गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर, बेलबाग चौक मार्गे मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली.
‘तुळशीबाग’च्या अग्रभागी गजलक्ष्मी पथक
मंडईतील टिळक पुतळ्यापासून श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट या मानाच्या चौथ्या गणरायाची मिरवणूक सुरू झाली. गजलक्ष्मी ढोल-ताशापथक मिरवणुकीच्या अग्रभागी होते. शनिपार, नगरकर तालीम चौक या मार्गाने लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौकातून ही मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर, मंडळाच्या नव्या मंदिराचे उद्घाटन ज्येष्ठ शिल्पकार डी. एस. खटावकर यांच्या हस्ते झाले.
केसरीवाडा गणपती पालखीतून
फुलांनी सजविलेल्या पालखीतून केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक सकाळी नऊ वाजता सुरू झाली. श्रीराम पथकाने सादर केलेली वादनकला गणेशभक्तांचे आकर्षण केंद्र ठरली. रमणबाग चौकातून ही मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली. केसरीचे विश्वस्त रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सारथ्यासाठी महापौर, खासदार
हिंदूुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असा लौकिक असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या श्रींची प्रतिष्ठापना महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते झाली. त्यापूर्वी ट्रस्टच्या पारंपरिक रथातून निघालेल्या मिरवणुकीचे सारथ्य महापौरांसह खासदार वंदना चव्हाण यांनी केले. ब्रह्मचैतन्य, शाहू गर्जना आणि श्रीराम पथक ही तीन ढोल-ताशा पथके मिरवणुकीच्या अग्रभागी होती. बुधवार पेठेतील हुतात्मा चौक, जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, दक्षिणमुखी मारुती मंदिर या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली.
शारदा-गजाननाची रथातून मिरवणूक
अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजानानाची प्रतिष्ठापना कर्करोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र कसबेकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यापूर्वी मंडईतील तात्या थोरात समाज मंदिरापासून मिरवणुकीची सुरुवात झाली. ॐ ढोल-ताशा पथक आणि न्यू गंधर्व ब्रास बँड मिरवणुकीच्या अग्रभागी होते. टिळक पुतळा, रामेश्वर चौक, गोटीराम भय्या चौक या मार्गाने ही मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली.
दगडूशेठसाठी फुलांचा रथ
गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टची मिरवणूक सकाळी साडेसात वाजता गणपती मंदिरापासून सुरू झाली. प्रभात आणि दरबार ही बँडपथके, संगमवाडी आणि किरकटवाडी येथील ढोल-ताशा पथके मिरवणुकीच्या अग्रभागी होती. आयुर्वेदतज्ज्ञ बालाजी तांबे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. ट्रस्टने यंदा म्हैसूर येथील चामुंडेश्वरी मंदिराची प्रतिकृती साकारली असून त्याच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन सायंकाळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले.
पुणे फेस्टिव्हलतर्फेही प्रतिष्ठापना
पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आली. पी. ए. इनामदार, आबेदा इनामदार, अभय छाजेड, कृष्णकांत कुदळे, स्मिता तांबे, फ. मुं. शिंदे, डॉ. माधवी वैद्य, सुरेश देशमुख यांच्यासह कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. यंदा सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या कसबा पेठ येथील भोई आळीतील वीर मित्र मंडळाच्या मिरवणुकीमध्ये हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडले. छोटा शेखसल्ला दर्गा येथे मुस्लीम बांधवांनी श्रीफळ देऊन स्वागत केले.