स्वयंपाकघरातल्या गॅस-शेगडीची ज्योत ही निळ्या रंगाची व वरच्या टोकाला किंचित पिवळ्या रंगाची असायला हवी. तुमच्या घरच्या गॅस-शेगडीची ज्योत जर निळसर रंगाऐवजी पिवळ्या-केशरी रंगाची असेल तर ते स्वयंपाकघरात काम करणा-या, किचनमध्ये वावरणार्‍या व्यक्तिंच्या आरोग्यासाठी धोक्याचे होऊ शकते. कारण जेव्हा गॅसची ज्योत पिवळसर-केशरी रंगाची असते, तेव्हा त्यामधून मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साइड हा विषारी वायू बाहेर पडत असतो जो काही काळ स्वयंपाकघरातच राहून तिथे वावरणा-या व्यक्तिंच्या श्वसनाद्वारे त्यांच्या शरीरात शिरुन भयंकर विषाक्त परिणाम दाखवू शकतो..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्बनमोनॉक्साईड श्वसनावाटे फुफ्फुसांमध्ये व तिथून रक्तात शिरुन ऑक्सिजनहून २१० पट वेगाने हेमोग्लोबिनशी संयुक्त होऊन हेमोग्लोबिनची शरीर-कोषांना ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता घटवतो, तर दुसरीकडे मायोग्लोबिन बरोबर संयुक्त होऊन प्रत्यक्षात शरीर कोषांची श्वसनक्षमता खराब करतो. या कारणांमुळे शरीर-कोषांना ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळतो.ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीराच्या पेशींना जोमाने कार्य करता येत नाही,शरीर-पेशी क्षीण होत जातात.शरीरात शिरलेला कार्बनमोनॉक्साईड साधारण ४ ते ६ तास तरी शरीरामध्येच राहातो.

कार्बनमोनाॅक्साईड अतिप्रमाणात शरीरात गेल्यास प्रत्यक्षात जी लक्षणे दिसतात,ती पुढीलप्रमाणे-श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी,मनाचे अस्वास्थ्य,निर्णयक्षमतेमध्ये बिघाड, मळमळ, उलटी,चक्कर व बेशुद्धी.गंभीर विषाक्त परिणामांमध्ये फ़ुफ़्फ़ुसांना सूज, मेंदुला सूज,श्वसन कार्य मंदावणे, ह्र्दयाच्या कार्यात बिघाड, हार्ट अटॅक.अशावेळी दूषित जागेपासून व्यक्तीला दूर नेणे व त्वरित ऑक्सिजनची व्यवस्था करणे आवश्यक असते.

गॅस्-शेगडीच्या पिवळ्या ज्योतिमुळे वर सांगितलेली गंभीर लक्षणे दिसणार नाहीत, मात्र सातत्याने गॅसच्या ज्योतीमधून बाहेर पडणार्‍या कार्बन मोनॉक्साईडचा दीर्घकाळ आलेला संपर्कही निश्चीतपणे घातक होऊ शकतो. ज्यामध्ये लक्षात न येणारा आजार म्हणजे दिवसेंदिवस खालावत जाणारी रोग-प्रतिकारशक्ती व अशक्तपणा. तेव्हा आपल्या घरातल्या गॅस-शेगडीचे नीट निरिक्षण करा व जर गॅसची ज्योत निळ्या रंगाची न येता पिवळसर-केशरी वा लालसर रंगाची येत असेल तर लगेच दुरुस्ती करुन घ्या. व्हॉट्स अपवर आरोग्याचे सल्ले इथून तिथे फिरवून आपले आरोग्य सुरळीत होणार नाही ,हे ध्यानात घ्या; प्रत्यक्ष कृती करा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips in marathi health hazards due to cooking gas
First published on: 18-03-2017 at 11:28 IST