सोयाबीनमध्ये आढळून येणारे एक संयुग एचआयव्हीच्या प्राणघातक संसर्गाला अटकाव करते, असे दिसून आले आहे. अमेरिकेतील जॉर्ज मॅसन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी सोयाबीन व इतर वनस्पतींपासून ‘जेनीस्टेन’ हे नवे संयुग वेगळे काढले असून त्याच्या मदतीने एड्स संसर्गाला अटकाव केला जातो. जेनीस्टेन हे थायरोसिन किनेज प्रतिबंधक असून त्यात पेशींच्या पृष्ठभागावरील संवेदकांचा पेशीतील आतील भागाशी असलेला संदेशवहन संपर्क तुटतो. पेशीच्या पृष्ठभागावर जे संवेदक असतात ते पेशीला बाहेरच्या परिस्थितीबाबत सांगतात व इतर पेशींशीही त्यांचा संपर्क असतो. एचआयव्ही संसर्गात असा संवेदकांचा वापर विषाणू करीत असतो त्यामुळे पेशींमध्ये संदेश पाठवले जातात त्यामुळे पेशींची रचना बदलते. परिणामी हा विषाणू पेशीत शिरून उच्छाद मांडतो व त्याचा प्रसार शरीरात होत जातो. जेनीस्टेन या संयुगामुळे विषाणूकडून पेशीच्या आतील भागात पाठवले जाणारे संदेश रोखले जातात, या तत्त्वाचा वापर करून नवीन औषधे तयार करता येणे शक्य आहे. विषाणूवर थेट हल्ला करण्याऐवजी त्याच्या पेशींशी होणाऱ्या संदेशवहनावर हल्ला करून त्याचा प्रादुर्भाव प्रसार रोखणे शक्य आहे, असे जॉर्ज मॅसन विद्यापीठाचे युनटाव वू यांनी सांगितले. या नव्या पद्धतीमुळे औषधाला विषाणू प्रतिरोध करू शकणार नाही व तो खूपच अलीकडच्या अवस्थेत निष्प्रभ करता येईल. एचआयव्ही संसर्गावर पूरक उपचार म्हणून जेनीस्टीनचा वापर करता येईल. याचा अर्थ, लोकांनी सोयाबीनचे पदार्थ सेवन केले म्हणजे त्यांना एड्स होणार नाही असा नाही. सोयाबीनपासून वेगळे काढलेले जेनीस्टीन हे संयुग औषध रूपात वापरले तरच असा परिणाम होणार आहे. जेनीस्टीन हे वनस्पतीपासून काढलेले असल्याने त्याचे हानिकारक विषारी परिणाम होणार नाहीत.
फळे सेवन चांगले, ज्यूस मात्र धोकादायक
फळे विशेषत द्राक्षे, ब्लूबेरी व सफरचंदे सेवन केल्याने टाइप दोन मधुमेहाची शक्यता कमी होते असे नवीन अभ्यासात निष्पन्न झाले आहे. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार फळांच्या ज्यूसमुळे टाइप २ चा मधुमेह वाढतो त्यामुळे ही फळे चिरून किंवा आहे तशी धुवून सेवन करणे आवश्यक आहे.ब्रिगहॅम येथील चॅनिंग डिव्हीजन ऑफ नेटवर्क मेडिसीन, वुमेन्स हॉस्पिटल व एसएसपीएच येथील सहायक प्राध्यापक की सन यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या मते मधुमेहाला अटकाव करण्यासाठी फळांचा वापर यावर जी संशोधने  झाली आहेत ती मिश्र स्वरूपाचे निष्कर्ष काढणारी आहेत. काही विशिष्ट फळे सेवन केल्याने टाइप दोन मधुमेहाला अटकाव होते यावर आमच्या संशोधनातून शिक्कामोर्तब झाले आहे. १९८४ ते २००८ दरम्यान १८७३८२ व्यक्तींची माहिती तपासून हे निष्कर्ष काढले आहेत यातील सहभागी व्यक्तींपैकी मधुमेह, ह्दयरोग, कर्करोग असलेल्या १२१९८ व्यक्तींना यातून वगळ्यात आले होते. अनेक फळांचा होणारा परिणाम तपासण्यात आला त्यात संत्री, सफरचंदे, ब्लूबेरी, प्लम, पीच, केळी अशा अनेक फळांचा व त्यांच्या ज्युसेसचा परिणाम बघितला गेला. त्यात फळांचा  रस घेणाऱ्या व्यक्तींना टाइप दोन मधुमेहाचा धोका २१ टक्के जास्त असल्याचे दिसून आले आठवडय़ातून तीनदा फळे फोडींच्या स्वरूपात किंवा आख्ख्या स्वरूपात सेवन करणाऱ्यात मात्र मधुमेहाचा धोका ७ टक्क्य़ांनी कमी झालेला दिसला. ब्लूबेरी, द्राक्षे व सफरचंदे आठवडय़ातून दोनदा सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाइप दोन मधुमेहाचा धोका २३ टक्क्य़ांनी कमी होतो. या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे किती वेगात अन्नातील कबरेदकांचे रूपांतर रक्तातील साखरेत होते त्याचे प्रमाण व मधुमेहाची जोखीम कमी येणे यांचा संबंध मात्र अजून प्रस्थापित करता आलेला नाही. फळांचा ज्यूस घेतला तर मात्र ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो त्यामुळे ज्यूसमुळे मधुमेहाचा धोका वाढतो असे मुख्य संशोधक इसाव मुराकी यांनी म्हटले आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
मेंदूतील विशिष्ट भागाशी फेसबुक वापराच्या सवयीचा संबंध
फेसबुक हा आता लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे. काहींना फेसबुकवर गेल्याशिवाय चैन पडत नाही त्यामुळे एकप्रकारे हे व्यसनच आहे, पण ती सवय माणसाला जडण्याचे कारण मेंदूच्या विशिष्ट भागातील क्रियांमध्ये असते, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सच्या वापराबाबत मानवाचे जे वर्तन आहे त्याचा अभ्यास प्रथमच या संशोधनात करण्यात आला आहे. एखादी व्यक्ती फेसबुक किती प्रमाणात वापरेल याचा अंदाज मेंदूतील न्युक्लियस अ‍ॅक्युमबेन्स या भागातील क्रियांवरून बांधता येतो, असे बर्लिन येथील एका विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. सोशल मीडियाचा वापर व मेंदूतील क्रियाशीलता यांच्या या अभ्यासात न्युक्लियस अ‍ॅक्युमबेन्स या मेंदूच्या मध्यभागी खोलवर असलेल्या भागात घडणाऱ्या क्रियांमुळे माणसाला फेसबुकचे व्यसन किंवा सवय लागते असे दिसून आले आहे. प्रतिष्ठेसाठी अन्न, पैसा, सेक्स, इतर आनुषंगिक फायदे मिळवण्याच्या मानवी कृतींवर या भागात प्रक्रिया घडून येते असे अगोदरच्या संशोधनात म्हटले होते. मानवी मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीमशी व्यसनांचा संबंध जोडला जातो. या अभ्यासातील प्रमुख लेखक दर मेशी यांनी सांगितले, की माणसाला नेहमी त्याच्या प्रतिष्ठेची काळजी असते व आजच्या जगात फेसबुकसारख्या सोशल मीडिया साइट्सचा वापर हे प्रतिष्ठा टिकवण्याचे एक साधन मानले जाते. या संशोधनात फेसबुकची निवड करण्याचे कारण म्हणजे त्याचे महिन्याला १.२ अब्ज कृतिशील वापरकर्ते आहेत. वापरकर्ते, त्यांचे मित्र व इतर लोक यांच्यात मोठय़ा प्रमाणात संदेशांचे आदानप्रदान होत असते व त्याचा परिणाम त्यांच्या प्रतिष्ठेशी निगडित असतो. वापरकर्त्यांच्या ‘लायकिंग’ पोस्टवरून त्याची प्रतिष्ठा ठरते. या संशोधनात एकूण ३१ जणांना सहभागी केले होते व त्यांचे फेसबुक वापरण्याचे प्रमाण, त्यांचे असलेले फेसबुक मित्रांचे प्रमाण व सर्वसाधारण विचार यांची यात नोंद घेण्यात आली. नंतर त्यांच्या व्हिडिओ मुलाखती घेण्यात आल्या व मेंदूतील क्रियांची नोंद फक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजे (एफएमआरआय) तंत्राने करण्यात आली. विशेष म्हणजे ज्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत होता, त्यांच्या मेंदूतील न्युक्लियस अ‍ॅक्युमबेन्स या भागात तीव्र क्रियाशीलता होती. यातील फरकामुळेच काहींना फेसबुकचे व्यसन जास्त तर काहींना तुलनेने कमी होते. आमच्या अभ्यासात असे निष्पन्न झाले, की प्रतिष्ठेच्या सामाजिक लाभाच्या क्रियेवर न्युक्लियस अ‍ॅक्युमबेन्स या भागात जे संस्करण होते त्यावरून व्यक्तींमधील फेसबुक वापराच्या तीव्रतेचा अंदाज घेता येतो, असे मेशी यांनी सांगितले.