एखाद्या विषयाचा अभ्यास केल्याने मेंदूमधल्या जाळ्यांची विशिष्ठ प्रकाराने रचना होते आणि सरावामुळे ते जाळे बळकट होत जाते. या प्रक्रियेला ‘शिकणे’ असे म्हटले जाते. बहुतेक जण सामान्य शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण कौशल्य शिकतात आणि अभ्यास करतात. पण साधारण दहा टक्के मुलांमध्ये या कौशल्यात कमतरता असते. या मुलांच्या मेंदूमध्ये शिक्षण कौशल्य दर्शवणाऱ्या पेशींची तातडीने किंवा योग्य त्या पद्धतीने एकत्र येऊन जाळे तयार करण्याची क्षमता कमी असते, असे म्हटले जाते. त्यामुळे अभ्यासातील विषय शिकण्यास ही मुले असमर्थ ठरतात.

या अडचणीची लक्षणे काय?
मुलाचे आरोग्य, वाढ- विकास आणि पालक यांच्यात कोणतीही समस्या नसते. काही मुले बोलायला काहीशी उशिरा सुरुवात करतात, पण ते काळजी करण्यासारखे नसते. मुलाच्या वागण्यावरून, व्यवहारज्ञानावरून तो हुशार असावा असे समजून येते. काही मुलांना फक्त भाषेची अडचण असते तर काहींना गणिताची. क्वचित दोन्ही विषयांची अडचण असू शकते. भाषेची अडचण असल्यावर मुलाच्या वाचनाचा वेग कमी होतो, उच्चार चुकतात आणि पानामधली वाचनाची जागा परत- परत हरवते. वयाच्या मानाने अगदी साध्या भाषेत, छोटी वाक्य लिहिली जातात. मजकूर वाचल्यानंतर त्यांना तो नीट समजत नाही. वाचलेले विसरले जाते. त्यातील मूळ मुद्दा त्यांच्या लक्षात येत नाही. गणितातील अडचण असेल तर, गणितातील संकल्पना समजत नाहीत. बेरीज-वजाबाकी-गुणाकार- भागाकार अशा गणिती क्रियांमध्ये अदलाबदल होते. भाषेचीही अडचण असेल तर शाब्दिक गणिती प्रश्न समजायला आणखीच जड जाते. जगात व्यवहारासाठी लागणारे वाक्य- विचार ते सहजपणे, साध्या भाषेत बोलू शकतात. व्यवहारात लागणारी सर्व बेरीज- वजाबाकी तोंडी करणे त्यांना बऱ्यापैकी जमते. इतरांनी वाचलेला मजकूर किंवा सांगितलेली गोष्टही समजते. त्यांना वाचून दाखवले किंवा गोष्ट सांगितली तर ते समजू शकतात. तोंडी सांगणे जमत असले तरी लिहायला-वाचायला सांगितले की मात्र गाडी अडते. हे लक्षात आल्याने पालक प्रत्येक गोष्ट समजून सांगायला तासंनतास घालवतात. अभ्यासाकडे मुद्दाम दुर्लक्ष करतो किंवा आळशी असल्याचा निष्कर्ष पालक आणि शिक्षक काढतात.

मूल कधीच शिकणार नाही का?
निसर्गाने शिकण्यासाठी मानवाला अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत. याचा कल्पकतेने उपयोग केल्याने विषय शिकायला मदत होते. काही मुले ऐकून शिकतात, काहींना सराव जास्त लागतो, काही माहितीपट पाहून शिकतात. शिक्षण कौशल्य कसे वाढवायचे याचे संशोधन करून काही विशिष्ठ पद्धती तयार केल्या आहेत. मेंदूमधील मूळ पेशींचे वर्तन बदलता आले नाही तरी महत्त्वाचे विषय समजून घेण्यासाठी वेगळ्या पद्धतीने मेंदूमध्ये जाळी तयार करणे, हे या पद्धतीचे मूळ तत्त्व आहे.  या पद्धतीला रेमेडियल म्हणतात. ही पद्धत वापरून मुलाला आवश्यक विषय शिकवता येतात. त्यामुळे पालकांनी निराश होऊ नये. प्रत्येक मुलाला शिकवणे गरजेचे आहेच.  

अंमलबजावणी कशी करावी?
सर्वप्रथम तपासणी करून समस्येची खात्री करून घ्या. सध्या ही तपासणी मुंबई पालिकेच्या रुग्णालयात होते. त्यासाठी शाळेकडून तपासनीसांच्या विनंतीचे पत्र, डोळे-कान निरोगी असल्याचे प्रमाणपत्र न्यावे लागते. तपासणी केल्यावर प्रमाणपत्र मिळते. मुलाला शिकण्यात अडचणी येत असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यावर परीक्षेपुरत्या काही सवलती शाळा व बोर्डाकडून मिळतात.
काही शाळा अभ्यासाव्यतिरिक्त कुठल्याही बाबीकडे लक्ष पुरवत नाहीत आणि अभ्यासाचा मोठा डोंगर मुलांवर लादतात. पालकांशी संवाद साधत नाहीत. शाळेच्या वेळा त्रासदायी आणि दिवस व्यापणाऱ्या असतात. घरापासून शाळांचे अंतर जास्त असते. इतर पर्याय असल्यास अशी शाळा अजिबात निवडू नये. मुख्य म्हणजे मुलाचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास टिकून राहील हे शाळेने आणि पालकाने निश्चित करावे.
मोठय़ा शहरात रेमेडीयल शिक्षक मिळू शकतात. या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. या मुलांना नेमके कसे शिकवायचे याबाबत त्यात मार्गदर्शन केलेले आहे. महाराष्ट्र डिस्लेक्शिया असोसिएशनकडून पालकांसाठी प्रशिक्षण देण्यात येते. स्काइप या संकेतस्थळावरून शिकवणी घेऊ शकता. सर्व शिक्षा अभियानमधून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. शाळेतले प्रशिक्षित शिक्षक कोण आहेत याची माहिती काढून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. आपल्या मुलाच्या अभ्यासाकडे तो अभ्यासात स्वावलंबी होईपर्यंत सतत लक्ष घालावे. मुलाचा कल आणि क्षमता समजून त्याचे करिअर निवडावे.
अभ्यास आणि परीक्षा यातील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अभ्यास कळण्यासाठी आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी- वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात- सर्वानाच. त्यामुळे आपल्या मुलाचे काही वेगळे नाही- हे दोन्ही प्रयत्न केल्यानेच मुलाला भविष्यकाळासाठी पाया मजबूत करता येतो.
डॉ. वाणी कुल्हळी -vanibk@rediffmail.com