प्रशांत आणि ललिता दोघेही समजुतीने घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत आले होते आणि त्याचे कारण होते दोघांचाही तापण स्वभाव. दोघांनाही राग आवरणं कठीण जातं आणि मग भांडणं विकोपाला जातात, हे दोघांनाही कळत होतं की आपल्या अशा स्वभावामुळे आपलं एकत्र राहणं अशक्य होत चाललंय.
श्रीकांत आणि आशा यांच्याच्यामध्ये मात्र वैवाहिक नात्यातील वैमनस्य श्रीकांतच्या तापट स्वभावामुळे येत होतं. आशा शांत स्वभावाची व समजुतीने वागणारी होती. श्रीकांत त्याच्या भावडांमधील सगळ्यात धाकटा. भरपूर लाडात वाढलेला, आपलं म्हणणं सगळे ऐकतात आणि नाहीच ऐकलं तर आपण रडून, आदळाआपट करून आई-बाबांकडून मनासारखं करून घेऊ शकतो हे श्रीकांतने लहानपणीच जोखलं होतं. पुढे पुढे हट्टी स्वभाव व हट्ट पूरवून घेण्यासाठी आकांडतांडव करण्याच्या सवयीतून त्याचा तापट स्वभाव बनत गेला होता. आलेला राग आक्रस्ताळेपणे व्यक्त केला की समोरची व्यक्ती लगेचच हार मानते व आपण मनासारखं करून घेऊ शकतो ही वागण्याची पद्धत त्याने अंगिकारली होती. लग्नानंतर पत्नी ही हक्काची व्यक्ती. त्यामुळे आशाकडूनही मनासारख्या गोष्टी करवून घ्यायला तो तिच्याशीही असाच वागत होता. आशा मात्र श्रीकांतच्या या स्वभावाला समजून घेऊन वागण्याचा प्रयत्न करत होती. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्येही श्रीकांतच्या रागाला सामोरं जावं लागू नये म्हणून नमतं घेऊन वागण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तिच्याही शांत राहण्याला मर्यादा होत्या. अती झुकल्याने व श्रीकांतच्या रागाच्या भरात वारंवार केलेल्या शारीरिक व मानसिक िहसेने तिचाही धीर खचत चालला होता. सतत तणावाखाली जगण्याचा आता तिला कंटाळा येऊ लागला होता.
तापट स्वभावाचा एक किंवा दोघेही असल्यास दाम्पत्याचे वैवाहिक जीवन कसं विस्कळीत होतं हे यातून कळत होतं. राग येणं ही खूप स्वाभाविक भावना असली तरी ती भावना कुठे व कशी व्यक्त करावी हे शिकणं गरजेचं असतं. म्हणजेच रागावार ताबा मिळवणं हे महत्त्वाचं ठरतं. असं न केल्यास त्याचा वाईट परिणाम स्वतच्या आरोग्यावर व नातेसंबंधांवरही होतो. रागावर ताबा नसल्याने वागणं विध्वंसक व हानीकारक होत जातं. त्यातून दुसरयाला व स्वतलाही दुखावतो हे समजून घ्यायला हवे.
राग आलेल्या अवस्थेत त्याच क्षणी अतिरेक टाळून त्या परिस्थितीतूव बाहेर पडणं, दीर्घ श्वास घेणं, मनातल्या मनात अंक मोजणं, एकटं राहून राग ज्या गोष्टींबद्दल आला, त्या बाबतीतल्या स्वतच्या भावना, विचार लिहून व्यक्त करणं, काही सुखद आठवणींना उजाळा देणं, एखाद्या शारीरिक श्रमाच्या कामात स्वतला गुंतवणं- जेणे करून रागामुळे शरीरात तयार होणारी उर्जा रचनात्मक कामांकडे वळवली जाईल. आपले विचार, दृष्टीकोन पुन्हा एकदा पडताळून पाहून त्यात योग्य ते बदल करणं, अशा बऱ्याच गोष्टींचा अवलंब केल्यास रागावर ताबा मिळवू शकतो. प्रयत्न करूनही स्वत: रागावर ताबा मिळवण्यास असमर्थ ठरलो, तर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं असतं.
प्रशांत, ललिता, श्रीकांत या साऱ्यांनाच या गोष्टी समजून स्वत:ला बदलणं नक्कीच शक्य आहे व त्यामुळे त्यांचे नातेसंबंध सुधारणंही शक्य आहे. रागाने आपल्या आयुष्यावर ताबा मिळवण्याआधीच आपण रागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणेच योग्य.
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2014 रोजी प्रकाशित
रागाच्या भरात!
प्रशांत आणि ललिता दोघेही समजुतीने घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत आले होते आणि त्याचे कारण होते दोघांचाही तापण स्वभाव.

First published on: 04-03-2014 at 06:35 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Element of anger