जेवणात पालेभाजी आहे म्हटल्यावर अनेक जण ‘घासफूस’ नको, म्हणून नाक मुरडतात! पण हिरव्या पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असे अनेक गुण आहेत. आपल्या नेहमीच्या वापरातील काही हिरव्या पालेभाज्यांविषयी जाणून घेऊ या-
हिरव्या भाज्यांमध्ये तंतुमय पदार्थाचे (फायबर) प्रमाण चांगले असते, तसेच ‘ए’, ‘सी’ आणि ‘के’ ही जीवनसत्त्वे सर्वसाधारणपणे सर्व पालेभाज्यांमध्ये आढळतात. पालेभाज्यांमध्ये लोहदेखील चांगल्या प्रमाणात आहे. डाळ घातलेली, ताक घातलेली पातळ भाजी, पीठ पेरून भाजी, थालिपिठे, ठेपले, पराठे अशा पारंपरिक पाककृतींबरोबर, सॅलड, बर्गर, सूप अशा पदार्थामध्येही वापरता येतात. पालेभाज्या करताना काही साध्या गोष्टी पाळणे गरजेचे आहे. पालेभाजीतील खराब झालेली वा सडलेली पाने काढण्याबरोबर पानांवर चिकटलेली माती आणि कीटकनाशके धुऊन जायला हवी. त्यासाठी निवडलेली पालेभाजी हळद आणि मीठ घातलेल्या पाण्यात भिजवून ठेवावी आणि उपसून कोरडी करून शिजवावी. लेटय़ूसची पाने किंवा पालक अशा काही पालेभाज्या सोडल्या तर शक्यतो पालेभाज्या शिजवूनच खाल्लेल्या चांगल्या. शिजवल्याने त्यातील तंतुमय पदार्थ चांगले पचतात. मेथीसारख्या काही पालेभाज्या उष्ण गुणधर्माच्या आहेत. त्यामुळे खायची म्हणून नुसती पालेभाजी एके पालेभाजीच खाऊ नये, तर आहाराचा एक भाग म्हणून त्याकडे पाहावे. पालेभाज्यांच्या अतिरेकामुळे काहींना अ‍ॅलर्जी, त्वचेवर पुरळ येणे आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना रक्त पातळ होण्याची औषधे दिलेली असतात त्यांनी पालेभाज्या कमी खाव्यात.
पालक
पालकातून ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘के’ ही जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम आणि लोह पुष्कळ प्रमाणात मिळते. त्यात ल्युटिन आणि झियाझँथिन हे घटक, शिवाय सोडियम व पोटॅशियमचे प्रमाणही उत्तम आहे. कॅल्शियमचे शरीरात शोषण होण्यासाठी सी व बी ही जीवनसत्त्वेही पालकात असल्यामुळेच तो हाडे, दात व नखांच्या आरोग्यासाठी चांगला समजला जातो. वाढीच्या वयातील मुले, गरोदर स्त्रिया यांच्याबरोबर उतारवयातील स्त्री-पुरुषांनी आठवडय़ात दोनदा पालकाची भाजी जेवणात घेतली तर फायदा होतो. ल्युटिन व झियाझँथिन हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.
चवळई
चवळईच्या पानांमध्ये मूत्रल (डाययुरेटिक) गुणधर्म आहेत. अंगावर सूज येणे, शरीरात पाणी साठून राहणे (वॉटर रीटेन्शन) अशा तक्रारींच्या वेळी डॉक्टर अनेकदा डाययुरेटिक औषधे सुचवतात. सूज कमी होण्याच्या दृष्टीने चवळईची भाजीही चांगला परिणाम साधते. चवळईतही ‘बी’ व ‘सी’ जीवनसत्त्वे, लोह, तांबे असल्यामुळे अ‍ॅनिमियामध्येही चवळई चांगली. चवळईच्या पानांचा मिक्सरमध्ये रस तयार करून त्यात काळे मीठ व जिरेपूड घालून घेतला तरी चालू शकेल. सकाळी व संध्याकाळी चवळईच्या पानांचा पाव कप रस थोडे पाणी घालून घेतला तरी चालतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अळू
अळूमध्येही ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘ई’ आणि ‘के’ ही जीवनसत्त्वे आहेत. ही जीवनसत्त्वे शरीरासाठी अँटिऑक्सिडंट्स म्हणूनही उपयोगी पडतात. अन्नाच्या पचनाच्या वेळी शरीरात तयार होणारे हानीकारक पदार्थ शोषून घेण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स गरजेचे आहेत. अळूमधील झिंकमुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट होण्यास मदत होते, तर ‘ए’ जीवनसत्त्वाचा त्वचा आणि डोळे यांच्यासाठी फायदा होतो.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green leaf vegetables important for good health
First published on: 03-10-2015 at 07:01 IST