दिवाळीत एकमेकांना दिलेल्या भेटींमधून गोड गोड सुकामेवा घरोघरी आला असेल. मागील लेखात आपण बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्ते या ‘नट्स’विषयी जाणून घेतले होते. आता बेदाणे, सुके अंजीर, खजूर, जर्दाळू अशा ‘ड्रायफ्रूट्स’चे महत्त्व पाहू या.
ताजी फळेच विशिष्ट प्रकारे वाळवून ‘ड्रायफ्रूटस्’ बनतात. गोड खायची खूप इच्छा झालेली असताना मिठाई, कँडी, जॅम, जेली या भरपूर साखर असलेल्या पदार्थाशी तुलना करता हा सुकामेवा केव्हाही चांगला. सुक्यामेव्यातून साखरेबरोबरच जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थही मिळत असून दररोज २ ते ३ ड्रायफ्रूट्स खाल्ले तर उत्तमच. ड्रायफ्रूट्स मुळातच गोड असली तरी त्यावर साखर, चॉकलेट अशा आणखी गोड पदार्थाचा थर दिलेलीही अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. अशी अतिरिक्त साखर असलेला सुकामेवा मात्र ‘कँडी’ याच सदरात मोडतो आणि तो निश्चितच बरा नव्हे.
दिवाळीला भेटीदाखल दिल्या जाणाऱ्या सुक्यामेव्यात खजुराचा समावेश नसला तरी तो आरोग्याच्या दृष्टीने बहुगुणी आहे. हृदयासाठी खजूर चांगला. मधुमेहातही नुसता किंवा लिंबूपाणी वा ताकाबरोबर खजूर खाता येतो. पोटातील अल्सरमध्ये फायदेशीर ठरतात, तसेच त्यात कर्करोगविरोधी गुणही आहेत. परंतु प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्यामुळे मधुमेही व्यक्तींनी किंवा इतर आजार असलेल्यांनी आहारात खजूर किंवा इतर सुक्यामेव्याचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
जर्दाळूमधून (अ‍ॅप्रिकॉट) तंतुमय पदार्थ व ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व तसेच लोह मिळते. मनुकांना तर नैसर्गिक कँडीच म्हणतात. मनुकात सोडियमचे प्रमाण कमी असून तंतुमय पदार्थ भरपूर आहेत. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने तसेच रक्ताभिसरण नीट होण्यासाठी मनुके चांगले. पंडुरोग (अ‍ॅनिमिया) असलेल्या व्यक्तींना मनुके आणि खजुरांनी फायदा होऊ शकतो. भिजवून ठेवलेले मनुके आणि खजूर सकाळी खाता येतील. काविळीच्या उपचारांमध्ये तसेच मधुमेहातही सुके अंजीर वापरले जातात. पाचक आणि रेचक म्हणूनही ते चांगले. तेही रात्रभर भिजवून ठेवून सकाळी खातात.
लगेच शक्ती देणारी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही मदत करणारी ही ड्रायफ्रूट्स मिठाई, आइस्क्रीम किंवा खिरींमध्ये घालून खाण्यापेक्षा शक्यतो नुसतीच खाल्लेली चांगली.
ratna.thar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of dryfruits
First published on: 14-11-2015 at 07:03 IST