किडन्या शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. मात्र किडनीच्या आजारांविषयी सामान्यांना फारशी माहिती नसते. हार्ट अ‍ॅटॅकसंबंधी समाजातील जागरूकता दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. मग ‘किडनी अ‍ॅटॅक’इतका दुर्लक्षित का? किडनीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यातला दुसरा गुरुवार ‘जागतिक किडनीदिन’ म्हणून पाळला जातो. नुकतेच पुण्यातील वानवडी इथल्या ‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामान्यांनी विचारलेले हे प्रश्न आणि त्यांची किडनी तज्ज्ञांनी दिलेली उत्तरे-
आपल्याला किडनीचे आजार आहेत का, हे एखाद्याने कसे ओळखावे?
बहुतेक वेळा किडनीच्या आजारांची लक्षणे सुरुवातीला वेगळी ओळखू येत नाहीत. अशक्तपणा, थकवा, थोडय़ा कामानेही थकून जाणे, झोपेचे चक्र बिघडणे अशी लक्षणे दिसू शकतात. दगदग झाली असेल, अतिकामाचा ताण आला असेल असे वाटून या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष केले जाते. पण रात्री झोपल्यानंतरही उठून लघवीला जावे लागणे, चेहऱ्यावर सूज येणे, सकाळी उठल्यावर पायांवर सूज दिसणे, तरुणपणीही रक्तदाब जास्त आणि हिमोग्लोबिन कमी असणे, अशी लक्षणे किडनीच्या आजारांशी जोडता येऊ शकतात. पण मग रात्री झोपल्यानंतर लघवीला जावे लागणे चुकीचेच समजावे का, असा प्रश्न उपस्थित होतो. मूत्राचे ‘कॉन्सेंट्रेशन’ करणे हे किडनीचे प्रमुख काम आहे. किडनीच्या आजारात किडनीच्या या मूळ स्वभावावर परिणाम होऊन व्यक्तीला अधिक विरलित अर्थात ‘डायल्युटेड’ मूत्रप्रवृत्ती होते. दिवसा ही बाब व्यक्तीच्या लक्षात न येणे शक्य आहे. पण रात्री झोपल्यानंतर दोन ते चार वेळा लघवीला जावे लागत असेल आणि शरीरस्वभावात हा बदल अचानकच दिसत असेल, तर त्याचा संबंध किडनीच्या आजाराशी असू शकतो. अर्थात वयस्कर व्यक्तींमध्ये रात्री मूत्रप्रवृत्ती होण्याचे लक्षण प्रोस्टेट ग्रंथीच्या अनावश्यक वाढीच्या आजारातही दिसते. मधुमेहाच्या रुग्णांमध्येही हे लक्षण दिसून येते. तेव्हा अशा वेळी या इतर आजारांच्या शक्यतेचीही खातरजमा करणे आवश्यक आहे. मात्र डायल्युटेड मूत्रप्रवृत्तीचा संबंध किडनीशी असतो हे लक्षात ठेवावे.
किडनी आजारांची शक्यता अधिक कोणाला?
उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, यकृताचा तीव्र आजार, मूत्रसंसर्ग, मूतखडा, संधिवात अशा आजारांच्या रुग्णांना किडनीचे आजार होण्याचा संभव अधिक असतो. त्यामुळे या रुग्णांनी त्यांच्या किडनीच्या कार्याबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे.
किडनीबाबत जागरूक कसे राहावे?
तुमची किडनी योग्य रीतीने कार्य करते आहे का हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने ठराविक काळाने रक्त आणि लघवीच्या तपासण्या करून घेणे इष्ट. अनेकदा रुग्णांना वाटते, की किडनीच्या तपासणीसाठी अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफीची तपासणी पुरेल. पण अल्ट्रासाऊंड तपासणीत किडनीची रचना दिसते, तिचे कार्य नव्हे. अल्ट्रासाऊंडमध्ये किडनी अगदी सुस्थितीत दिसत असूनही तिच्या कार्यात बिघाड झालेला असू शकतो. त्यामुळे किडनीच्या कार्याची माहिती घेण्यासाठी रक्त आणि लघवीच्या तपासण्या हाच सोपा पर्याय आहे. आता चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या वरील व्यक्तींमध्ये ठराविक काळाने रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्टेरॉल तपासून घ्यायची जागरूकता वाढते आहे. याच वेळी रक्त तपासून घेतल्यास त्यातील ‘युरिया’ आणि ‘क्रियाटिन’ या घटकांची पातळी कळेल. शिवाय ‘युरीन रुटीन’ तपासणीतून लघवीत उतरणाऱ्या प्रथिनांविषयी माहिती मिळेल.
किडनीच्या आजारांवर डायलिसिस केव्हा करायचा हे डॉक्टर कशावरून ठरवतात?
शरीरातील ‘बायोकेमिकल पॅरॅमीटर्स’ अर्थात युरिया, क्रियाटिन, पोटॅशियम इ.ची पातळी अपेक्षित प्रमाणापेक्षा जास्त झाली तर डायलिसिसचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यापैकी क्रियाटिनची पातळी हा कळीचा मुद्दा आहे. घटकाची पातळी एकाच ठराविक पातळीपेक्षा वाढली आणि लगेच डायलिसिसचा निर्णय घेतला असे होत नाही. कारण शरीरातील आवश्यक कार्यासाठी लागणारी या घटकांची पातळी वयोगटानुसार बदलते. त्यामुळे घटकाच्या पातळीपेक्षा त्याचे शरीरातील कार्य तपासले जाते. याबरोबरच रुग्णाला इतर लक्षणे विचारली जातात. किडनीच्या आजारात वजन कमी होणे, भूक न लागणे, रुग्णाला फीटचे झटके येणे ही लक्षणे डायलिसिसची गरज सुचवतात. रुग्णाला तपासल्यावर त्याच्या हृदयाला सूज आलेली आढळली, किंवा फुफ्फुसात पाणी झालेले आढळले तरी डायलिसिस करण्याची आवश्यकता भासते. रुग्णाला आडवे झोपता न येणे, आडवे झोपल्यावर दम लागणे व उठून बसल्यावरच बरे वाटणे ही फुफ्फुसात पाणी झाल्याची लक्षणे आहेत. अशा सर्व गोष्टींचा एकत्रितपणे विचार करून मगच रुग्णाला डायलिसिसचे उपचार द्यायचे की नाही हे ठरविले जाते.
एकदा डायलिसिस करावे लागले की कायमच करावे लागणार का?  
एकदा डायलिसिसचे उपचार घेतले की ते कायमच घ्यावे लागणार अशी भीती रुग्णांच्या मनात असते. पण प्रत्येकच रुग्णाच्या बाबतीत हे खरे नाही. काही रुग्णांचा किडनीचा आजार उशिरा लक्षात येतो. यातील काहींना ठराविक काळासाठी डायलिसिसवर ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. हा ‘शॉर्ट टर्म डायलिलिस’ असतो. किडनीचे कार्य अपेक्षित प्रमाणात सुधारले तर डायलिसिस बंद करण्याचा विचारही डॉक्टरांकडून केला जाऊ शकतो. थोडक्यात, एखाद्या रुग्णाला कमी काळासाठी डायलिसिस जरी करण्यास सांगितले तरी लगेच घाबरून जाऊ नये. डायलिसिस किडनीचे कार्य सुधारण्यासाठी असतो हे लक्षात ठेवावे. मात्र डायलिसिसची गुणवत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे उपचार गुणवत्तापूर्णच असावेत.
किडनीचे आजार असणाऱ्यांनी इतर कशा कशाबाबत जागरूक राहावे?
किडनीचे आजार असलेल्या प्रत्येकाला डायलिसिस आणि अंतिमत: किडनी प्रत्यारोपणच करावे लागते असे मुळीच नाही. पण किडनीचे आजार असतील तर रुग्णाला हृदयविकार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयविकार उद्भवूच नये यासाठी या रुग्णांनी जागरूक असावे.
एक किडनी चांगली आणि एक किडनी ‘फेल’ झालेली असे होऊ शकते का?
किडनीला झालेला संसर्ग, किडनी स्टोन (मूतखडा) किंवा किडनीचा टय़ूमर हे आजार एकाच किडनीला होऊ शकतात. अशा वेळी दुसरी किडनी निरोगीही असू शकते. मात्र जेव्हा आपण ‘किडनी फेल्युअर’चा विचार करतो तेव्हा एक किडनी अगदी निरोगी आणि एक ‘फेल’ झालेली असे नसते. किडनी फेल्युअर एकाच वेळी दोन्हीही किडन्यांशी संबंधित असते.
जन्मापासून एक किडनीच नाही असे होऊ शकते का?
जवळपास पाच हजार लोकांपैकी एकाच्या शरीरात जन्मापासून एकच किडनी असू शकते. पण म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. एकाच किडनीवरही त्या व्यक्तीला अगदी नॉमर्ल आयुष्य जगता येते.
‘किडनी ट्रान्सप्लांट’नंतर ‘डोनर’ला म्हणजेच किडनी देणाऱ्याला काही धोका असतो का?
रुग्णाला किडनी देणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यावर एक किडनी दिल्यामुळे काहीही परिणाम होत नाही. शस्त्रक्रियेनंतर एखादा महिना त्याला शक्तिवर्धक औषधे (टॉनिक्स) घ्यायला सांगितली जाऊ शकतात. मग मात्र त्यासाठी वेगळी औषधेही घ्यावी लागत नाहीत. त्याला त्याचे पुढचे आयुष्य पूर्वीसारखेच नॉर्मल जगता येते.
सहभाग- डॉ. अभय सद्रे, डॉ. अतुल मुळय़े, डॉ. ए. जी. हुपरीकर शब्दांकन – संपदा सोवनी